Gentleman Chor (जंटलमन चोर)
दामोदर मावजो यांच्या 'जंटलमन चोर' या संग्रहातल्या कथांचा सामाजिक आणि प्रादेशिक पैस विस्तीर्ण आहे. गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक घडणीमुळे की काय, कोंकणी भाषेत लेखन करणाऱ्या दामोदर मावजो यांच्या लेखनाचा पोतही बहुपदरी झाला आहे. लेखक म्हणून त्यांच्या सहानुभूतीचा पैसही विस्तारला आहे. या कथांमधली माणसं गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, बंगाल, अमेरिका अशा विविध प्रदेशांमध्ये वावरतात. रस्त्यावर राहणाऱ्या, गरीब मजुरापासून कॉर्पोरेट अधिकारी, डॉक्टर, बिल्डर असे व्यवसाय करणाऱ्यांच्या भौतिक जीवनाचा आणि आंतरिक विश्वाचा वेध मावजो या कथांमधून घेतात. या कथांना सध्याच्या आपल्या समाजातल्या पुरुषवादी, धर्मवादी, सांस्कृतिक अस्मितावादी धारणा आणि त्यामुळे जीवनात निर्माण होणारे पेच यांचे संदर्भ आहेत. कथानकाच्या पातळीवर हे संदर्भ पात्रांच्या जीवनातल्या घटना-प्रसंगांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. या कथांमध्ये नाट्यमय आणि योगायोगप्रधान प्रसंगरचना प्राधान्याने दिसत असल्या, तरी असे प्रसंग पात्रांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या अनुभवांच्या रूपाने येत असल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि त्या पात्रांशी वाचकाचा सहानुभाव प्रस्थापित होतो. एका प्रगाढ मानवतावादी लेखकाच्या सहवासात आपण आहोत, अशी या कथा वाचताना वाचकाची भावना होते. - नीतीन रिढे