Mana Sajjana (मना सज्जना)
श्री. भीष्मराज बाम सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचे व भारतीय योगशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळेच विविध क्रीडाक्षेत्रांत विश्वविक्रम गाजवणारी नवीन सतेज पिढी मार्गदर्शनाकरिता त्यांच्याकडे आली व तिच्या साहसाला आत्मनिग्रहाची, अनुशासनबद्धतेची व यशसंपादनाची अचूक दिशा मिळाली. प्रस्तुत पुस्तकातील छोटेखानी लेखांमध्येही श्री. बाम यांच्यामधील त्याच शिक्षकाची तळमळ आपले लक्ष वेधून घेते. खेळ असो, की नेमलेले कोणतेही नित्यकर्म असो, त्यासाठी चित्ताला एकाग्रतेचे वळण लागले पाहिजे. ही एकाग्रता अंगवळणी कशी पाडून घेता येईल, हे सांगण्यासाठी योगशास्त्राचे विवेचन त्यांच्या उपयोगी पडले. `पातञ्जल योगदर्शन’ हा भारतीय मानसशास्त्राचा ग्रंथ आहे. त्याचा आधार जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे, अशी त्यांची खात्री पटली. पोलीसखात्यात काम करताना या ग्रंथातील मूलगामी चिंतनाचा त्यांना लाभ झालाच, पण नवोदितांनी आपापल्या क्षेत्रांतील लहानमोठी आव्हाने स्वीकारण्यासाठीही त्यातील मार्गदर्शन त्यांच्या कामी आहे. `मना सज्जना’ या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी अशीच लहान-सहान जीवनभाष्ये लिहिली आहेत. त्यात नवोदित खेळाडूंना मूलगामी मार्गदर्शन आहे. सुभाषिते, बोधकथा यांच्या साह्याने मोठ्यांसाठी केलेला मनोबोध आहे. आणि लालित्याच्या वनराईत फेरफटका घडवून आणणारी स्फुटे, चिंतनेही आहेत.