-
Solitear (सॉलिटेअर)
एरवी एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहणारे मोहरे सॉलिटेअरच्या पटावर उतरले की स्वत:च्या चौकटीत अलिप्त जगतात. स्वत:ची चौकट स्वत: पुरती राखताना सोबत्याला पटाबाहेर बिनदिक्कत भिरकावून भोवतालच्या चौकटी रिकाम्या करतात. सर्वाधिक सोबत्यांना ठार करणारा सर्वाधिक कुटिल मोहरा अखेरीस अख्खा पट बळकावतो, तरीही स्वत:च्या चौकटीपुरताच उरतो. एकाकी. त्याला खेळवणारा खेळीयाही मोह-याएवढाच एकाकी असतो. त्याला ना भिडू असतो, ना प्रतिस्पर्धी. तो हरवतोही स्वत:लाच आणि जिंकतोही स्वत:बरोबरचीच लढाई. जगाच्या पटावर हा एकच खेळ सतत खेळला जातोय. परत परत, द गेम ऑफ सॉलिटेअर ! आणि आता तर खेळच खेळीयाला खेळवू लागलाय त्या खेळाच्या या पाच कथा !
-
Free Fall (फ्री फॉल)
Free Fall - फ्री फॉल गणेशची कथा वास्तववादी, आधुनिकोत्तर, महानगरी अशा कोणत्याही एका डब्यात बंद करता येत नाही, हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. या कथेत आशयाच्या अनुषंगाने काही सामाजिक मुद्दे येत असले तरी ही कथा हल्ली प्रतिष्ठित असलेल्या सामाजिक वास्तववादापासून दूर आहे. तिला कल्पनाशीलतेचं वावडं नाही. पण मानवी आयुष्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे विविध घटक या कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथांचे ताणेबाणे अशा घटकांच्या ताणातून आणि सैलावण्यातून विणले गेले आहेत.
-
Kanvinde Harawale (कानविंदे हरवले)
“कानविंदे हरवलेत.'' मिसेस कानविद्यांच्या या वाक्यावर मी क्षणभर काहीच न कळल्यागत त्यांच्याकडे पाहात बसलो. “आठ दिवस झाले कानविद्यांचा काही पत्ता नाही.'' मिसेस कानविंदे पुढे म्हणाल्या आणि मी हातातला चहाचा कप समोरच्या टीपॉयवर ठेवला. मिसेस कानविद्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ लागल्यावर माझ्या मनात अनेक विचार फास्ट फॉरवर्ड केलेल्या चित्रमालिकेप्रमाणे भरभर सरकून गेले.. कानविंदे हरवले म्हणजे नेमकं काय झालं? ते कसे आणि कुठे हरवले? आणि मुख्य म्हणजे कानविंदे हरवले याच्याशी माझा काय संबंध? मग क्षणार्धात वासुदेव कानविंदे या माणसाशी काही दिवसांपूर्वीच झालेल्या माझ्या पहिल्यावाहिल्या संवादाचा क्षण मनात चमकून गेला...
-
Pyar ka Raag Suno(प्यार का राग सुनो)
रोमान्स म्हणजे काय? प्यार, मोहोब्बत, प्रेम? कसा बदलला रोमान्स आपल्या सिनेमांमध्ये? देव आनंदला रोमँटिक हिरो म्हणून प्रचंड फॅन फॉलोईंग का मिळालं? आणि शाहरुखचं आजचं यश नेमकं कशामुळे आहे? हा एक सरळ रेषेतला प्रवास आहे का? मग मधले दुवे कोणते आहेत? आणि का आहेत? भारतातला सिनेमा बोलत नव्हता तेव्हाही त्यात रोमान्स होता. स्वातंत्र्यापूर्वी तर तो अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होता. काळ बदलला, सिनेमा बदलला. मग प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या? देव आनंद आणि शाहरुख खान यांच्या रोमान्समधलं साम्य, मधल्या काळातले शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर यांच्यासारख्या नायकांचा रोमान्स, अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनने बदललेला कॅनव्हास, या रोमँटिक नायकांना मिळालेलं संगीत - गाणी, त्यांच्या नायिकांबरोबरची केमिस्ट्री या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. यात अनेक सुरस किस्से तर आहेतच, पण भारताच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्या त्या कालखंडावर केलेल्या परिणामांची चर्चाही आहे. द्वारकानाथ संझगिरी । मीना कर्णिक । हेमंत कर्णिक
-
Vednecha Krus(वेदनेचा क्रूस)
. लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कादंबरी म्हणजे व्यक्तिचित्रात्मक साहित्यकृतीची एक अत्यंत सुरेखपणे घडवलेली तितकीच सुरेख प्रतिमा आहे. गेल्या पिढीतील प्रतिभाशाली चित्रपटकार गुरूदत्त यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनातील विलक्षण घटनांवर कलाकृती निर्माण करणे, हे कोणत्याही लेखकाला शिवधनुष्य पेलण्यासारखे आव्हानात्मक वाटते, परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते कठीण काम जातिवंत कलाकाराच्या जाणकारीने, जीवनाबद्दलच्या प्रगल्भ चिंतनाने एका उत्तुंग वाङ्मयीन पातळीवर नेले आहे. गुरूदत्त - गीता दत्त आणि वहिदा रहेमान या मानवी पातळीवर जन्म घेतलेल्या तीन अमानवी अद्भुत, कलेला जीवन मानणाऱ्या, मनस्वी -देहस्वी व्यक्तिमत्त्वांच्या अलौकिकपणाची ही कहाणी. प्रेम, प्रीती, भक्ती, आसक्ती, उत्कटता, असीम समर्पण आणि असीम तुटलेपण, मनाची आणि आत्म्याची तडफड, निर्मितीची आणि विसर्जनाची जीवघेणी तगमग आणि शेवटी एक अलौकिक अमर दुःखान्त ! या तीन कलाकारांची आणि त्यांच्या भोवतालच्या मानुष-अमानुष विश्वाची ही अविस्मरणीय कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी विलक्षण ताकदीने या कादंबरीमध्ये वाचकांसमोर सादर केली आहे. प्रत्यक्षातील प्रतिमा आणि लेखकाची प्रतिभा यांच्या कल्पनातीत निर्मितीचे हे हृदयंगम लेणे मराठी कादंबरीविश्वामध्ये अलौकिक ठरावे.
-
Yethe Bahutanche Hit (येथे बहुतांचे हित)
आपण समाजात कायमच राहत असतो: पण समाजशास्त्राचे अध्यासक जेव्हा समाज बघतात तेव्हा त्याचे एक वेगळच दर्शन आापल्याला होते.कधी ते एखाद्या उपेक्षित घटकाचे असते, कधी परंपरेच्या अन्वयार्थाचे तर कधी एखाद्या अभिनव विचाराचे. अभ्यासकांपाशी केवळ शास्त्र असते एवढेच नाही तर कलासुद्धा असते आणि त्यासोबत जर 'सर्वांचे भले व्हाव ' अशी कळकळ असेल तर मग त्या लेखनाला वेगळेच मोल प्राप्त होते. 'येथे बहुतांचे हित' या पुस्तकातील प्रत्यक लेखातून वाचकांना अशा जाणिवेचा प्रत्यय यइल.
-
Shashwat (शाश्वत)
चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये एक कथा आहे. आणि ती कथा कुठेतरी आपल्या भावनांना स्पर्श करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत पुस्तकातील कथा या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, कुठेतरी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या वाटतात आणि म्हणूनच त्या हृदयात घर करतात. काही कथा आपल्याला विचारात टाकतात तर काही जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात. अशा विविध कथांमधून मनाची आंदोलने उलगडून दाखवणारा लघुकथासंग्रह
-
Sahava Mahabhut Aani Mi (सहावं महाभूत आणि मी!)
सहावं महाभूत आणि मी!' ही गोष्ट आहे, आजच्या काळातल्या सहाव्या महाभूताची - कॉम्प्यूटरची - तशीच कॉम्प्यूटरने वेढून टाकलेल्या माणसांच्या जमातीची आणि ह्या प्रवासाचा साथीदार तसाच साक्षीदार असलेल्या सतीश जोशीची ! भारतीय कॉम्प्यूटर उद्योगाचा पाया ज्यांनी घातला अशी एक नामांकित कंपनी, पटणी कॉम्प्यूटर सिस्टिम्स. अत्यंत महत्त्वाच्या, जबाबदारीच्या पदांवरून सतीशने पटणीसाठी जगभरातले नवनवीन प्रोजेक्ट्स् केले. त्यांचा प्रत्ययकारी आढावा ह्या पुस्तकात घेतला आहे, शोभा बोंद्रे आणि सतीश जोशी ह्या लेखकद्वयीने. सतीशच्या अनुभवविश्वाचं, एक अद्भुत आणि रोमांचकारी असं शब्दचित्र इथे साकारलं आहे. ह्यामधून कॉम्प्यूटर आणि माणूस ह्या नव्या नात्यासंबंधी आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल, अनेक नवीन संकल्पनांचा परिचय होईल आणि कदाचित काही जुन्या संकल्पना मोडीत काढाव्या लागतील. 'भारत म्हणजे आय. टी. तज्ज्ञांचा देश' ही नवी व्याख्या जगाने मान्य केली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधला हा महत्त्वाचा 'भारतीय टप्पा' म्हणजे जागतिक पातळीवरच्या बिझनेसमधील एक महत्त्वाची उलथापालथ ! 'सहावं महाभूत आणि मी!' ही ह्या उलथापालथीचीही गोष्ट आहे.