-
Maranottar (मरणोत्तर)
रहस्यकथा आणि विस्मयकथा ह्यांच्यातील फरक तसा अंधूकसाच .....कुठलीही रहस्यकथा विस्मयकथा होऊ शकेल , पण कुठलीही विस्मयकथा , रहस्यकथा असेलच असे नाही ....... इथं कथेच्या अगदी शेवट मिळणारं वळण - कलाटणी पाहून नकळत उदगार येतात सही....... आणि हीच सु. शीं. ची खासियत .....त्यांच्या विस्मयकथा वाचकांना हि अनुभूती मिळवून देण्यात नेहमीच यशस्वी ठरल्यात , त्यापैकीच हि एक मरणोत्तर ..................
-
Gulmohar
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.
-
Me Manus Shodhtoy
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांचया संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Kahi Khar kahi Khota
"कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची- जीवनाचे पुस्तक उघडल्याची" असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे- ह्या संग्रहातील 'जे.के.’, 'भदे’, यासारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा ह्याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फरक असतो. या फरकामुळे हे जीवन अधिकच 'जिवंत’ झालेले असते. वपु नेमके तेच हेरतात आणि ते इतक्या सहज शैलीत वाचकांना विश्वासात घेत वाचकांपुढे ठेवतात की त्यांनाही वाटते, जगावे तर हे असे. वपुंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांबरोबरच जीवन चेतना देणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य !
-
Nimith
ललितगद्य हा तसा वाचकांना आवडणारा साहित्यप्रकार. याचा आवाकाही मोठा. लेखकाच्या मनातले विचार, भावना स्वप्नमयी कल्पना विविध मोहमयी शब्दरूप घेऊन ललितरूपात अवतरली की त्याचं ताजं टवटवीत रूप अधिकच मोहवणारं छोट्या छोट्या प्रसंगांचं ललित शब्दरूप जणू समूहात येतं. वाचनानंदाचं दान अलगद वाचकांच्या हाती पडतं. लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या या आगळ्या वेगळ्या लेखनाचा हा संग्रह लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वत:ला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. काही 'निमित्तानं’ त्यांनावा वाचा फुटते. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ निमित्ता रूढार्थाने असो, नसो वपु काळ्यांची स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे खास ढंगदार ललितबंध.
-
Premmayi
ओशो यांच्या 'बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे वपुंनी केलेलं हे स्वैर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवाचं दर्शन वपुंच्या लेखनातून घडतं. कुठल्याही जाती, धर्म, पंथ, विचारसरणीच्या वैचारिक, भावनिक दबावापासून मुक्त होऊन खर्या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगणार्या माणसाचं अनोखं चित्रण येथे वपुंनी केले आहे. हा माणूस कसा असतो ? त्याचं कोणतंही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि स्वत:मधला परमेश्वर हा त्यांचा देव. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव. जगाला बदलणार्या फंदात न पडता स्वत:ला अभिप्रेत असलेलं विश्व स्वत:तच निर्माण करण्याची वेगळी वाट ते चोखाळत असतात. त्यांचा प्रवास अंतर्मनाकडे असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजे बाऊल. हा माणूस उत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे जगतो. अधिक नैसर्गिक बनतो. तो शांत असतो. आपल्या जीवनात विरघळून गेलेला असतो. परमेश्वरानं दरवाजा वाजवला म्हणजे दार उघडण्याकरीता तो सज्ज असतो. 'बाऊल’ माणसाच्या विविध विषयातील आगळ्या दृष्टीकोनावर वपुंनी येथे प्रकाशझोत टाकला आहे. प्रेमाचा खरा अर्थ, विविध अंगांनी येथे बहरला आहे. त्यात गहनता आहे, गूढता आहे आणि वैचारिक सधनताही आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील हे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध वैचारिकेतून बाहेर काढते. मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचे दर्शन घडवते.
-
Tapthpadi ( तप्तपदी )
लग्न विधीतल्या सप्तपदीबरोबर सुखाच्या सहस्त्र्पदांची स्वप्ने पाहत स्त्री प्रपंचात पाऊल टाकते. त्यावेळी अनेक संमिश्र भावनांनी तिचे मन वेढलेले असते. नव्या नवलाईचं अप्रुप, नवीन वातावरणं, नवीन माणसं याचं अनामिक दडपण आणि सार्या आयुष्याचाच ट्रॅक बदलणारी महत्वाची घडामोड - नव्यानवलाईत डोळ्यासमोरच्या सहजीवनाबद्दलच्या स्वप्नांच्या धुंदीत पावलांखालची जमीन कशी आहे हे कित्येकदा समजत नाही. सुखाच्या अनुभवातला आभास हळूहळू जाणवू लागतो जीवनाचे संसाराचे बोचणारे जखमा करणारे रूप उलगडू लागते. संसारातील अशा तप्तमुद्रांच्या कथा या संग्रहात वपुंनी रेखाटल्या आहेत. अनेकजणी या तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात सर्वार्थानं सूर जुळणे अशक्यच. पण नवरा जर 'सखा’ असेल तर पाऊलवाट फुलांच्या पायघड्यांची बनते. तसे नसेल तर जखमा करणारा काटेरी रस्ता. अवघड वाट अशीच शक्यता निर्माण झालेल्या संसाराच्या कथा खास वपु शैलीत.
-
Valay
कथा म्हणजे गोष्ट- घटनेतून फुलत जाणारं नाटय. या नाटयातून मानवी स्वभावाचे विविध नमुने दृीस पडतात.वपुंच्या कथांमधून माणसांच दु:ख आनंद,धुंदी यांचं तरल दर्शन घडतं. वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी ओळख असते. 'वलय’ मधील प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख असलेली माणसे भेटतात. 'अर्थ’मधील अप्पा. व्यवहारी जगात पैशाने फसवले जाण्याचं कोणतंच दु:ख न बाळगणारे. तर मिळणार्या अपार आनंदापुढे कामातून मिळणार्या आनंदाच्या धुंदीतच जगणारे- त्यांच जगण्याचं तत्वज्ञान और. 'स्वप्नवेडी' मधली मृणालिनी-एका स्वप्नात जगणारी. त्या स्वप्नामागचं करुण सत्य वाचकाला हलवून सोडतं. 'विश्वास’ मधील विश्वास पंडितची कैफियत मनाला सुन्न करते. या आणि अशा मनात दीर्घकाळ रेंगाळणार्या कथांचा हा संग्रह.
-
Navara Mhanava Aapla
या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे ! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही ! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा ! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!
-
Samvadini
रात्री अकरा वाजता घरी जातो. उर्मिला जागी असली तर म्हणते, "किती दमता तुम्ही !" - बस्स ! सगळा दिवस सार्थकी लागतो. ह्या एका वाक्याची माणसाला केवढी भूक असते, हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बायकोलाही एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून परतलेल्या नवर्याला पण !" समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरत्र, असं घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजेच समस्या. आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची. लोकप्रिय कथाकार व. पु. काळे यांची प्रत्येक कथा म्हणजे एक आगळाच अनुभव असतो. याचं कारण, मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसांची सुखदु:खं, हर्ष, खेद, आनंद, धावपळीच्या जीवनातला त्यांचा संघर्ष, नोकरदारांच्या नानाविध समस्या, कुचंबणा, लैंगिक जीवनातले ताणतणाव, मान-अपमान - जे एरवी कुणाच्या लक्षातही येत नाही, ते सगळं वपुंच्या मनाला भिडतं. वपु ते अलगद टिपतात आणि आपल्या सहज मिस्कील शैलीत वाचकांच्या मनात उतरवतात ! त्यांची जीवनदृष्टीच इतकी आशावादी, प्रसन्न आणि मिस्कील आहे, की त्या रंगांत रंगूनच त्यांच्या अनुभवाचा प्रत्येक क्षण चैतन्यानं खुलतो ! 'संवादिनी’मध्ये तर संवादांतून कथा फुलवणारी त्यांची शैली वाचकाला थक्क करते !
-
Mayabazar
वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीची ही कथा नाही. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या 'असामान्य' सुखदु:खांना उद्गार देणारी ही कथा आहे. हलक्याफुलक्या, मिस्किल विनोदी शैलीचे अधिष्ठान 'वपुं'च्या कथांना असले तरीही त्यांची कथा कधी 'आचरट' होत नाही. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणा-या, हसवणा-या रंजकतेचे अधिष्ठान त्यांच्या कथेला असले तरीही हव्यास म्हणून त्यांची कथा 'स्वस्त रंजकते'ला थारा देत नाही. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. अनुभवाचा तोचतोचपणा आढळत नाही. सामान्यत: पाच-पन्नास कथा लिहून झाल्या की मराठी लेखकांची 'कथा' थकते आणि लेखनाचा आपद्धर्म म्हणून अनुभवाचे तेच दळण आणि वळण गिरविले जाते आणि वाचकांच्या दृष्टीने त्यांची कथा रूक्ष, कंटाळवाणी होऊ लागते. 'वपुं'ची प्रत्येक कथा अजूनही ताजी व टवटीत घडते. त्यांची कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्र्प करून जाते. त्या स्र्पाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य 'वपुं'च्या कथेत आहे.
-
Fantasy Ek Preyasi
वपुंच्या कथा, कादंबरी या लिखाणातून त्यांच तत्वचिंतन एखाद्या मध्येच येणार्या सुखद शिडकाव्या प्रमाणे असते. कथेच्या ओघात, कहाणीत वाचक गुंतलेला असताना अलगदपणे हे चिंतन मनात उतरत जाते- आणि त्यामुळेच कथेला एक वेगळी खुमारी येते. पण ललित लेखांचा बाणाच वेगळा. साहित्याचा गाभा असलेल्या सौंदर्यानुभुवाच्या पातळीवरिल मीत्वाचा शोध हा या साहित्यप्रकारात अधिक सहजपणे,स्पपणे वेगवगेळ्या खपातून व्यक्त होताना दिसते. एका छोट्या घटनेतून, घटनेच्या निमित्ताने उलगडत जाणारे,उमलत जाणारे विचारांचे बहुरंगी पुष्प वाचकाला वाचनानंदाचा सुगंध देते. वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास 'वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. 'मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. 'प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, 'प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेटतात."
-
Swar (स्वर)
काही काही रागदारीत काही काही स्वर वर्ज्यच असतात... वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो. तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो... वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं...! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणार्या क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृकिोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. 'स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...
-
Moden Pan Vaknar Nahi
समाजात वावरताना अनेक व्यक्ती भेटतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक तत्त्वज्ञान असतं. जगण्याची पद्धत असते स्वत:चे नियम, मतप्रणाली असते. आपल्या मनानं स्विकारलेल्या मतांप्रमाणे माणसं वागत असतात नि मतं वंशपरंपरेनं, संस्कारानं, परिस्थितीनं अशा अनेक कारणानं तयार होतात. प्रत्येक व्यक्तीगणिक या मतांचे आविष्कार भिन्न भिन्न होत असतात. यालाच आपण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणत असतो. सर्वसामान्य माणसांचे राग, लोभ, मत्सर, प्रेम, करुणा यांचे आविष्कारही सर्वसामान्य असतात. त्याला स्वतंत्र चेहरा नसतो. परंतु काही माणसं मात्र वेगळी दिसतात. त्यांची भावना विचार व्यक्त करण्याची पद्धतही सर्वांहून वेगळी असते. म्हणूनच आपण त्यांना विक्षिप्त म्हणतो. या कथासंग्रहात अशाच आठ विक्षिप्त व्यक्तींच्या तर्हा रंगवल्या आहेत. नामशेष होण्याचा धोका असतानाही माघार न घेणार्या या व्यक्तींच्या कथा आपल्या मनात घर करतात. कारण मनाच्या कोणत्यातरी कोपर्यात आपल्यालाही केव्हांतरी असंच वागायची इच्छा असते. सार्या जगाला झिडकारण्याचं, ठोकरण्याचं धाडस या व्यक्तींमध्ये दिसते. अशा व्यक्तींच्या वपुंनी रेखाटलेल्या या आठ खुमासदार कथा.
-
Partner (पार्टनर)
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वैशिष्ठ्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अशा कहाणींचे वळण. ते दोघेही आहे पण ते कोण्या 'जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे 'वलय’ झाले आहे. राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसेच हे आहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्या अनेकांपैकी एका मुक्त वागणार्या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. 'शाकुंतल' सारखी वारंवारं 'आवृत्ती'त जात राहिली आहे.