Jangalatil Diwas (जंगलांतील दिवस )
...मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथंच, वाढलो. खेडं सोडून मी शहरी वातावरणात राहू लागलो, त्याला आता चाळीस वर्षं होत आली, तरीही मी मनानं माणदेशातल्या रानावनांतच असतो. मी एक छांदिष्ट माणूस आहे. जनलोकांतून थोडं बाजूलाच असावं, काही नाद लावून घ्यावा आणि त्याचा पाठपुरावा करीत राहावं, यात मला विशेष आनंद वाटतो. आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अद्भुत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्यामागं लागून, रोजच्या यांत्रिक धावपळीतून एखादी झुकांडी मारून, चौर्याहत्तर सालापासून चौर्याऐंशी सालापर्यंतच्या दहा वर्षात मी कुठं कुठं हिंडलो, मला काय काय दिसलं, काय काय जाणवलं, त्याचा हा वृत्तान्त आहे. जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्यानं निसर्गाची भव्यता, श्रीमंती व सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरंच आहे......’