Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.