Karna Putra (कर्ण पुत्र)
“आचार्य आपण मला शिकवण्यास नकार का दिला?” आचार्य शांतच होते. काही क्षण तसेच गेले. “युगंधर कुठे आहे? त्याला तुम्ही कुठे पाठवलंय का? नक्की काय चाललंय? माझ्याशी कोणी बोलत का नाही?” तो एकामागे एक प्रश्न विचारत होता. आचार्य मात्र शांत होते. “सुवेध एक मोठा श्वास घे...” आचार्यांनी आपलं मौन तोडलं. “तुझ्यासारखा शिष्य मिळणं हे कुठल्याही गुरूचं भाग्यच असेल. तुला मी नाकारत नाहीये. परंतु माझ्या मनात दुसरीच काही योजना चालली आहे. तुझ्या क्षमतांचं योग्य प्रकटीकरण करायचं असेल तर त्याला त्याच ताकदीचा गुरू हवा. मी तुला कदाचित शस्त्रांमध्ये पारंगत करेन. परंतु तुझी क्षमता अस्त्रांवर प्रभुत्व मिळवण्याची आहे. पण त्यासाठी तुला योग्य स्थानी जावंच लागेल.” “अस्त्र?” सुवेधच्या शब्दांमध्ये प्रश्न डोकावत होता. “शस्त्र ही कला आहे, कौशल्य आहे. पण अस्त्र ही विद्या आहे. शस्त्रांचं कौशल्य आत्मसात करता येतं. पण अस्त्रांची विद्या मिळवण्यासाठी मात्र योग्य गुरू लागतात. अर्थात हे मिळवण्यासाठी तुला खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण...” असं म्हणून शैलाचार्य शांत झाले. काही काळ शांततेत गेला. “काय आचार्य?” सुवेधला ही शांतता सहन होत नव्हती. “काही प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय मला पुढचा मार्ग दिसत नाही आणि तुला कोणाकडे पाठवावं याचा संकेतही मिळत नाही.”