-
Blasfemi (ब्लास्फेमी)
ब्लास्फेमी म्हणजे ईश्वरनिंदा, ईश्वराबद्दल वाईट बोलणारे. कादंबरीचे हे शीर्षक अत्यंत चपखल आहे. धार्मिक सत्तेच्या जोरावर समाजावर अवलंबित अत्याचार करणारे धर्ममार्तंड, त्यांची क्रूरता, ढोंग हे किती पराको[...]
-
Kabandha (कबंध)
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले. परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का ? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणार्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या सार्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणार्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल. एवढी खात्री नक्कीच आहे.
-
Rangandhala (रंगांधळा)
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी 'खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले ! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखा-यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हाता-याने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे ? अगदी नेहमीच्या वास्तवातून उठवून, रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणा-या, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
-
Paulvatevarle Gav (पाऊलवाटेवरले गाव )
एखादीच रिकामी होडी किनार्याला. संथ पाण्यावरून पक्षी या तीरावरून त्या तीराकडे उडतात. दुपार कलते. थोडी थंड हवा सुटते. कदाचित पाऊसच येईलही... हे तिच्या मनात राहून गेलेलं गाव तिलाही आता इतक्या काळानंतर जसंच्या तसं सापडणार नाही हे तिला कळलं, आता हे पाणी संथ होतं. पण अशाही वेळा असतातचनं की जेव्हा हे बेभान होतं, आपले तट सोडून सैरावैरा धावतं. त्या पाण्याला मग कुणीही कळत नाही. त्या वेळी ते पाणी नसतंच... प्रलयच असतो. तो प्रलय केवळ पाण्यातच शिरत नाही. तो मस्तकातच भिनत जातो. या सगळ्यात माणसाच्या इच्छा अनिच्छेचा सन्मान कुठला !
-
Pravas Eka Lekhkacha (प्रवास एका लेखकाचा )
साहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो, तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचं कवच फोडून वर उसळून येणाऱ्या केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं. असा तो मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या 40 वर्षांतील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.
-
Lakshyavedh (लक्ष्यवेध)
सुलतानी राजवटीविरुद्ध उठाव करून हिंदूंचं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी उभं आयुष्य वेचलं स्वराज्य उभ करताना सुरुवातीला अनेक संकटं उभी राहिली. या संकटापैकी सर्वात पहिलं आणि मोठं संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. प्रचंड सैन्यानिशी खानानं स्वराज्यावर चढाई केली. राजांना जिवंत पकडून नेण्याची त्याची गर्वोक्ती होती. तर खानाला मारल्याशिवाय स्वराज्याबद्दल दबदबा निर्माण होणार नाही हे राजे जाणून होते. शिवाजी अफजल भेटीत जे भीषण नाट्य घडले आणि जी अभूतपूर्व कत्तल मराठ्यांनी केली त्याला इतिहासात तोड नाही. या विलक्षण नाट्याचे चित्रण करणारी ही कादंबरी.
-
Udhan ( उधाण )
श्री. कुंभार गुरुजी यांची कथा प्रामुख्याने ग्रामीण समाजाचे अंतरंग उकलून दाखविणारी आहे. त्यांची कथा वास्तवातील नाट्य हेरणारी आहे. त्यांच्या कथेचा तो गाभाच असतो. ते कथेतील पात्रांना जिवंत करतात. वाचकांसमोर ही पात्रे या संवादांमुळे साकार होतात, त्यांना प्रत्यक्ष समोर घटना घडते आहे, असे वाटू लागते. गुरुजींच्या कथांतील विषयही हलके फुलके, वरवरचे नसतात. या कथा एकूण मानवाच्याच सखोल, सूक्ष्म, तरल मनांचा शोध घेणा-या आहेत. अनेक कथांना शेवटी ज्या कलाटण्या दिलेल्या आहेत; त्यातूनही मानवी मनाची ऐनवेळी आकाराला येणारी वृत्तीच प्रकट होताना दिसते. एकंदरीतच कुंभार गुरुजींच्या कथांचं अनुभवविश्व अंतर्बाह्य विविधतेनं नटलेलं आहे. पात्रांच्या विविधतेमुळे, तिच्यातील कलाटणीमुळे ती वाचकाची उत्सुकता वाढवते, ती वाचकांना गुंगवत ठेवते.
-
Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.