Krondhe Utpatila Bale (क्रोधें उत्पाटिला बळें)
प्रदीप कर्णिक यांची क्रोधें उत्पाटिला बळें ही कादंबरी रूढार्थाने मराठी कादंबरी वाङ्मयातल्या कुठल्याच संप्रदायात बसत नाही.मनोविश्लेषणात्मक, संज्ञाप्रवाही, अस्तित्ववादी असल्या चौकटीत मावणारीही कादंबरी नाही. या कादंबरीला म्हणावे असे कथानक नाही, नायक-खल नायक नाही, या नायकाच्याच नव्हे तर येथील प्रत्येक पात्रांत एक शून्यावस्था, एक पोकळी भरलेली आहे. ह्या शून्यावस्थेला छेदून बाहेर कसे पडायचे, या ध्यासाने मृत्यूच्या विहिरीत गरगरणाऱ्या नायकाने कादंबरी लेखनाचा गळ पकडून, स्वत:ला त्या विहिरीतून बाहेर पडता येईल याची धडपड चालवली आहे. ही कादंबरी वाचताना मानवी असतेपणाचे, मानुषतेच्या मूल्यांचे, प्रश्नांचे मोहोळ पानोपानी उठलेले दिसेल. माणसं इतकी क्रूर कां होतात असा प्रश्न उपस्थित झाला की, त्याचा मूळ स्वभावच रानटी आहे का? असा उपप्रश्न पुढे येतो, पाठोपाठ क्रोध शमवण्याचे मार्ग कोणते ? हिंसा हा क्रोध शमवण्याचा मार्ग असू शकतो का ? हिंसा मनातून जाऊन शांती कशी निर्माण होईल? मग महात्मा गांधींचा अहिंसा विचार येणार, बुद्धाची शांती येणार, तेंडुलकरांचे हिंसा आणि क्रौर्याचे चिंतन येणार. अशा संदर्भसंपृक्ततेतून प्रश्नांचे मोहोळ बाजूला सारून, उत्तराचा शोध घेण्यासाठी तडफडणाऱ्या मनाची कालवाकालव हा या कादंबरीचा विषय आहे. पराभव चालेल, पण पक्षी मरता कामा नये ही भूमिका असल्यामुळे निष्कर्षाप्रत येताना कथानिवेदकाची दमछाक होते. निवेदकाची सर्व बाजूंनी होणारी दमछाक हेच या अनुभवाचे संघटन-तत्त्व आहे आणि कलाद्रव्यही आहे. अशा या प्रायोगिक वळणाने जाण्याचे धाडस केल्याबद्दल प्रदीप कर्णिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन!