-
Karunashtak (करुणाष्टक )
ही आहे एक कुटुंबकहाणी- दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची. आईचा कडक स्वभाव आणि फाड फाड बोलणं यामुळं दादा तिला म्हणायचे, ‘फौजदार’, पण सगळ्या कुटुंबाला सावली देणारं घर जळलं, दादा खचले, वारले. आणि आई अबोल झाली. स्वत:च्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली. मुलं मोठी होत होती. या मुलांच्या रुपानं आईपुढं आठ समस्या उभ्या राहिल्या. जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. हेच तिचं करुणाष्टक. खरं म्हणजे, कोण्याही आईचं. कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे. तेव्हापासून, आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ-मूल हेसुद्धा आईला ओझंच होऊन राहिलं असलं पाहिजे.
-
Jambalache Diwas (जांभळाचे दिवस )
जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रूपांना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रूपे वाचकांना नक्कीच भावतील.
-
Sattantar (सत्तांतर )
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
-
Jangalatil Diwas (जंगलांतील दिवस )
...मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथंच, वाढलो. खेडं सोडून मी शहरी वातावरणात राहू लागलो, त्याला आता चाळीस वर्षं होत आली, तरीही मी मनानं माणदेशातल्या रानावनांतच असतो. मी एक छांदिष्ट माणूस आहे. जनलोकांतून थोडं बाजूलाच असावं, काही नाद लावून घ्यावा आणि त्याचा पाठपुरावा करीत राहावं, यात मला विशेष आनंद वाटतो. आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अद्भुत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्यामागं लागून, रोजच्या यांत्रिक धावपळीतून एखादी झुकांडी मारून, चौर्याहत्तर सालापासून चौर्याऐंशी सालापर्यंतच्या दहा वर्षात मी कुठं कुठं हिंडलो, मला काय काय दिसलं, काय काय जाणवलं, त्याचा हा वृत्तान्त आहे. जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्यानं निसर्गाची भव्यता, श्रीमंती व सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरंच आहे......’