Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!