Vednecha Krus(वेदनेचा क्रूस)
. लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कादंबरी म्हणजे व्यक्तिचित्रात्मक साहित्यकृतीची एक अत्यंत सुरेखपणे घडवलेली तितकीच सुरेख प्रतिमा आहे. गेल्या पिढीतील प्रतिभाशाली चित्रपटकार गुरूदत्त यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनातील विलक्षण घटनांवर कलाकृती निर्माण करणे, हे कोणत्याही लेखकाला शिवधनुष्य पेलण्यासारखे आव्हानात्मक वाटते, परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते कठीण काम जातिवंत कलाकाराच्या जाणकारीने, जीवनाबद्दलच्या प्रगल्भ चिंतनाने एका उत्तुंग वाङ्मयीन पातळीवर नेले आहे. गुरूदत्त - गीता दत्त आणि वहिदा रहेमान या मानवी पातळीवर जन्म घेतलेल्या तीन अमानवी अद्भुत, कलेला जीवन मानणाऱ्या, मनस्वी -देहस्वी व्यक्तिमत्त्वांच्या अलौकिकपणाची ही कहाणी. प्रेम, प्रीती, भक्ती, आसक्ती, उत्कटता, असीम समर्पण आणि असीम तुटलेपण, मनाची आणि आत्म्याची तडफड, निर्मितीची आणि विसर्जनाची जीवघेणी तगमग आणि शेवटी एक अलौकिक अमर दुःखान्त ! या तीन कलाकारांची आणि त्यांच्या भोवतालच्या मानुष-अमानुष विश्वाची ही अविस्मरणीय कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी विलक्षण ताकदीने या कादंबरीमध्ये वाचकांसमोर सादर केली आहे. प्रत्यक्षातील प्रतिमा आणि लेखकाची प्रतिभा यांच्या कल्पनातीत निर्मितीचे हे हृदयंगम लेणे मराठी कादंबरीविश्वामध्ये अलौकिक ठरावे.