Dr.Aanandibai Joshi-Kaal Ani Kartutva (डॉ.आनंदीबाई
‘ डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व’ हे डॉ. अंजली कीर्तने लिखित चरित्र म्हणजे आनंदीबाईंच्या जीवनाचा नवा अन्वयार्थ आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज आणि जागतिक स्त्री-लढा यांच्या पार्श्वभूमीवर याचं लेखन केलं गेलं आहे. आनंदीबाई आणि त्यांच्या जीवनातील अन्य व्यक्ती यांच्या नातेसंबंधीचा सखोल शोध, वादग्रस्त प्रकरणांचा उलगडा, त्यांच्या कॉलेज-जीवनासंबंधीची नवी माहिती आणि आनंदीबाईंना वलयांकित विभूती न करता, गुणदोषयुक्त व्यक्ती म्हणून केलेलं त्यांच्या मनोधर्माचं विश्लेषण ही या ग्रंथाची काही ठळक वैशिष्ट्यं. आनंदीबाईंमधील पारंपरिक आर्य स्त्री आणि बंडखोर तरुणी यांतील अंतर्गत द्वंद्व, त्यातील सूक्ष्मतरल छटांसह चित्रित केलं आहे. या चरित्राद्वारे प्रथमच, आनंदीबाईंनी एम्. डी. च्या पदवीसाठी लिहिलेला प्रबंध, काही दुर्मिळ पत्रं, छायाचित्रं, आनंदीबाईंच्या अमेरिकेतील समाधीचा अंजली कीर्तने यांना कसा शोध लागला याचा वृत्तांत आणि आनंदीबाईंच्या ‘कार्पेंटर मावशी’ची एकमेव वारसदार पणती नॅन्सी कॉब-स्टोन यांच्या भेटीची उत्कट कहाणी प्रकाशात येत आहे. याच विषयावर अंजली कीर्तने यांनी एक लघुपटही तयार केला असून त्या लघुपटाला 1992-93चा सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राज्यशासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.