Dnyanai Savitribai Phule (ज्ञानाई सावित्रीबाई फुले
सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्यावर डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. नाईक यांच्या शैक्षणिक प्रवासात सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान होते, असे त्या मानतात. सावित्रीबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शुद्र, बहुजन स्त्रियांना गुलामगिरीतून व दास्यातून मुक्त करण्यासाठी शिक्षणाचीच गरज आहे, हे ओळखून त्यांनी स्त्री-शिक्षणाचा भक्कम पाया घातला. सावित्रीबाई ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली १९ व्या शतकातील क्रांतिकारी स्त्री होती. पुण्यासारख्या कर्मठ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात प्रखर विरोधावर मात करत कठीण रूढी, परंपरा, अज्ञान तसेच त्या काळातील धन-दांडग्यांचे समाजावरील वर्चस्व अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंची आठवण होईल असाच लढा सावित्रीबाईंनी दिला. एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने निश्चेष्ट पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणार्या सावित्रीबाई समाजाच्या वाटेवरील अपमानाचे काटे दूर करत न डगमगता, न थकता अखेरपर्यंत लढत राहिल्या.