-
Manaswini (मनस्विनी)
वास्तविक पाहता शून्याचं अस्तित्वही नगण्यच ! माझ्या सावली सारखंच ! जेव्हा ते कोणाबरोबर तरी असतं तेव्हा त्याची किंमत वधारते. जशी सावली माझ्या बरोबर असते तेव्हा ती ओळखली जाते. कोणत्याही आकड्याच्या पुढे आलेलं शून्य त्या आकड्याची किंमत वधारतं. शून्याला देखील किंमत असते हेही मला समजलं ते आजच्याच दिवशी.... माणसानं ही शून्यासारखं जगावं. आपण कुठं कोणा सोबत उभ्या आहोत याचं भान ठेवावं. त्यावर आपली किंमत ठरते. Tell me your friends I will tell you what you are.... हे ते आणखीन एक तत्त्वज्ञान ! शून्यामुळं असण्याला अर्थ आहे. शून्यातून जग निर्माण करता येतं या त्रिकालाबाधित सत्यावरून शून्याची किंमत माझ्या ठायी वधारली. माझी सावळी सावली मोठ्या गुणाची! मला हळुवार मोठं तत्वज्ञान सांगून गेली.
-
Rahile Dur Desh-Ghar Mage (राहिले दूर देश-घर मागे)
सध्या काळ सहजगत्या परदेशगमनाचा आणि जमल्यास तेथेच वास्तव्य करण्याचा आहे. खूप आर्थिक लाभ, उच्च दर्जाचे राहणीमान, उत्तम सुखसोयी आणि व्यावसायिक बढती या कारणांनी चालू पिढी परदेशात जावून तेथे वास्तव्य करायला उत्सुक असते. याचा परिणाम असा हातो की परदेशात गेलेली पिढी भारतात मागे राहिलेल्या देशा विषयी आणि त्यांच्या घरातील माणसांबद्दल थोडी काळजी आणि बराच दुरावा बाळगून परदेशात राहत असते. इकडे मागे भारतात त्यांचे आईवडील एकटेपणाचे दुःख भोगत असतात आणि देश त्याचे प्रश्न सोडवत असतो. परदेशी गेलेले लोक त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वापरून परदेशात खूप पैसा मिळवू शकतात, पण त्यांचे ज्ञान आणि कौशल्य स्वदेशाला उपयोगी पडत नाही. यातून Brain Drain चा प्रश्न निर्माण होतो. परदेशी स्थलांतर करणारे आणि त्यांच्या मागे राहिलेला त्यांचा देश व त्यांचे घर अशा या प्रश्नाला दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू या पुस्तकात मनोरंजक कादंबरी रूपात विचारात घेतल्या आहेत.
-
Chatroom (चॅटरूम)
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतर विद्या शाखेत अर्थशास्त्र या विषयाचे वाढते महत्व तसेच बदलते प्रवाह याचा ओघ लक्षात घेता संपूर्ण अर्थव्यवस्थेतील राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणाचा अभ्यास अर्थशास्त्र करते. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येणारे राजकोषीय धोरण, करप्रणाली, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, उत्पन्न, तसेच अंदाजपत्रक इ. घटकांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला आहे. विविध विद्या शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि पीएचडी चे संशोधन व लेखन करणाऱ्या अभ्यासकाना हे पुस्तक उपयुक्त ठरेल हि अपेक्षा.
-
Wireless (वायरलेस)
'वायरलेस' हा माझा आणखी एक कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. वास्तविक प्रकाशकांना माझे एकूण तीन कथासंग्रह प्रसिद्ध करायचे होते. परंतु माझ्याकडून थोडा आळस झाला, खेरीज इतर महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली नाही. हा कथासंग्रहात 'पापी वासनेची बळी' या शीर्षकाची एक कथा देण्यात आली आहे. वर्तमानपत्रात खोट्या जाहिराती देऊन आणि नोकरीचे आमिष दाखवून किंवा अत्यंत सभ्यतेची वागणूक दर्शवून एखाद्या तरुण मुलीला पाशवी जाळ्यात कसे अडकवले जातं, याचे चित्रण या कथेमध्ये केलेले आहे. ही कथा जरी तपासकथा असली, आणि ती तशी आहेच, तरीही या शहरात तरुण मुलीच्या संदर्भात हे धोके काही कमी नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करीत असलेल्या तरुणींना सावध करण्याचा उद्देश या कथेमागे आहे.
-
Savat Adnyatache ( सावट अज्ञाताचे)
प्रत्येक कथा वाचताना तुम्हाला जाणवेल की कथेतील पात्रांवर कुठल्या तरी एका अज्ञात शक्तीचे सावट पडले आहे आणि त्यातूनच ती कथा पुढे सरकायला मदतच झाली आहे. जरी ह्या कथा गूढ, अमानवी विषय धरून लिहिल्या असल्या तरी त्यात अंधश्रद्धेला मुळीच वाव नाही. मला स्वतःला ठाऊक नाही की, कथा लिहिताना मी हा गूढ, अमानवी कथांचा बाज का निवडला ? खरे तर सर्वजण अशा कथा वाचतील की नाही, हा ही विचार मी केला नव्हता. पण लिहायला बसले की, बाप्पांच्या कृपेने आणि सरस्वती देवीच्या आशीर्वादाने मी कित्येक कथा ह्या एकटाकी लिहिल्या. म्हणजे मला सुचत जायचे आणि मी लिहित जायचे. अर्थात मी हे माझे कौतुक म्हणून सांगत नाही आहे. सतत लिहित बसल्यामुळे कंबरेचा काटा कुठे असतो ते चांगलेच कळले मला त्या दिवसात. कथा लिहून झाल्यावर ती मी माझ्या मोठ्या बहिणीला- ज्योतीला, आणि माझ्या शाळेतील दोन मैत्रिणी-तेजस्विनी कोटियन आणि अनामिका थिटे ह्यांना वाचायला द्यायचे. त्यांनी हिरवा बावटा दाखविला की, मी दुसऱ्या कथेकडे वळायचे. ह्या तिघींचे किती आभार मानू? की आभार मानून त्यांना परके का करू ? तिघीही माझ्या हक्काच्याच पण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय मला राहवत नाही. माझ्या 'घुमर' कथेसाठी राजपूती लहेजाची ओळख करून घेताना, माझ्या माहेरच्या दोन राजपूती शेजारणींनी- किर्ती व बेन म्हणजेच ज्योतीबाला ह्यांनी मला बरेच मार्गदशन केले, त्यामुळे त्यांचेही मनःपूर्वक आभार!
-
Aapuliya Bale Nahi Mi Bolat ( आपुलिया बळे नाही मी बोलत)
शताब्दीच्या उंबरठ्यावरचे दादा' गेली 50 वर्षे मी दादांना पाहातो आहे, ऐकतो आहे, आणि वाचतो ही आहेच, दादा म्हणजे मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक-समीक्षक श्रीराम कृष्णाजी बोरकर, राष्ट्रीकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी. दादांचे कुटुंब साक्षात गोकुळच. दादा त्यातले आदर्शवत कर्ता पुरुष. दादांची पहिली कादंबरी ते मॅट्रीकला असताना प्रसिद्ध दार्दाचे विविधांगी, विपुल लेखन लोकप्रिय मासिकांतून आणि प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रसिद्ध, दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीतून सुरवातीपासून सतत 18 वर्षे दार्दानी असंख्य ललित ग्रंथाची परीक्षणे करून साक्षेपी समीक्षक म्हणून नाव मिळविले. दादांनी कविता, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, समीक्षा, चरित्र आणि इतिहास असे वेगवेगळे वाडमय प्रकार स्वतःच्या ललित मधुर शैलीत समर्थपणे हाताळले. त्याचीच पुढे अनेक पुस्तके निघाली. डेमिसाईज आकारातला सुमारे 750 छापील पृष्ठाचा दादांचा श्रीमहाभारत' नामक भारदस्त संशोधनपर ग्रंथ विशेष लोकप्रिय आहे हा ग्रंथ दादांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा एक चिरस्थायी ठेवा समजला जातो. "आपुलिया बळे नाही मी बोलत" या नावाचे दादांचे आत्मकथन पर नवे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. दादांच्या आयुष्याचे व समग्र जडण-घडणीचे एक नितळ, प्रांजल दर्शन त्यातून घडते, ते मनोवेधक आहे, मनाने अतिशय निर्मळ, निगर्वी असणारे दादा स्वभावानेही तितकेच निष्कपट आणि निर्मत्सरी आहेत. शताब्दी वर्षातल्या त्यांच्या प्रवेशाची सारीजण आतुरतेने वाट पाहाताहेत, दादांनी शतायु व्हावे हीच सर्वाची शुभकामना !