-
Manjirya (मंजिऱ्या)
श्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत` या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले. लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्यलेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.
-
Manzadhar (मंझधार)
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Pahile Pan (पहिले पान)
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Ragini (रागिणी)
"‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणा-या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
-
Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रत
‘साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा’ हा वि.स.खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित; परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.
-
Swapnasrushti (स्वप्नसृष्टी)
‘स्वप्नसृष्टी’ हा वि. स. खांडेकरांच्या सन १९२५ ते १९७६ या पाच दशकांतील निवडक अशा सुमारे ४० भाषणांचा संग्रह असून, त्यात प्रसंग, विषय, औचित्य, शैली यांचं वैविध्य आहे. खांडेकरांची भाषणे प्रकट चिंतन असायची नि आत्मीय हितगुजही! ज्या कुणाला स्वातंत्र्यपूर्व भारताचं वास्तव अन् स्वातंत्र्योत्तर काळात समाजमनात आलेलं स्थित्यंतर आणि परिवर्तन समजून घ्यायचं आहे, त्यांना हा भाषणसंग्रह आरसा ठरेल. माणसाचं सारं जीवन म्हणजे स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर हाती येणारं वास्तव! भौतिक समृद्धीला जर भावनेची किनार अन् समाजहितदर्शी वृत्तीचा स्पर्श नि पूर्वअट असेल, तरच मनुष्यजीवन माणुसकीचं जिणं होतं; अन्यथा ते एक मे-फ्लाय संस्कृती बनतं, लक्तर विकृतीकडे वाटचाल करत राहतं, हे समजावणारी ही भाषणं माणुसकीचा भर चौकात लिलाव करणाऱ्या नि तमाशा मांडणाऱ्या वर्तमान काळानं अंतर्मुख होऊन वाचायला हवीत!
-
Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)
प्रज्ञा आणि प्रतिभा’ (भाग-२) हा वि.स.खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबऱ्यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.
-
Gadhvachi Geeta Ani Gajrachi Pungi (गाढवाची गीता आ
‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ हा वि.स.खांडेकरांनी विनोदी शैलीत केलेल्या लेखनाचा संग्रह. विनोदी लेखांमधून खांडेकर समाजबदल टिपतात, आपली निरीक्षणं नोंदवतात. ‘वर्तमानावर केलेलं भाष्य’ असं या लेखनाचं स्वरूप आहे! विसंगत झालेल्या श्रद्धा नि कल्पनांना धक्का देण्याच्या हेतूने झालेले हे लेखन होय. विनोद हा ‘फॉर्म’ नसून ‘वृत्ती’ आहे, ज्यांना समूजन घ्यायचं आहे त्यांच्याकरिता सदर पुस्तक वस्तुपाठ ठरावे असे आहे. यात नाट्यछटेची कलात्मकता नि एकांकिकेची संवाद शैली याचं सुंदर मिश्रण आहे. एका साहित्यिक चिंतकाचं ‘स्वगत’ ‘प्रकट’ होणं काय असतं ते हे लेखन समजावतं.
-
Chanderi Swapne (चंदेरी स्वप्ने)
साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो. मानवजात अजून रानटी आहे.... तुम्ही-आम्ही सारे अजून रानटी आहोत ! म्हणूनच असल्या लढाया होतात् ! नाही तर.... कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं, म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात. जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे. बुद्धीवर जगणार्याचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणार्याला त्याला सावली तर देता येतच नाही; उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो! प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं ! पण त्याची लांबी-रुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशीत्याची अपेक्षा असते !
-
Navi Stree ( नवी स्त्री)
नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण स्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, 144 कलम तिला माहीत असायला हव; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां/पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना 1950 मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षानंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते.
-
Pahili laat (पहिली लाट)
श्री. वि. स. खांडेकरांचा हा चौदावा कथासंग्रह आहे. लघुकथा या साहित्यप्रकाराविषयी प्रसिद्ध पाश्चात्त्य कथाकार बेट्स याने एका ठिकाणी म्हटले आहे : "उत्तम आणि अधम यासंदर्भातील एखादे अप्रकट प्रवचन वाचकांपुढे करावे, एखादे तात्पर्य त्यांच्या मनांवर बिंबवावे, एखादा वेगळा दृष्टीकोन त्यांच्यापुढे ठेवावा किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाचा शर्करावगुंठित डोस त्यांना पाजावा, या हेतून कधीही कथा लिहिल्या जाऊ नयेत. मानवी जीवनाबद्दलच्या उत्कट कुतूहलापोटी, आनंदसंवर्धनासाठी आणि त्या ज्या मनोऽवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्या वाचल्या जायला हव्यात. असे सामर्थ्य जीमधे आहे, तीच उत्तम कथा !’" या मानदण्डाच्या आधारे सुजाण वाचकांना श्री. खांडेकरांच्या या कथासंग्रहातील कथांचा आस्वाद अधिक उत्कटपणे घेता येईल.
-
Ghartyabaher (घरट्याबाहेर)
पंख न फुटलेल्या चिमुकल्या पाखरांचे घरटे रक्षण करते; पण पंख फुटलेल्या पाखरांना तेच घरटे पिंजर्यासारखे होते. कुटुंब, घर, देव, धर्म, प्रेम, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, इत्यादिकांविषयीच्या आपल्या आजच्या कल्पनांची हुबेहुब हीच स्थिती आहे. मानवजातीच्या बाल्यात या सर्व कल्पना सुंदर होत्या; इतकेच नव्हे, तर समाजाचे संरक्षण करण्याचे आणि सामर्थ्य वाढविण्याचेच काम त्यांनी केले आहे. पण आजच्या यंत्रप्रधान संस्कृतीत या जुन्या कल्पनांचा काडीमात्र तरी उपयोग आहे का ? मध्यम वर्गातल्या बुद्धिवान व कर्तृत्ववान तरूणत्तरुणींची बुद्धी पिंजर्यात अडकून पडली आहे. त्यांचे कर्तृत्व कुटुंबाच्या तुरुंगापलीकडे सहसा जाऊच शकत नाही. मध्यम वर्गाचे हे प्रतिनिधी राजकीय व सामाजिक सुधारणेच्या गोष्टी तोंडाने बोलत असले, तरी वस्तुस्थितीकडे ते डोळेझाक करीत आहेत. शिक्षण, कुटुंबव्यवस्था, संपत्तीची वाटणी, स्त्रीपुरुषांचे संबंध, इ. बाबतींतल्या जुना मार्ग खाचखळग्यांनी भरलेला असून, समाजाच्या गाड्याला त्यामुळे पदोपदी भयंकर धक्के बसत आहेत, हे जाणूनही नव्या पाउलवाटेकडे त्यांचे पाय वळत नाहीत. याचे मुख्य कारण आहे : घरट्याबाहेर न पडण्याची वृत्ती ! वैयक्तिक जीवनाची आसक्ती आणि सामाजिक जीवनाविषयीची उदासीनता.
-
Sukhacha Shodh (सुखाचा शोध)
मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ॠण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. व्यक्तिगत ॠण आणि समाजॠण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी 'सुखाचा शोध' या कादंबरीतून मांडले आहेत. "त्यागातच सुख असते" ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा 'आनंद', एकावरच संसाराचे ओझे लादणारी 'अप्पा आणि भय्या' ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित 'माणिक' आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली 'उषा'. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, "परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये." १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.