-
Soneri Swapna- Bhangleli (सोनेरी स्वप्नं-भंगलेली)
नानासाहेब, खरं सांगू, सामाजिक अन्यायाच्या बाबतीतली तुमची पोटतिडीक पाहून मला तुमचा हेवा वाटतो. माणसानं जगावं तर असं जगावं असं मनात येतं. पण लगेच दुसरं मन म्हणतं, तुम्ही मागच्या पिढीची माणसं एका सुंदर स्वप्नात जगत होता. समाजातले सारे बदल सहज व सुरळीतपणानं होतील असं मानीत होता. पण गणिताचे नियम मानवी जीवनाला लावून चालत नाही. माझ्या मनात येतं, युगधर्म बदलला आहे. मघाशी नीतिमूल्यांविषयी तुम्ही बोललात. कृषिप्रधान जीवनपद्धतीतल्या मूल्यांचे संस्कार तुमच्या मनावर लहानपणापासून झाले आहेत. आजची पिढी निराळी आहे. ती यंत्रप्रधान औद्योगिक संस्कृतीत वाढत आहे. पूर्वीच्या लोकांनी देवधर्माच्या भीतीनं अनेक कृत्रिम नीतिमूल्यं पाळली. तरुण पिढीला आता त्यांची गरज वाटत नाही. शेवटी माणसाचं काय होतं चिमूटभर राखच ना. मग जिवात जीव आहे तोपय|त दोन्ही हातांनी जेवढं सुख ओरबाडून घेता येईल तेवढं घ्यायचं याखेरीज तिच्यापुढं कुठलंही ध्येय नाही. तुमचं म्हणणं तात्त्विक दृष्टीनं अगदी बरोबर आहे. पण आजच्या व्यवहारी जगात तत्त्वांना विचारतो कोण?
-
Dhgaadche Chandane (ढगाआडचे चांदणे)
खांडेकर म्हणतात "...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात-- प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ती सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामर्थ्य पुष्कळांच्या अंगी नसतं. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्ष मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहा-वीस वर्षात मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृक्रिमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
-
Pakalya (पाकळ्या)
आपण जिला शहरी संस्कृती म्हणतो, तिचा अभिजात वाङ्मयाशी अभेद्य असा संबंध असतो, ही धारणा मुळातच चुकीची आहे. शब्द हे वाङ्मयाचे माध्यम असल्यामुळे रसिकतेचा शिक्षणाशी निकटचा संबंध असला पाहिजे, असे आपण गृहीत धरतो. पण शिक्षण अनेकदा पढीक रसिक निर्माण करते. तंत्राचा, शास्त्राचा आणि तशाच प्रकारच्या शेकडो प्रश्नांचा काथ्याकूट करण्यातच अशा पढीकारांचा वेळ जातो. सवयीने त्यांना त्यातच आनंद वाटतो; पण खरी रसिकता असल्या गोीचे स्तोम माजवीत नाही. ती वाङ्मयाच्या आत्म्याकडेच धाव घेते. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ललित वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. वाङ्मयाच्या जगाशी एकरूप व्हायला लागणारी स्वैर कल्पकता हा कुमारवयाला मिळालेला एक वर आहे. मुक्त आणि अनंत अशा आकाशाच्या पोकळीत उडत जाण्यात त्यांच्या मनांना आनंद होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी कै. वि. स. खांडेकरांनी स्वत:च्या दीड-दोनशे कथांमधून पंधरा कथा साक्षेपाने निवडून काढल्या आणि त्या संग्रहाला अन्वर्थक नाव दिले : "पाकळ्या’
-
Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
-
Don Mane
माणसाला दोन मनं असतात बाळासाहेब ! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं ! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही. दुसऱ्याला त्याच्यापलीकडे असणा-या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुस-या मनाचं बळ वाढवण, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन्ही मनांचा झगडा नेहमीच सुरु असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा कृ लागतो, आणि मग...
-
Hirva Chafa
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्री-शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नातिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. 'हिरवा चाफा' ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणार्या पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.
-
Yayaati (ययाति)
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.