Swapnatil Chandane

जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : "सोनेरी मनाची परी' अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा- खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशौली अगदीच वेगळी. भाषा लयबद्ध, नादमधुर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखाद्या गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तस, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परीकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युत्कट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल किंवा उद्या, प्रेमात पडणार्या प्रत्येकानं वाचलीच पाहिजे, अशी या शौलीतल्या, या एवड्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङमयातच एकमेवाद्वितीय असा हा कथासंग्रह.

Book Details

ADD TO BAG