Mayabazar
वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीची ही कथा नाही. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या 'असामान्य' सुखदु:खांना उद्गार देणारी ही कथा आहे. हलक्याफुलक्या, मिस्किल विनोदी शैलीचे अधिष्ठान 'वपुं'च्या कथांना असले तरीही त्यांची कथा कधी 'आचरट' होत नाही. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणा-या, हसवणा-या रंजकतेचे अधिष्ठान त्यांच्या कथेला असले तरीही हव्यास म्हणून त्यांची कथा 'स्वस्त रंजकते'ला थारा देत नाही. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. अनुभवाचा तोचतोचपणा आढळत नाही. सामान्यत: पाच-पन्नास कथा लिहून झाल्या की मराठी लेखकांची 'कथा' थकते आणि लेखनाचा आपद्धर्म म्हणून अनुभवाचे तेच दळण आणि वळण गिरविले जाते आणि वाचकांच्या दृष्टीने त्यांची कथा रूक्ष, कंटाळवाणी होऊ लागते. 'वपुं'ची प्रत्येक कथा अजूनही ताजी व टवटीत घडते. त्यांची कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्र्प करून जाते. त्या स्र्पाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य 'वपुं'च्या कथेत आहे.