Digambaraa (दिगंबरा)
गोव्यातील एका प्रतिष्ठित जमीनदार घराण्यातील ‘दिगंबरा’ ह्या मुलाची ही आत्मनिवेदनपर कादंबरी.लहानपणापासून कष्टात गेलेले बालपण, मॅट्रिकपर्यंतचे कष्टपूर्वक झालेले शिक्षण, वडिलांचा दुरावा, त्यांनी ठेवलेली रखेली, वडिलार्जित बागायती जमीन प्राप्त करून घेण्यासाठी कराव्या लागलेल्या कोर्टकचेर्या, त्यामुळे आईची होणारी परवड. वेगवेगळ्या नोकर्यांतील कटू अनुभव, पायी केलेली गाणगापूर यात्रा, तिथे भेटलेले साधू व संन्यासी व अन्न भिन्न स्वभावधर्मी माणसे, स्वत:च्या प्रेमानुभवाच्या छटा, इतरांचे लैंगिक जीवन यांचे चित्रण या कादंबरीतून येते. या कादंबरीतील निवेदकाचे आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभव प्रत्ययकारीपणे आविष्कृत झाले आहेत. स्वत:ला आलेले अतींद्रिय अनुभव, अधूनमधून त्या अनुभवांविषयी निवेदकाच्या मतात निर्माण होणारी आशंका, त्याचे स्वप्नदृष्टांत, स्वानुभवांच्या विपरित व विसंगत असणारी त्याच्या सभोवतालची परिस्थिती व त्यामुळे त्याच्या मनाचा होणारा कोंडमारा यांचे वास्तव निवेदन हे या कादंबरीचे बलस्थान आहे.