-
The Silent Film (द सायलेंट फिल्म)
भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाचा हा विस्तृत पट आहे. काय केलं नाही दादासाहेबांनी? फोटोग्राफीचा व्यवसाय केला. प्रेस चालवला, नाटक केलं, कलात्मक वस्तू विकल्या आणि चित्रपटाच्या ध्यासाने तर ते ‘भारतीय चित्रसृष्टीचे जनक’ झाले. चित्रपटनिर्मितीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. नावलौकिक, यश आणि पैसाही मिळाला त्यांना चित्रपटनिर्मितीतून; पण व्यवहारज्ञान कमी, शीघ्रकोपी स्वभाव, तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती, हितशत्रूंचा त्रास, सर्वोत्तमाचा ध्यास यामुळे त्यांच्या पैशांना आणि यशाला ओहोटी लागली. यश-अपयशाचा लपंडाव त्यांच्या जीवनात सदैव सुरू राहिला. त्यांचं कलासक्त मन सदैव अतृप्त राहिलं. तर एका कलासक्त जीवनाची ही संघर्षमय कहाणी आहे. मूकपटांच्या इतिहासालाही त्या निमित्ताने उजाळा मिळतो. दुर्मिळ छायाचित्रांनी सजलेला , व्यामिश्रतेने साकारलेला जीवनपट.
-
Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
-
Dnyanyogi Eknath (ज्ञानयोगी एकनाथ)
संत एकनाथांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. एकनाथांच्या घराण्याची पूर्वपीठिका, त्यांचं जन्मरहस्य, त्यांचा जन्म ते त्यांनी घेतलेली जलसमाधी इथपर्यंतचा प्रवास या कादंबरीतून उलगडला आहे. एकनाथांचं बालपण, त्यांचा गुरूशोध, जनार्दन स्वामींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्या सहवासात बहरत गेलेली त्यांची प्रतिभा, शूलभंजन नावाच्या छोट्याशा पर्वतावर त्यांनी केलेली तप:साधना, त्यांनी वेळोवेळी रचलेले अभंग, भारुडं, गवळणी, चतु:श्लोकी भागवताचं मराठीत केलेलं भाषांतर, चातुर्वर्ण्य, शिवाशिव, अस्पृश्यांना मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून-बोलण्यातून व्यक्त केलेली नाराजी, त्यामुळे त्यांना सनातन्यांचा झालेला विरोध, गिरिजेशी झालेला विवाह, ज्ञानेश्वर-माउलींच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचं एकनाथांच्या हातून घडलेलं कार्य इ.प्रसंग-घटनांतून त्यांचं संपन्न गृहस्थाश्रमी आणि आध्यात्मिक जीवन उलगडत जातं. एकनाथांच्या जीवनावरची रसाळ, भावसंपन्न कादंबरी.
-
Iravati Karve (इरावती कर्वे)
डॉ.इरावती कर्वे.पहिल्या भारतीय स्त्री मानव शास्त्रज्ञ! १९२८-३० च्या काळात जर्मनीत जाऊन त्यांनी ‘शारीर मानवशास्त्र’ या विषयात पीएचडी मिळवली आणि आपल्या संशोधनातून तत्कालीन जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांतला आव्हान दिले. भारतात परतल्यावर आपल्या 'शारीर मानवशास्त्रा' च्या अभ्यासाला त्यांनी 'सांस्कृतिक मानवशास्त्र' भारतविद्या, 'वांशिक-एतिहासिक' आणि पुरातत्वशास्त्र अशा विविध ज्ञानशाखाची जोड दिली. परिणामी मानवशास्त्राचा त्यांचा अभ्यास बहुपेडी झाला. 'जात म्हणजे विस्तारित नातेसंबंधांचे वर्तुळ' अशी जातीची व्याख्या करून जातियुक्त समाजाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी त्यांनी रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत दिला... यातूनच 'किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया ' व हिंदू सोसायटी : अँन इंटरप्रिटेशन ' हे मौलिक ग्रंथ आकाराला आले. जे आजही जगभरातील मानवशास्त्र - समाज शास्त्राच्या अभ्यासकांकडून अभ्यासले जातात.' मराठी लोकांची संस्कृती ', ' आमची संस्कृती ', ' संस्कृती ' या ग्रंथातून त्यांनी मराठी संस्कृतीचा शोध घेतला . तसेच व्याख्याने व वैचारिक लेखामधून नवसमाजरचनेचे प्रारूप उभे केले. एव्हढेच नव्हे तर , शारीर सांस्कृतिक मानवशास्त्र व समाजशास्त्र यात काम करणारी विद्यार्थ्यांची एक पिढी घडवली. डॉ. इरावती कर्वे म्हटले की चटकन त्यांचे ' युगांत ' आठवते. त्याशिवाय अनोख्या वाटेवरच्या ललितलेखिका म्हणूनही इरावती कर्वे यांचे नाव आदराने घेतले जाते.परंतु त्यापलीकडे जाऊन ' भारतातील आद्य स्त्री मानव शास्त्रज्ञ ' ही त्यांची ओळख अधिक ठसठ शीत करण्याचा प्रयत्न , म्हणजे त्यांचे हे चरित्र !
-
Aag (आग)
प्रत्येकच माणसात देव आणि दानव दोघांचा अंश असतो. कोणतीही दुर्घटना माणसाची जणू परीक्षाच घेत असते. अशा प्रसंगातच माणसात किती देवत्व आहे आणि किती दानवत्व आहे, ते समजून येते. दुर्घटनेच्या काळातच माणसातलं देवत्व किंवा दानवत्व खऱ्या अर्थाने बाहेर येतं. आग ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. एका धार्मिक कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांचा आगीत होरपळून जीव गेला होता. त्या दुर्घटनेत लोकांचं काय झालं असेल, त्यांची स्थिती कशी झाली असेल, त्याचा विचार यात केला आहे. एखादी दुखद घटना माणसाला कसं हादरवून टाकते, ही त्याची गोष्ट आहे. ही वेदनेची गोष्ट आहे. माणसाच्या नातेसंबंधांचे पदर उलगडवून दाखवणारी ही गोष्ट आहे. एखाद्या दुखद घटनेचा माणसाचा असणारा संबंध सांगणारी ही गोष्ट आहे. ही माणसातल्या देवत्वाची आणि दानवत्वाची गोष्ट आहे.
-
Faceless Facebook (फेसलेस फेसबुक)
फेसलेस फेसबुक : हा विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा आहे. ज्या दोन हातांनी या विश्वनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं, त्या हातांचं निर्विवाद प्रतिनिधित्व आहे. लेखकाने शोधलेली माणसं केवळ काळजात कोलाहल करत नाहीत, तर आपलं स्वतंत्र घर करुन राहतात. ज्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास काळाच्या ओघात नजरेआड होतो, नेमकी तीच माणसं लेखकाला दिसतात आणि लेखक आपल्यासमोर त्यांचं जग रेखाटतो. 'फेसलेस फेसबुक' मध्ये लिहलेली सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती खोल रुजलेली आहेत. बन्याचदा ती माणसं आपल्या सगळ्यांची सावलीसुद्धा झालेली आहेत. पण आपल्याकडून ती दुर्लक्षिली गेली आहेत. त्या माणसांच्या सावलीची कृतज्ञता लेखकाने शब्दात व्यक्त केली आहे. मनोरंजनाचा विडा उचललेला सोंगाड्या बालम, जुन्या वस्तूंशी नातं जोडलेला संग्राहक भगवान, चळवळ जिवंत रहावी यासाठी अहोरात्र झगडून मेलेला राजाराम, माय भगिनींच्या सेवेला आयुष्य समर्पित केलेला अमोल, कुस्तीसाठी जगलेला आणि बैलांसाठी राबलेला मल्हारी अशी सगळी पात्रं डोक्यात झिणझिण्या आणून सोडतात. काळजाची तार छेडतात. या सगळ्या माणसांना समाजाने न्याय दिला का ? हा सवाल उभा करतात. या सगळ्यांच्या गोष्टी मांडताना लेखकाने केलेली शब्दफेकिची जादू नक्कीच भुरळ पाडते. त्यामुळे हि पात्रं आपलीशी होऊन जातात. जगण्याच्या खोल तळाशी जाऊन माणसांच्या भावभावनांचा शोध घेतात. गावाकडील माणसांच्या जगण्यातली अस्सलता आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सर्जनशाळा म्हणजे 'फेसलेस फेसबुक' आहे. मला हे पुस्तक प्रचंड भावलंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षातला 'व्यक्तिचित्रण' मांडणारा उत्तम लेखक म्हणून मी मारुती शिरतोडे यांच्याकडे पाहतो. शरद तांदळे