-
Dhana (धना)
"धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. "
-
Nana Ani Mahadaji (नाना आणि महादजी)
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाqक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
-
Guardian (गार्डिअन)
संगणकामुळे पूर्णपणे पेपरलेस झालेल्या विश्वात जेव्हा परत हाताने लिहिण्याचा शोध लागतो... एखादा शास्त्रज्ञ मंगळावर राहून डीएनएचं संशोधन करत असताना तिथेच त्याला साहाय्य करणाऱ्या मुलीशी विवाहबद्ध होतो... एखाद्या रोबोटमध्येही मानवी भावना जागतात... एखादा महासंगणक तीन अभियंत्यांना डांबून ठेवतो... हवामानातील बदलांच्या अचूक अंदाजांसाठीची थेअरी एक रोबोट एका शास्त्रज्ञाला सांगतो... लकुलीश ग्रहावरच्या स्त्रियांनी पृथ्वीवर महिलांची आंतरपृथ्वीय स्पर्धा घेण्याचं ठरवल्यावर चंद्रावर राहणाऱ्या स्त्रिया नाराज होतात... एम्ब्रायो बँकेच्या साहाय्याने आई बनून आपल्या मुलीला रोबोटच्या हवाली केलेल्या स्त्रीचं मातृत्व जागं होतं...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन.’
-
Bedhunda (बेधुंद)
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
-
Rikta (रिक्त)
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाqस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
-
Mughal Sattecha Saripat (मुघल सत्तेचा सारिपाट)
मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज़ मुघल, आणि वासना, वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते.
-
Sarja (सर्जा )
सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
-
Adgal.. (अडगळ)
बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.
-
Six Machine (सिक्स मशिन)
"कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. पण अशा अनेक गोष्टी सहज शक्य करून दाखवणं, हा वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग झालाय. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत त्यानेच प्रथम २०० धावा काढल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी२० क्रिकेट सामन्यात कोणत्याही फलंदाजाने मारलेल्या षट्कारांपेक्षा, त्याने दुप्पट षट्कार लगावले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याने दोन तडाखेबंद त्रिशतकं काढलेली आहेत. हे सर्व विक्रम करताना त्याच्या हातात क्रिकेटमधील सर्वांत वजनदार बॅट होती आणि चेहऱ्यावर सदा फुलणारं हास्य होतं. जगभर प्रवास करणाऱ्या ख्रिस गेलचे इन्स्ट्राग्राम व ट्विटरवर लाखो चाहते आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या धडाकेबाज फलंदाजीची व नाइटक्लबमधील त्याच्या धमाल मस्तीची एक तरी झलक पाहायला-ऐकायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात. खेळपट्टीवर टिच्चून उभा राहत तो दीर्घ काळ फलंदाजी करतो, रात्रभर पार्टीत मौज करतो; दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा उठून प्रथम एका मोठ्या पॅनकेकचा फडशा पाडतो आणि मग दुर्दैवी गोलंदाजांची दुर्दशा करण्यासाठी पुन्हा मैदानात पाऊल ठेवतो. किंगस्टनच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांबरोबर एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला, क्रिकेट जगतातील उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, याची कथा. ही कथा केवळ एका असामान्य क्रिकेटपटूची नाही, तर विषमता व भेदभावाविरुद्ध झगडणाऱ्या, शून्यातून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या व हे सर्व करताना आपलं स्वत्व हरवू न देणाऱ्या एका लढवय्याची आहे. "
-
The Seventh Scroll (द सेव्हन्थ स्क्रोल )
कथा आजच्या काळात घडलेली असली, तरी तिचा संबंध आहे चार हजार वर्षांपूर्वीच्या रिव्हर गॉडमधील जगाशी. सेव्हन्थ स्क्रोल– वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कुशल कथाकाराची आणखी एक साहसकथा. धूसर बनून विस्मृतीतच गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा सेव्हन्थ स्क्रोलमध्ये सोडल्या आहेत. ड्युराइड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश -इजिप्तशियन माता-पिता असलेली पत्नी रॉयन यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रसच्या कबरीचा शोध लावला. त्या वेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने पेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पेपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाइलपासून इथिओपियाच्या दऱ्याखोऱ्यांत पोहोचतो. तो खजिना फक्त स्वत:साठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक पेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो. ड्युराइडचा खून पडल्यावर रॉयन इंग्लंडमध्ये आसरा घेते आणि निकोलस क्वेन्टन हार्पर या विख्यात पुराणवस्तू संशोधकाबरोबर इथिओपियाला जाते – ड्युराइडसाठी! ताईतासाठी! एका प्राचीन पेरोच्या स्वप्नांसाठी!! आणि स्वत:च्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळवण्यासाठीही!
-
The Odessa File (द ओडेसा फाइल)
सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत: रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.
-
Resonance (रेझोनान्स)
"मुंबईवरचा हल्ला ही केवळ एक झलक होती. यावेळी अतिरेक्यांनी प्रचंड मोठा कल्पनातीत आघात करून हिंदुस्थानचा सर्वनाशच करायचं ठरवलं होतं. एक कुठलातरी अर्धामुर्धा शब्दप्रयोग आयबीचा जॉइंट डायरेक्टर सिद्धार्थ राणा याच्या कानावर येतो `टू पाक..’ बऱ्याच खटपटीनंतर त्याला दोनच दिवस आधी हल्ल्याची तारीख कळते; पण स्थान, वेळ निसटून जात असतो. करोडो लोकांचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. त्यातच सिद्धार्थला काही फितुरांशीदेखील सामना करावा लागतो. भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तडीला नेता येणारा महाभयंकर कट शिजलेला असतो. त्यात एका गूढ व्यक्तीची भर पडते आणि खेळ रंगत जातो. अतिशय गुंतागुंतीची, वेगवान घडामोडींनी भरलेली काल्पनिक कादंबरी उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि... "
-
Politics of the Womb (पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब)
आयुष्यात आपण स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णयांपैकी एक असतो, आपण मूल जन्माला घालायचं की नाही. आणि तरीही, ज्यांना मूल जन्माला घालायचं असतं, पण तसं करण्यासाठी ते नैर्सिगकरीत्या असफल ठरतात, अशा लोकांवर वंध्य असण्याचा क्रूर शिक्का लावला जातो. समाज या लोकांना टोचून बोलतो; त्यांच्यात काहीतरी कमी आहे, असं त्यांना सतत सांगत राहतो. मग या अवहेलनेच्या दुष्टचक्रामधून सुटण्यासाठी, ही माणसं प्रजनन साहाय्य तंत्रज्ञानाच्या आहारी जातात. मात्र आक्रमक आयव्हीएफ, आयसीएसआयसारख्या उपचार पद्धती; अंडाशयांना अतिउत्तेजित करून प्रजनन घडवून आणणं; आणि धंदेवाईक सरोगसी, या गोष्टी नेमक्या कितपत बिनधोक असतात? ‘पॉलिटिक्स ऑफ द वूम्’ हे सिद्ध करतं की सदर प्रजनन साहाय्य उपचार पद्धतींद्वारा मुख्यत्वे काय मिळतं, तर सव्यंग बाळं आणि कणाकणानं विखुरत जाणाऱ्या आया. गर्भाशय रोपणासारख्या पद्धतींकडे पाहण्याचा गुलाबी चष्मा काढणारं; डिझायनर बेबीजबद्दलचं सत्य सांगणारं; जनुकांची सर्रास होत असणारी चोरी दाखवून देणारं; आणि प्रजननाच्या बाजारपेठेत स्त्रीचा कसा वापर केला जाऊन बळी दिला जातो, याबद्दल परखड भाष्य करणारं असं हे पुस्तक आहे. सखोल अभ्यास, तपास आणि विवेचन या सर्व मार्गांमार्फत लेखिका पिंकी विरानी, प्रजननाच्या नावाखाली जगभरात चाललेल्या स्त्रीशोषणाला आवाज फोडते. जागतिक तज्ज्ञ-विशेषज्ज्ञांनी केलेल्या संशोधनांची ग्वाही देऊन, ‘मागणी तसा पुरवठा’ या निलाजऱ्या सबबीखाली भरवल्या जाणाऱ्या प्रजननाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना रोखठोख जाब विचारते. सगळ्या वाचकांना समजेल अशा पद्धतीनं लिहिलेलं हे पुस्तक, कुठलीही कुचराई न करता, जबाबदार प्रजननासाठी प्रत्येकाला सुयोग्य माहिती मिळवण्याचा हक्क कसा आणि का आहे, याबद्दल सुस्पष्ट भाष्य करतं.
-
Ghachar Ghochar (घाचर घोचर)
हातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.
-
The Broker (द ब्रोकर)
राजधानीतील सत्ताधाऱ्यांमध्ये ऊठबस करणारा, सत्ताकारणात कोणाला खाली खेचायचे, कोणाला वर चढवायचे या खेळात भाग घेणारा बॅकमन, हा अनेकांची सरकारदरबारी असलेली कामे पैसे घेऊन करून द्यायचा. त्यामुळे त्याला ‘दलाल’ असे संबोधले जाई. काही कारणाने त्याला तुरुंगवास पत्करावा लागतो. सहा वर्षांनी त्याला माफी मिळाल्याने तो सुटून बाहेर येतो. बॅकमन सुटल्यावर त्याला अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संघटना सी.आय.ए. देशाबाहेर नेऊन ठेवते. त्याला नवीन नाव, नवीन ओळख व एक नवीन घर दिले जाते. तो आपल्या नवीन आयुष्यात स्थिर झाल्यावर त्याचा नवीन पत्ता अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांना दिला जातो. कोण पुढे येऊन मारतो आहे, हे सी.आय.ए.ला ठाऊक करून घ्यायचे असते; पण या सगळ्या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळते. सी. आय. ए.च्या या योजनेची कल्पना बॅकमनला असते का, या योजनेला जी भलतीच कलाटणी मिळते, त्यात बॅकमनच्या अक्कलहुशारीचा भाग असतो का, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘द ब्रोकर’ वाचलंच पाहिजे. ‘पुढे काय झाले’ ही उत्सुकता ग्रिशॅमने कायम ठेवली आहेच.
-
Rajashri Shahu Chatrapati : Ek Abhayas (राजर्षी श
तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे. अस्पृश्यतानिवारण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दुष्काळावर आणि साथीच्या रोगांवर केलेली मात, आरक्षण, मुलींचे शिक्षण, आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा कायदा, फासेपारधी वगैरेंचे पुनर्वसन, जलसंधारण, चहा-कॉफी लागवड इ. प्रकारे सामाजिक जीवनाच्या असंख्य क्षेत्रांमध्ये ‘राजर्षी शाहूंनी’ काळाच्या पुढे पावले टाकली असे दिसते. काळ राजाला घडवतो की राजा काळाला घडवतो, याचे ‘राजा कालस्य कारणम्’ हे प्राचीन काळी देण्यात आलेले उत्तर भारताच्या इतिहासातील ज्या मोजक्या राजांना यथार्थतेने लागू पडते, त्यांमध्ये शाहू महाराजांचे स्थान फार वरचे आहे, यात शंका नाही. वसुधा पवार यांच्या प्रस्तुत पुस्तकातून हे सर्व उत्तम रीतीने व्यक्त झाले आहे.
-
Chatrapati Sambhaji (छत्रपती संभाजी)
"छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूâर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजांचे गुणविशेष अधोरेखित करणारी कागदपत्रं, यांचा सम्यक आढावा घेणारं पुस्तक म्हणजे...‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा.’ संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणाNया विविध ऐतिहासिक साधनांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. त्याचं कारण काही ऐतिहासिक कागदपत्रांत असं सांगितलं गेलं आहे, की एका ब्राह्मणकन्येवर संभाजीराजे फिदा झाले होते. तिच्याशी त्यांचे अनैतिक संबंध होते. शिवाजी महाराजांना हे समजल्यावर ते संतापले. आता ते आपल्याला कडक शिक्षा देतील असं संभाजीराजांना वाटलं. म्हणून ते मोगलांना जाऊन मिळाले. काहींच्या मते रायगडावर हळदी-वुंâकवासाठी आलेल्या एका ब्राह्मण युवतीवर संभाजीराजांनी बलात्कार केला. त्याबद्दल शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करतील या भीतीने ते मोगलांना जाऊन मिळाले. आपली चूक उमगल्यावर ते स्वराज्यात परत आले. त्यांची आणि शिवाजी महाराजांची दिलजमाई झाली; पण संभाजीराजे मोगलांकडून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीचंही काही इतिहासकारांनी विपर्यस्त वर्णन केलं. त्यानंतर थोड्याच अवधीत शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला, असाही एक आरोप संभाजीराजांवर केला गेलेला काही कागदपत्रांत आढळतो."
-
Shivachatrapati (शिवछत्रपती)
"राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "
-
Rajarshi Shahu Chatrapati : Ek Magova (राजर्षी शाह
राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत. याशिवाय दोन लेख कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेले ‘शोधनिबंध’ आहेत. ‘ब्राह्मण ब्युरॉक्रसी’ व ‘क्षात्रजगद्गुरू’ या विषयांवरील लेख २००१ मध्ये आम्ही प्रकाशित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’या ग्रंथातून घेतले आहेत. अखिल भारतीयांचा उद्धार करण्याचे व्रत घेतलेल्या या थोर पुरुषाचा तत्कालीन वरिष्ठ वर्णीयांच्या इंग्रजांविरुद्ध चालविलेल्या स्वराज्याच्या हक्काच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन काय होता, हे त्यावरून समजून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचा लढा अशा दुसऱ्याला स्वातंत्र्याचे हक्क नाकारणा ऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांविरुद्ध होता. इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्याचे हक्क मागणारे लोक आपल्याच देशातील आपल्याच बांधवांना सामाजिक स्वातंत्र्याचे, सामाजिक न्यायाचे हक्क नाकारत होते. इतिहासाचे विकृतीकरण करणा ऱ्याना सत्येतिहासाचे सादरीकरण करूनच उत्तर देणे, हा सुसंस्कृत समाजाचा राजमार्ग मानला जातो. प्रस्तुत संग्रहातील कोल्हापूर गॅझेटिअरवरील लेख या मार्गावरील लेखकाच्या मतानुसार केलेली वाटचालच आहे.
-
Dr. Anand Yadav -Ek Sahityik Pravas (डॉ. आनंद यादव
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
-
My Daughter My Mother (माय डॉटर माय मदर)
"१९८४ साली एका शिशु खेळगटात दोन आया एकमेकींना भेटतात. त्यांची मैत्री वाढत जाते आणि त्या आपलं आयुष्य एकमेकींसोबत वाटून घेतात– अगदी सगळ्या रहस्यांसकट. जोआन – गोड, लाजरी मुलगी जिला दिवसेंदिवस स्वत:च्या नवऱ्याची भीती वाटते आहे. तिने ज्याच्यावर प्रेम करून लग्न केलं तो देखणा, हसतमुख तरुण हिंसक, विरोधात जाणारा का होतो आहे; हे तिला उमजेनासं झालं होतं. हे इतर कुणालाही सांगायची तिला लाज वाटत होती. जोआनची आई – मार्गारेट –हिला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तेव्हा प्रथमच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे कळलं की, आपल्या आईच्या आयुष्यात असं बरंच काही घडून गेलंय, ज्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही. मार्गारेटला युद्धकाळात सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं आणि तिने आपलं उभं आयुष्य त्या आठवणी गाडून टाकण्यात घालवलं. सुकी – जिने एका लग्नाचा भयाण अनुभव घेतला असून, सध्या स्वत:च्या माहेरी राहते आहे. अशा रीतीने ‘बदनाम’ होणं सोपं नव्हतं. तिच्या आईने – मीनीने – तिच्याबरोबर अबोला धरला आहे. सुरुवातीला हा अबोला सुकीला न केलेल्या गुन्ह्याची अन्याय्य शिक्षा वाटत होता. पण हळूहळू तिला कळत गेलं की, तिच्या आईच्या मनात खूप विचित्र गुंतागुंत आहे. हा अबोला फक्त वरवरचा आहे आणि तिच्या आईला तिची – तिच्या मुलीची – नितांत गरज आहे. ही गोष्ट आहे दोन अस्वस्थ, तरुण मुलींची ज्यांना अपघातानेच आपापल्या आयांच्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्यं समजतात. आई मुलीला कसं घडवते आणि मुलीकडून जगणं कसं शिकते, याची सुंदर गोष्ट! भूतकाळात अडकलेल्या आया आणि वर्तमानाला आव्हान देऊन भविष्य घडवू पाहणाऱ्या त्यांच्या तरुण मुलींची कहाणी! "
-
Tinka Tinka Tihar (तिनका तिनका तिहार)
महिला कैद्यांच्या मनातल्या अगतिकतेचं मनोबलात रूपांतर करण्याच्या भावनेला मूर्त रूप देण्याचंच फलित म्हणजे हे पुस्तक. तिहारमधील बंदी महिलांनी आपली व्यथा मांडणाऱ्या, आयुष्य सावरण्याची स्वप्नं पाहणाऱ्या काही भावना आपल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत.
-
Samudrakathache Ek Varsh (समुद्राकाठाचे एक वर्ष)
‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.
-
Matiche Mama Avaghe Jivan (मातीचे मम अवघे जीवन)
‘द डर्टी लाइफ’ कथा आहे मुक्त पत्रकार असणारी क्रिस्टीन आणि शेतकरी मार्क यांची. शहरी जीवनात रमणारी क्रिस्टीन शेतकरी मार्कची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने त्याच्या गावी जाते. हाडाचा शेतकरी असणाऱ्या मार्कचे रांगडे रूप तिला आवडते. केवळ गंमत म्हणून शिकार न करता आपल्या पिकांचे संरक्षण व अन्न मिळवण्यासाठी शिकार करणारा मार्क तिला प्रभावित करतो. मार्कबरोबर शेतावर राहण्यात, त्याच्या कृषिकार्यात मदत करण्यात तिला आनंद वाटू लागतो. शाकाहारी असूनही मार्कने बनविलेले मांसाहारी पदार्थ तिला चविष्ट वाटू लागतात. मार्कच्या गोठ्यातील डुकरं, कोंबड्या, गाई, घोडे व त्यांच्याशी संबंधित माहितीतही तिला रस वाटू लागतो. मार्क आणि क्रिस्टीन यांच्यातील प्रेम हळूहळू फुलू लागतं. मार्कलाही क्रिस्टीन आवडू लागते. विवाह ठरल्यानंतरचा बराच काळ ते एके ठिकाणी पडीक शेत कराराने घेऊन ते फुलवण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. हळूहळू क्रिस्टीन शेतीसंबंधित सर्व कामे शिकून करू लागते. खरंतर कृषिकर्मांची सवय नसतानाही क्रिस्टीन तिच्या मनातील शहरातील सुखसोयीयुक्त जीवनाचे विचार दूर सारून मार्कच्या प्रेमाखातर त्याच्या बरोबरीने शेतावर कष्ट करते. दोघांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असणारी क्रिस्टीन शेत, पाळीव प्राणी, त्यांचं जीवन याविषयी खूप अनुभव घेते. शहरी जीवनात ज्या गोष्टींपासून ती अनभिज्ञ होती, अशा सर्वच गोष्टी तिला फार जवळून अनुभवायला मिळतात. शेतीकाम करताना करावे लागणारे कष्ट, येणाऱ्या अडचणी यामुळे काही वेळा खचणारी क्रिस्टीन हळूहळू शेतीलाच आपलं सर्वस्व मानू लागते. विवाहानंतर एकमेकांच्या मदतीनं ते आपल्या शेतवाडीला खूपच समृद्ध करतात आणि शहरात वाढलेल्या क्रिस्टीनचे कष्टांनी ‘अवघे जीवन मातीचे’ होऊन जाते.