-
Chakachi Khurchi (चाकाची खुर्ची)
वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते...! सुरवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते; पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व, नसीमा हुरजूक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी.... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. 'फाय फाऊंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, आदर्श व्यक्ती म्हणून केंद्र सरकारने गौरवलेल्या प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन."
-
Madhyaratriche Padgham (मध्यरात्रीचे पडघम)
"तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो... गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा ! पोपटाच्या चोचीसारखं नाक ! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे ! मला तर त्यांच्या डोळ्यांची भीतीच वाटते... ...त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर 'धम धम' वाजवत होतं. त्याच 'धम धम धम' तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक 'गूंऽऽ' असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा 'धम धम' वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय ? बिछान्यात आहेच कोण ? बिछाना रिकामा... डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच ! काळोख... आणि 'धम धम' वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली..." ओळखीच्या - बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणार्या, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणार्या कथांचा हा संग्रह.
-
Andhalyache Dole (आंधळ्याचे डोळे)
वेद मेहता, एका पंजाबी डॉक्टरचा मुलगा. वयाच्या चौथ्या वर्षी वेदचे डोळे आले आणि तो आंधळा झाला. पंचेंद्रियांतले एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे दृष्टी. तीच हरपल्यावर वेदच्या विकासाचे सारे मार्गच खुंटले. पण वेद निसर्गत: बुद्धिमान होता आणि ज्ञानाची त्याची भूक विलक्षण तीव्र होती. पंजाबी घरात जन्मलेला वेद मुंबईमधील दादरच्या अंधशाळेत येऊन दाखल झाला. तिथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर अनेक अमेरिकन विद्यापीठांशी संपर्क साधण्याची त्याने धडपड केली. शेवटी एका विद्यापीठाने त्याला प्रवेश दिला. आंधळा वेद आपल्या व्यंगावर मात करून जिद्दीने अमेरिकेत पोहोचला. तिथे शिकून सवरून मोठा झाला; आणि आज तो तिथला एक नामांकित वृत्तपत्रकार बनला आहे. 'आंधळ्याचे डोळे' हा वेदच्या 'फेस टु फेस' या आत्मचरित्राचा अनुवाद आहे. वेधक आणि रसाळ. कादंबरीहून चित्ताकर्षक आणि काव्याहून हृदयस्पर्शी. अदम्य आत्मविश्वास, तीव्र ज्ञानलालसा आणि अनावर जीवनासक्ती यांची ही प्रेरक आणि सुंदर गाथा आहे.