Sat Na Gat
श्री. राजन खान हे आजचे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. ते चांगले स्टोरीटेलर आहेतच, पण लेखकाने लिहिताना ज्या अर्थाने निर्दय व्हायचे असते, तसे ते फार जोरकसपणे होतात. ते त्यांच्या पात्रांत भावनिकदृष्ट्या अडकत नाहीत. त्यांच्या प्रेमात पडून अनुभवातला दाह ते निष्कारण कमीजास्त करीत नाहीत. एखाद्या स्थिर चौकटीतल्या चित्राची ओळख करून देण्याच्या पद्धतीने ते सुरुवात करतात आणि भराभर फटकारे मारत भरदार स्केच करीत जावे तशी पात्रे उभी करतात. त्यांची समूहचित्रणेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. नामी नावाच्या बलात्कारित स्त्रीची गोष्ट सांगता सांगता ते आपल्या एकूण सामाजिक वास्तवाचा खेळ उभा करतात. स्वार्थ आणि हितसंबंध राखणार्या खेळ्या सारे जण आपापल्या कुवतीनुसार खेळत असताना एखाद्याच्या सुखदुःखाला कवडीइतकेही मोल उरत नाही याचा प्रत्यय देऊन आपल्याला अस्वस्थ करतात, अंतर्मुख होण्याला प्रवृत्त करतात. एका घटनेचे धागेदोरे उभे करता करता खूप मोठा पट आपल्यासमोर साकार करणारी व समकालीन वास्तवाचे अतिशय भेदक चित्रण करणारी `सत ना गत’ ही आजची एक महत्त्वाची कादंबी आहे हे निःसंशय.