-
Radhene Odhala Paay ... (राधेने ओढला पाय ... )
जागतिकीकरणानंतरचा मराठी मध्यमवर्ग हा अगदी वेगळाच मध्यमवर्ग आहे. व्हीआरेस, पोरांचे फुगीरतम पगार, परदेशवार्या, ऑरकुट-फेसबुचं मायाजाल, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पूर्णपणे व्यापलेलं जीवन आणि त्यामुळे वाचनसंस्कृतीची लागलेली वाट… अशा वाटेनं चाललेल्या या बदलत्या मध्यमवर्गाला मुकुंद टाकसाळे यांनी आपल्या ‘राधेने ओढला पाय…’ या कथासंग्रहात बरोब्बर चिमटीत पकडलं आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतल्या या कथा वाचताना अनेकांना आपण आपलंच प्रतिबिंब आरशात पाहतो आहोत असं वाटेल. आजची मध्यमवर्गीय कचकडी संस्कृती आणि तिचं हलकांडेपण पाहून वाचकाला हसूही येईल आणि काहीसं अंतर्मुखही व्हायला होईल. ‘चिं. वि. जोशी यांचा वारसदार’ असं सर्टिफिकेट जयवंत दळवी यांनी ज्यांना दिलेलं आहे, त्या मुकुंद टाकसाळे यांच्या आजवरच्या विनोदी लेखन-प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल असा, हा एक पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा – ‘राधेने ओढला पाय…’
-
Sakkali Sakkali (सक्काळी सक्काळी)
`सक्काळी सक्काळी’ सारखं चौफेर हातपाय पसरणारं मोकळंढाकळं सदर आणि तेही रोजच्या रोज सादर करणं हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. मुकुंद टाकसाळे यांचा विनोद सदैव ताजातवाना, सहज, निर्मळ आणि निकोप असतो. तो सवंग नसतो. म्हणून सर्वांनाच तो लोभावतो. त्यांच्या लोकमान्य लिखाणामागे एक संवेदनाक्षम, धीरगंभीर, प्रागतिक, चिकित्सक दृष्टी आहे हे नि:संशय. मुळात त्यांची वृत्ती आशावादी आहे. हा आशावादी सूर या ना त्या रुपात पुढच्या त्यांच्या सार्या लेखांमध्ये झिरपत राहतो. मला भावलेला त्यांचा आणखी एक वृत्तिविशेष म्हणजे जे जे नित्यनूतन त्याचे स्वागत करण्याचा त्यांचा भाव. त्यांच्या आशावादी वृत्तीला त्यांच्या कुशल, चित्रमय आणि साहित्यिक शैलीची जोड मिळालेली आहे. रोजच्या रोज सदर सादर करण्याच्या खटाटोपात त्यांच्या लेखनाची प्रसन्नता ढळत नाही. (प्रा. राम बापट यांच्या प्रस्तावनेतून) समाजकारण, राजकारण, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात `सक्काळी सक्काळी’ फिरवून आणणारे वाचनीय लेखन.
-
Aankhin Gamatigamatit (आणखी गमतीगमतीत)
मुकुंद टाकसाळे हे आजच्या विनोदी लेखकांपैकी एक लोकप्रिय लेखक. त्यांचा विनोद आजच्या पिढीला अधिक जवळचा वाटतो. कारण तो निर्मळ तर आहेच, परंतु तो या पिढीच्या दैनंदिन जीवनातला आहे. `रविवारच्या लोकसत्ते’मधील `गमतीगमतीत’ या गाजलेल्या सदरातल्या निवडक लेखांचा हा संग्रह `आणखी गमतीगमतीत’ या नावाने दुसर्या भागात प्रसिद्ध होत आहे. सरत्या शतकाच्या किंवा सहस्रकाच्या अखेरीस सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक महाराष्ट्र कसा होता याची विनोदी अंगांनी लिहिलेली ही बखरच म्हणता येईल.
-
Undaravlokan (उंदरावलोकन)
2004 साली दर रविवारी `रविवार सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांतून - `सण्डे का फण्डा’ हे सदर प्रसिद्ध होत होतं. त्या सदरातील निवडक लेखांचा हा संग्रह - `उंदरावलोकन’. `सदर’हू काळात `शायनिंग इंडिया’ ही कॅम्पेन जोरात होती. `रालोआ’ सणकून आपटली आणि सोनिया गांधी यांना `तुम्ही पंतप्रधान व्हा’ असं कॉंग्रेसजन म्हणू लागले, तोच हा काळ. सुषमा स्वराज रागानं बेभान होऊन मुंडण करायला निघाल्या होत्या आणि पंतप्रधानपद न स्वीकारून सोनिया गांधींनी भाजपच्या मुखंडांना धोबीपछाड घातली, तोच हा काळ. मोठा मजेचा काळ होता तो. या हलकांड्या काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला हा समाचार. या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल, मॉल, मिडिआ, मल्टिप्लेक्स, मल्टीनॅशनल अशा अनेक `म’कारांची या काळात एकदमच चलती झाली. त्याच बरोबर शेतकर्यांच्या आत्महत्यांनाही याच काळात मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. मॉलची उंची वाढत गेली आणि सामान्य माणूस छोटा छोटा होत गेला – अगदी उंदराएवढा – तो याच काळात. सामान्य माणसाच्या दृष्टीतून त्या काळाचं केलेलं हे अवलोकन – म्हणूनही `उंदरावलोकन’ !