-
Harit Hindutva (हरित हिंदुत्व)
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.
-
Nadishta (नदिष्ट)
विषय चाकोरीबाहेरचा आहे .शैली पहिल्या धारेची आहे .थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे .'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही . तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. 'नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.
-
99 Ganesha Chintan (९९ गणेश चिंतन)
क्रिकेटच्या खेळात, ९९ धावा काढल्यानंतर, जेव्हा एक फलंदाज त्या प्रतिष्ठित शतकाच्या उंबरठ्यावर उभा राहतो, तेव्हा तो गणेशाशी संबंधित असलेल्या क्षणाचा अनुभव घेतो . भीती आणि अनिश्चितता त्याला वेढून टाकते; त्याच्या आणि त्याच्या यशामध्ये वास्तविक आणि काल्पनिक दोन्ही प्रकारचे अडथळे असतात: गोलंदाजाचा संभाव्य फिरकी त्याला व्यापून टाकू शकतो, त्याची स्वतःची चिंता त्याला लकवा देऊ शकते, जयजयकार करणारे चाहते त्याचे लक्ष विचलित करू शकतात . तेव्हा त्याला दैवी हस्तक्षेपाची आवश्यकता असते. त्याला लक्ष केंद्रित करावे लागते, सर्व अडथळ्यांपासून मुक्त व्हावे लागते, कामगिरी करावी लागते, अंतिम धाव घ्यावी लागते आणि त्याला जे हवे आहे ते साध्य करावे लागते. दुसऱ्या शब्दांत, त्याला गणपतीचा विचार करावा लागतो. अडथळे दूर करून समृद्धी आणि शांती आणणाऱ्या त्या आराध्य हत्तीच्या डोक्याच्या हिंदू देवाच्या कथा, चिन्हे आणि विधी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे पुस्तक ९९ ध्यान एकत्र करते . गणपती, गजानन, विनायक किंवा पिल्लयार म्हणून ओळखले जाणारे , तो आपल्या सर्वांना जीवन नावाच्या खेळात शतक झळकावण्यास मदत करू शकतो .
-
That Night (दॅट नाइट)
काय होईल, जेव्हा एखादा साधासा खेळ एका भयंकर गुन्ह्यात बदलेल? नताशा, रिया, अंजली आणि कॅथरीन, कॉलेजमधल्या एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी. एकमेकांपासून भिन्न; तरी एकमेकांसोबत असलेल्या... निदान त्या रात्रीपर्यंत तरी... तीच ती रात्र, जी त्यांच्या आयुष्यात आली होती. जिची सुरुवात तर एका व्हिस्कीच्या बाटलीने आणि औईजाच्या खेळाने झाली होती; पण ती संपली मात्र त्यांच्याच वसतिगृहात राहणाऱ्या त्यांच्या एका नकोशा मैत्रिणीच्या मृत्यूने...सानियाच्या मृत्यूने. त्यानंतर त्या मैत्रिणींनी त्या भयंकर रात्रीची पुन्हा उभ्या आयुष्यात कधीही चर्चा न करण्याचे वचन एकमेकींना दिलं. जणू ते वचन एक करार होता, ज्याने त्यांची मैत्री आणि तो अपराध गेल्या वीस वर्षांपासून दडपून ठेवला होता. मात्र, आता कोणीतरी त्या सगळ्यांशी नवा खेळ खेळायला सुरू केले होते. जे सत्य फक्त सानियालाच माहीत होते, ते उघडकीस आणण्याची सरळ सरळ धमकीच त्यांना दिली होती. कोण होतं ते... एखादा हॅकर त्यांच्या या अपराधी मानसिकतेशी खेळत होता की सानियाचे भूत खरोखरच तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परतले होते? चेहरा नसलेला शत्रू त्यांच्या खूप जवळ पोहोचला असताना, त्या रात्री खरोखर काय घडले होते ते जाणून घेण्यासाठी त्या चार मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र येतात. पण जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण आपापली कथा पुन्हा सांगतं, तेव्हा त्या रात्रीचे सगळे विस्कळीत तुकडे नीट जुळत नाहीत. कारण त्यांच्यापैकी कुणीही त्या रात्रीचं संपूर्ण सत्य सांगत नसतं. 'ती रात्र' ही मैत्रीची आणि विश्वासघाताची एक गडद, प्रचंड गुंतागुंत असलेली कथा आहे, जी तुम्हाला तिच्या हरएक वळणावर संमोहित करेल आणि गोंधळात टाकेल.
-
Parkiyanchya Najaretun Chatrapati Shivaji Maharaj (परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज)
Foreign Biographies of Chhatrapati Shivaji परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज Parkiyanchya Najaretun Chhatrapati Shivaji Maharaj By Surendranath Sen छत्रपती शिवाजी महाराज असतानाच त्यांची कीर्ती युरोप पर्यंत पोचली होती. महाराजांचे ऐतिहासिक कर्तृत्व, साहसी कृत्य व चतुर युद्धनीती यांना तत्कालीन इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच इतिहासामध्ये उचित स्थान प्राप्त झाले होते. Cosme da Guarda, Jean de Thevenot, Barthelmy Carre, François Martin, François Valentine यांनी शिवाजी महाराजांचे लिहिलेले संक्षिप्त चरित्र तसेच डच रेकॉर्ड्स मध्ये महाराजांचे उल्लेख देखील ह्या पुस्तकात वाचायला मिळेल..
-
Hi Medha Kon (ही मेधा कोण)
जनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
-
Rayari (रायरी)
एकविसाच्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवत ? खर प्रेम काय ? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? खरे शिवभक्त कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'रायरी' आहे.
-
Venkatesha(वेंकटेशा)
प्रेम, विरह, ओढ, माया, काळजी, सुख-दुःख, करुणा, कर्तव्य आणि वचनपूर्ती ह्या भावभावना साक्षात नारायणालाही चुकल्या नाहीत. तो देखील ह्या भावना जगतो, अनुभवतो आणि निभावतो. परंतू जेव्हा तो निभावतो तेव्हा समस्त संसारासाठी तो एक आदर्श ठेवतो. ही गोष्ट आहे अश्याच भावभावनांची, नात्यांची, प्रेमाची, प्रतिक्षेची…. वेंकटेशाची ! वाचा वेंकटेश अवताराची संपूर्ण कथा.
-
Sattak (सट्टक)
"सट्टक हा कवी भालचंद्र नेमाडे यांचा काव्यसंग्रह, देखणी (मेलडी आणि देखणी एकत्रित - 1991 (प. आ.)) नंतर तब्बल पस्तिसेक वर्षांच्या अंतराने प्रकाशित होत आहे. कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा संग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी, दुय्यम पातळीवर ढकललेला शोषित जीव हे घटक या कवितेच्या केंद्रभागी आहेत. वास्तविक सट्टक म्हणजे आजच्या मूल्यऱ्हास झालेल्या जगण्यावर ओढलेला प्रखर आसूड आहे. सट्टक मधील कविता चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाई, बहिणाबाई, महात्मा फुले, मर्ढेकर यांच्या गद्य व पद्य परंपरेशी थेट नाते सांगते. सट्टक मधील ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कवी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडवा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. ‘घराघरातून’ या पहिल्या कवितेपासून ते ‘स्व’ ह्या अखेरच्या दीर्घ कवितेपर्यंत अस्वस्थ व सळसळते, करुणेने भरलेले कविहृदय प्रत्ययास येते. कवी भालचंद्र नेमाडे यांच्या प्रतिभाशक्तीचा संचार तळागाळापासून ते प्रस्थापित, उच्चभ्रू व्यवस्थेला, कधी पित्तृसत्ताक तर कधी मातृसत्तात्मकतेला कसा भेदत जातो याची येणारी प्रचीती सट्टक मध्ये अधिक तीव्र स्वरूपाची आहे. सत्तात्मक संबंधांतून आकारलेल्या शोषितांच्या वेदनांची कैफियत हा सट्टकचा केंद्रबिंदू असून कवीच्या संचित मनशक्तीतून, अनुभूतींतून, वास्तवाच्या प्रामाण्यातून ह्या कवितांचा आकृतिबंध साकारलेला दिसतो. ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ हे तिन्ही विभाग चढत्या क्रमाने वाचकाच्या मेंदूचा कब्जा घेतात. एकूण सट्टक कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा काव्यसंग्रह आहे. जगण्याच्या संचिताचा चटका लावणारा ‘सरवा’ वेचत स्त्री-पुरुषांतील ठराविक नात्यापलीकडची शुद्ध मोकळीक, माणुसकीची नाती ‘अस्तुरीमृग’ मध्ये साकारतात. प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे वाचकाला सुन्न करून सोडतात. ‘अस्तुरीमृग’मधील कविता म्हणजे वेदनेचा दुखरा स्वर आहे. तर ‘मृत्यू’ या शेवटच्या विभागात कवी भालचंद्र नेमाडे यांचे श्रेष्ठ कवित्व गूढ उत्कटतेची परिसीमा ओलांडते. सट्टकचा आशय जसा अनवट आहे तसाच आकृतिबंधसुद्धा कोणत्याही परंपरेत बसवता न येणारा स्व-तंत्र आहे. लोकसंगीताची लय अंगात भिनवून ही कविता मौखिक परंपरेला स्वतःशी जोडून घेत संत परंपरेला आपलेसे करून स्वतःचे नवे प्रारूप घडवते. सट्टक हा काव्यसंग्रह मराठी कवितेला नवा आयाम प्राप्त करून देतो हे विशेषत्वाने नोंदवले पाहिजे. — शोभा नाईक "
-
Natyabhaarati (नाट्यभारती)
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'.
-
Yashodhara (यशोधरा)
या कांदबरीत गौतम बुद्धाच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या अशा काही रिकाम्या जागा अत्यंत कल्पकतेने आणि काही तीव्र भावनिक प्रसंगांच्या, भावनिक संघर्षांच्या आधाराने भरून काढण्यात आल्या आहेत. सिद्धार्थला एका वाटिकेत भेटलेली ही तरुणी कोण होती आणि जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कशामुळे बदलत गेला? वयाच्या सोळाव्या वर्षी तिने सिद्धार्थशी विवाह केला. त्या वेळी तिला कल्पना तरी होती का की, अगदी थोड्याच काळानंतर तिचं वैवाहिक आयुष्य एक अगदी संपूर्ण अपरिचित असं वळण घेणार आहे? या स्त्री-पुरुष समान नात्याचा पुरस्कार करणार्या कादंबरीतून आपल्याला भेटणारी यशोधरा ही बुद्धिमान आणि दयाळू वृत्तीची आहे आणि आध्यात्मिक बाबतीतलं ज्ञान पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मिळायला हवं, हा विचार समाज मनात रुजवून स्त्रियांना त्या वाटा मोकळ्या करून देण्याचा ध्यास तिच्या मनाने घेतलेला आहे.
-
Jahannam - Pratima Joshi Yanchya Nivadak Katha (जहन्नम : प्रतिमा जोशी यांच्या निवडक कथा)
मराठी साहित्याच्या वर्तुळात पत्रकार- साहित्यिक ही काही नवलाची गोष्ट नाही. प्रतिमा जोशी याही आपल्याला पत्रकार म्हणून परिचित आहेत. विशेषतः त्यांच्या वार्तापत्रांत असलेला परिघावर जगणाऱ्या माणसाविषयीचा आपुलकीचा स्वर आपल्याला ओळखीचा आहे. पण हा आपुलकीचा स्वर भावविवश होत नाही, कारण प्रतिमा जोशी यांना व्यवस्था आणि व्यवस्थाबदलाची कणखर वास्तवता परिचित आहे. प्रतिमा जोशींच्या कथेकडे पाहताना जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या निवेदकाचा ननैतिक दृष्टिकोन! त्यांच्या कथेतील निवेदक समाजमान्य नैतिकतेचे मापदंड मानीत नाही पण त्याहीपलीकडची माणसामाणसातील गाभ्याची नैतिकता त्यांच्या निवेदनातून व्यक्त होते. एखाद्या वादाची छत्री मिरवत माणसाच्या वागणुकीचा योग्य-अयोग्य न्याय करण्याची भूमिका या कथांत नाही. तरीही माणूस माणसाला किती विविध तन्हांनी छोटा करतो याविषयीची जाणीव या कथांतून व्यक्त होते. या सर्वच कथांत लेखिकेने वातावरण, पात्रधर्म यांच्याशी भाषेचे रूप मिळतेजुळते राखले आहे. स्त्री कथाकारांच्या आत्ममग्न विमनस्कतेपेक्षा या कथांचे रूप वेगळे आहे.
-
Niramshabeli Dian Fossey (निरामशाबेली डायान फॉसी)
डायाना फॉसी एका सहा फूट उंच अमेरिकन स्त्री. सुखवस्तू घरात जन्मलेली! रवांडात विरुंगा पर्वतराजीतल्या पर्वतीय गोरिलांचं संशोधन करण्यासाठी तिनं कॅरिसोक केंद्र उभारलं. घनदाट जंगलात, दाट धुक्यात, मुसळधार पावसात, मैलोन्मैल अंतर चालत, टोचणाऱ्या गवतपात्यांशी सामना करत तिनं गोरिलांचा अभ्यास केला. ती फक्त संशोधन करून थांबली नाही. गोरिलांचं शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी तिनं आकाशपाताळ एक केलं. हॅलोविन मुखवटा चढवून शिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारी, संकटप्रसंगी अतुलनीय धैर्य दाखवणारी, शेवटपर्यंत हार न मानणारी, आणि काहीसं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व असणारी ही डायान पर्वतीय गोरिला ही महान प्रजाती आजही टिकून आहे ते मुख्यत: डायनच्या अविरत प्रयत्नांमुळेच! तिनं जिवावर उदार होऊन दिलेल्या लढ्यामुळे! गोरिलांवर तिच्याइतकं निस्सीम प्रेम इतर कोणीही केलं नसेल! तिची, तिच्या आफ्रिकन साहसाची आणि तिला खरोखरच प्राणांहून प्रिय असलेल्या गोरिलांची ही रोमहर्षक कथा... Nyiramachabelli Dian Fossey : Ruta Ranade निरामशाबेली डायान फॉसी । ऋता रानडे
-
Karnaputra Ani Janmarahasya Part - 2 (कर्णपुत्र आणि जन्मरहस्य - भाग 2)
कर्णपुत्र आणि अस्त्र'या पहिल्या भागाला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागासाठी अनेकांनी लिखित अभिप्राय पाठवले. त्याअभिप्रायातून मला काहींनी प्रश्नही विचारले. त्यात सर्वात जास्त जे प्रश्न आले ते म्हणजे, सुवेधच्या जन्माचं रहस्य काय ? तो नक्की कोणाचा पुत्र आहे? नदीकाठावर त्याच्याशी कोण बोलतं ? वगैरे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला, धर्माक्षीबरोबर त्याचा विवाह दुसऱ्या भागात तरी होणार की नाही ? प्रस्तावनेत ही कादंबरी काल्पनिक आहे हे सांगूनदेखील अनेकांना ही सत्य घटनेवर आधारित आहे असं वाटलं किंवा वाचताना त्यांना ती तशी वाटली. तर एका चोखंदळ वाचकाने पहिल्या भागाइतकाच किंबहुना त्याहूनही सरस असा दुसरा भाग व्हायला पाहिजे हे ठणकावून सांगितलं. तर आमच्या एका सहृदय मित्राने 'इतर सर्व कामे बाजूला ठेवा, आधी दुसरा भाग पूर्ण करा' असंही सांगितलं. अशा शेकडो अभिप्रायामुळे दुसरा भाग लिहिण्यास प्रेरणा मिळाली. मला विश्वास वाटतो की, दुसरा भागही आपल्याला तेवढाच आवडेल, किंबहुना जास्तच भावेल. त्याच्याही प्रतिसादाच्या प्रतीक्षेत मी आहे.
-
Accounting For Dummies (अकाउंटिंग फॉर डमीज)
हसत-खेळत अकाउंटिंग छोटा किंवा मोठा, कोणताही व्यवसाय असला तरी त्यात अकाउंटिंगला फार महत्त्व असतं. अकाउंटिंग हा विषय अतिशय विस्तृत आहे. प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या फायद्यातोट्याचं गणित बसवण्यासाठी अकाउंटिंगची ओळख असणं गरजेचं आहे. अर्थात, त्याचं ज्ञान प्रत्येकाला असेलच असं नाही. अच्युत गोडबोले यांच्या या पुस्तकात अकाउंटिंग या विषयाचे सर्व पैलू अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. या पुस्तकात... अकाउंटिंगच्या भाषेची तोंडओळख फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? कंपनीची फायनान्शिअल पोझिशन कशी समजून घ्यायची? जर्नल आणि लेजर पोस्टिंग कसं करतात? ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? कॅश फ्लो स्टेटमेंटची माहिती शेअर कॅपिटलचे विविध घटक रेशो अॅनॅलेसिस कसा करावा? लायबिलिटीज आणि अॅसेट्स
-
Leading From The Back (लीडिंग फ्रॉम द बॅक)
सुपरस्टार लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकात मिळतील. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांकडून आदर कसा मिळवू शकाल हे तुम्हाला या पुस्तकातून शिकता येईल, तसेच ‘असाध्य ते साध्य’ करण्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता हेही तुम्हाला या पुस्तकात समजेल. त्यासाठी नेतृत्वविषयक असंख्य सिद्धान्त व नियम शिकण्याची गरज नाही, फक्त या पुस्तकात सांगितलेले तीन भागांचे मॉडल पुरेसे आहे, ज्याची आश्चर्यकारक यशस्विता सिद्ध झालेली आहे. उद्योग जगतातील तज्ज्ञ रवि कांत, हॅरी पॉल व रॉस रेक यांच्या अनुभवसंचितातून साकारलेल्या या अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त कथारूप पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी अत्यंत सुबोध व ओघवता अनुवाद केला आहे.
-
Ain Baharat Kaif Kaharat (ऐन बहरात कैफ कहरात)
पारध’ कथेतील गुलछबू युवकाला एक युवती शिकवते चांगलाच धडा... ‘शेंगा’ कथेतील दरिद्री कुटुंबातील दोन निष्पाप जीवांनी महत्प्रयासाने मिळवलेल्या शेंगा पाण्यात वाहून जातात आणि त्यांची शेंगा खायची तीव्र इच्छा अपूर्णच राहते...‘एका शिष्ट मुलीची गोष्ट’ मधल्या संस्कारी, स्वावलंबी तरुणीची प्रेमकहाणी अधुरी राहून तिचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जातो... ‘सांवट’ कथेतील विवाहित नायक दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो... त्याच्या बायकोची संमती असते या प्रेमाला... ‘खोंबारा’ कथेतील म्हादूच्या काळजाला हौशी लग्नाआधीच विधवा झालीय हे ऐकून खोंबारा लागतो...मनाचा ठाव घेणाऱ्या कथांचा संग्रह
-
Gayguli (गायगुली)
‘गायगुली’ या कथासंग्रहातील ग्रामीण भाग आणि त्यातील वास्तव यामुळे या घटना आताच घडल्या आहेत असं वाटण्याइतपत जिवंत आहेत. उदा: ‘नातं’ कथेतील दळप घेऊन येणारा ‘कोकण्या’ असुदे किंवा ‘एक होता सखा’मधला ‘सखा’- दोघांच्याही आयुष्याचं गणित त्यांना न सोडवता आल्यामुळे त्यांचंच मातेरं होतं. ‘तिची गोष्ट’मध्ये ‘सावी’ या जोगतीण तिच्या रटाळ आयुष्याला कंटाळून ती गुन्हेगार कशी होते? आणि याउलट ‘शिकार’मधली ‘ती’ सावज असूनही शिकाऱ्याची- म्हणजे तिचा गैरफायदा घेणाऱ्याची धिटाईनं शिकार कशी करते हा फरकही वाचकाला जगण्यासाठी खूप काही देऊन जातो.