Tridhara
शिशिरबाबूंना वाटलं, आपलं सारं भविष्यच या नातवंडांच्या रूपानं आपल्याला कवळतंय ! आपण जाणार नाही आहोत ! आपण मरणार नाही आहोत ! ही मुलं... नातवंडं... यांत आपला अंश आहेच ! यांच्या रूपानं आपलं अस्तित्व शाश्वत आहे ! मग कशाची खंत ? कशाचं दु:ख ? आपण शेवटच्या घटका नाही मोजत आहोत. आपण पूर्ण शक्तीनिशी छाती भरून श्वास घेत आहोत ! एक आगळं चौतन्य शिशिरबाबूंच्या शरीरात सळसळू लागलं. शिशिरबाबूंनी खिडकीकडे दृष्टी वळवली. मावळतीचा सूर्य शेंदरी लाल होऊन चमकत होता. "अच्छा !" मी विस्मयानं टक लावून तिच्याकडे पाहू लागले. आज दुपारच्या स्वप्नात मणकी आणखी एक पद्मिनी होऊन माझ्या डोळ्यातून वाहत होती; पण आता ती एका द्रौपदीच्या रूपात माझ्यासमोर उभी आहे. द्रौपदी. अशी द्रौपदी, जी केवळ अर्जुनाचीच आहे... केवळ आपल्या अर्जुनाची. आणि नेहमी त्याचीच राहणार आहे. बादलीच्याजवळ पोहोचताच, त्यानं डोळे बंद केले. हात जोडले आणि मनातल्या मनातच म्हणाला, "हे शनिदेवा, मी तुझ्या बादलीतले पैसे घेतोय. मला पैशांची केवढी गरज आहे, हे तुला माहीत आहे. तुला इतके पैसे मिळताहेत. तू इतक्या पैशांचं काय करणार ? शिवाय, तुला गरज असेल, तर तू तुझ्या जादूमंत्रानं पैशांचा पर्वत उभा करू शकतोस, होय की नाही ? ठीक आहे. मी तुझ्या बादलीतले काही पैसे घेतोय. मी ते घेऊ नयेत, अशी तुझी इच्छा असेल, तर तू तुझी मान 'नको' अशी हलव. तू काहीच बोलला नाहीस, हलला नाहीस, तर त्याचा अर्थ होईल, मी पैसे घ्यायला तुझी काही हरकत नाही. ठीक आहे नं ?'"