-
Anhad (अनहद)
अनहद' हा मनातील निःशब्द शांततेला शब्दांत उतरविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण ललितघाट. चिमुकल्या काळातील हा हृदयसंवाद आहे. 'तो' आणि 'ती' यांच्याबरोबरच 'स्व'शी तसेच सृष्टिविषयीची ही अनावर अशी संवादरूपे आहेत. या लेखनविश्वात प्रत्यक्षातल्या जगापेक्षा एका वेगळ्या जगाची खेच आहे. ते जग म्हणजे भूतकाळ, आदिमता आणि अमूर्ताचे जग. प्रत्यक्षातले जग हे मानवी अस्तित्व छाटणारे जग आहे. या जगात आणि स्वप्नसृष्टीत ताणतणाव आहेत. त्यामुळे भोवतालच्या जगाला म्यूट करून विहिरीतळातील जिवंत झऱ्यांच्या सृष्टीबद्दलचा जिव्हाळाभाव त्यामधून प्रकटला आहे. त्याच्या जोडीला चंद्र चांदवा, चांदणं, चांदुकली, जलदेवता आणि झाडफुलांच्या मोहमायारूपी ऋतुचक्राच्या नांदवणुकीचे भरगच्च संदर्भ आहेत. एका अर्थाने या जगात झेपविसावा आहे. टेकडीबाईच्या त्रिकोणाची हवीहवीशी नजर आणि अनेक 'हाकां'चे ध्वनी - प्रतिध्वनी आहेत. याबरोबरच काव्यनिर्मितीची अनामिक हुरहुर आणि त्या तरुतळी विसरलेल्या गीतांचा आठव आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात खास भारतीयत्वाचे संदर्भ आहेत. त्यामुळेच आभाळओल्या हळदकुंकवाच्या ओढीचा स्त्रीचिंतनाचा पैस त्यास लाभला आहे. स्वप्नील जगाबरोबर काही प्रमाणात गतकातरता, रोमँटिकतेच्या आकर्षणाबरोबरच सहजसंवादी सलगीची भाषा, काव्यात्मता, चिंतनशीलता, दृश्य रंगसंवेदनांचे घनदाट प्राचुर्य, संगीतादिचित्रांचे संदर्भ, हिंदी-उर्दूतील मिठीजुबान आणि मोहक शब्दकळेचे आकर्षण ही या गद्याची वैशिष्ट्ये होत. भाषेतील पद्मनादमेळाचे विलक्षण आकर्षण या गद्यशैलीस आहे. त्यामुळे, या ललितगद्यास खुल्या प्रसरणशील ललितगद्याचा घाट प्राप्त झाला आहे. 'अनहद' नादाचे प्रतिध्वनी वाचकांना बहुमुखी अर्थवलयांचा नक्कीच भरगच्च प्रत्यय देतील. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे
-
Nani Palkhiwala (नानी पालखीवाला)
नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील' हे पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. ते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू आपणास दाखवते. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले, की पुस्तकाचा आशय खूप विस्तृत व अंतरंगाला भिडणारा आहे. हे पुस्तक ॲड. विजय गोखले यांनी मोठ्या प्रयासाने, अभ्यासपूर्ण असे लिहिलेले आहे व मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेले आहे. नानाभॉय आर्देशीर पालखीवाला ह्यांना सर्व नानी पालखीवाला या नावाने ओळखतात. पुस्तकाचे नावच त्यातील आशय दर्शवते. नानी पालखीवाला यांच्या स्वभावातील व आयुष्यातील वेगळे पैलू लेखकाने वाचकांच्या समोर समर्पकपणे मांडले आहेत. 'नानी पालखीवाला ही परमेश्वराने भारताला दिलेली देणगी आहे' हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी काढलेले उद्गार यथोचित आहेत. नानी पालखीवाला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते कायदेपंडित तर होतेच, शिवाय एक निष्णात अर्थतज्ज्ञ, करतज्ज्ञ व उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे वादातीत व असामान्य होते. ही असामान्यता त्यांना मिळालेली जन्मजात किंवा निसर्गदत्त देणगी नव्हती तर त्यांनी प्रचंड मेहनत व प्रयत्न यांच्या साहाय्याने ती विकसित केली होती. लहानपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी होते व एखादे काम करायचे ठरवल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा ध्यास घेत व ते पूर्ण झाल्यावरच स्वस्थ बसत. त्यांना लहान-पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरील पुस्तके ते वाचत असत. त्यांच्या वाचनछंदाच्या अनेक मार्मिक गोष्टी व किस्से लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत.
-
Niragastecha Najarana (निरागसतेचा नजराणा)
बालकांच्या मनोविश्वातील स्वर्गीय रंगांची दुनिया कलावंत किती संवेदनशीलतेने... तरलतेने आपल्यासमोर खुली करतात. बालमनाची निरागसता केवळ मौनातून, मंद-स्मितातून बोलती करतात. बालकांचे निरभ्र... नितळ... निर्मळ मन... जाती, धर्म, देश, रंग, रूप यांच्या सीमा पार करून आपल्याशी संवाद साधतं. कोमेजलेल्या मनाला पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यांचं रूपडंच मुळात आरस्पानी! त्यांच्या पारदर्शीपणात आपण आपलं प्रतिबिंब पहावं... आणि आपणच लख्ख होऊन जावं !!
-
Charles Darwin (चार्ल्स डार्विन)
डार्विन या शास्त्रज्ञाच्या आठवणीचा कोलाज असं या आत्मचरित्राच्या अनुवादाचं वर्णन करता येईल. एका थोर वैज्ञानिकाचं जगणं सर्वसामान्य जनतेसमोर त्याच्याच शब्दांतून मांडण्याचा हा अनुवादी प्रयत्न निःसंशय कौतुकास्पद आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक याविषयी आपल्या समाजातील उदासीनता दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या वेधक शैलीतील लिखाणाची आज खरोखरच गरज आहे. एका वैज्ञानिकाच्या आत्मचरित्राच्या निमित्तानं वैज्ञानिकाचं अंतरंग, त्याची मानसशास्त्रीय जडणघडण, विज्ञान क्षेत्रातील त्याचा सर्जनशील प्रवास याला भिडणारं असं हे पुस्तक आहे
-
Sapienscha Janak : Yuval Noha Harari (सेपियन्सचा जनक युवाल नोआ हरारी)
युवाल नोआ हरारी याने मानवाच्या उत्क्रांतीपासून ते त्याच्या भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंतच्या आपल्या विचारांनी जगाला हादरवून टाकले आहे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याची 'सेपियन्स', 'होमो डेअस' आणि '21 लेसन्स फॉर द 21" सेंच्युरी' ही पुस्तके माणसाच्या जीवनाचा अभ्यास करतात. त्याच्या या अभ्यासपूर्ण चरित्रात त्याची जडणघडण, निसर्गाने त्याच्यावर केलेल्या अन्यायावर त्याने मिळविलेला विजय, त्याचे तत्त्वज्ञान आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाला आकार देणारे निर्णायक क्षण यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांमागील प्रेरणा, मानवी इतिहासावरील त्याचे प्रतिबिंब आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तो सुचवत असलेले मार्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासकाराबरोबरच व्यक्तिगत बाजू म्हणजे शाकाहारी, ध्यान करणारा आणि या गुंतागुंतीच्या जगात स्पष्टतेचा पुरस्कार करणारा हरारी, तुम्हाला या चरित्रातून दिसेल. तरुण पिढीचा आयकॉन असलेल्या हरारीचे हे चरित्र निव्वळ एका यशस्वी व्यक्तीचे नसून, ते एका विचारवंताची जडणघडण उलगडणारे आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ संपादक)
-
Born A Crime (बॉर्न अ क्राइम)
भिन्न वंशाच्या-वर्गाच्या स्त्री-पुरुषांमध्ये घडणाऱ्या शरीर-संबंधांवर प्रतिबंध घालणारा एक कायदा एकेकाळी दक्षिण अफ्रिकेत अंमलात आणला होता. परिणामी अशा जोडप्यांची मुलं या कायद्यामुळे गुन्हेगार म्हणूनच जन्माला यायची. अशा परिस्थितीत एका आग्रही, व्यवस्थेला फाट्यावर मारणाऱ्या कृष्णवर्णीय तरुणीने आपल्या युरोपियन गोऱ्या प्रियकरासोबत एक निर्णय घेतला... मुलाला जन्म देण्याचा आणि ते मूल एकटीने वाढवायचा. तिने जाणतेपणी, ठरवून हा गुन्हा केला आणि त्यातून ‘ट्रेवर नोआ' जन्माला आला. अशा परिस्थितीत वाढतानाचे ट्रेवर नोआचे अनुभव आणि असं मूल पदरी असताना, त्याला वाढवतानाची त्याच्या आईची उडणारी त्रेधातिरपिट याची भेदक, मजेशीर, स्पष्ट कथा म्हणजे ‘बॉर्न अ क्राइम' हे हृदयस्पर्शी आत्मचरित्र होय. मुख्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेतलं वातावरण कितीही क्रूर असलं तरी या दोघांच्या नात्यामुळे ही गोष्ट एका उंचीवर पोहोचते. वर्ग, वर्ण, लिंग याबद्दलची आपली समज अधिक गहिरी होते. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे...