Soneri Swapna- Bhangleli (सोनेरी स्वप्नं-भंगलेली)
नानासाहेब, खरं सांगू, सामाजिक अन्यायाच्या बाबतीतली तुमची पोटतिडीक पाहून मला तुमचा हेवा वाटतो. माणसानं जगावं तर असं जगावं असं मनात येतं. पण लगेच दुसरं मन म्हणतं, तुम्ही मागच्या पिढीची माणसं एका सुंदर स्वप्नात जगत होता. समाजातले सारे बदल सहज व सुरळीतपणानं होतील असं मानीत होता. पण गणिताचे नियम मानवी जीवनाला लावून चालत नाही. माझ्या मनात येतं, युगधर्म बदलला आहे. मघाशी नीतिमूल्यांविषयी तुम्ही बोललात. कृषिप्रधान जीवनपद्धतीतल्या मूल्यांचे संस्कार तुमच्या मनावर लहानपणापासून झाले आहेत. आजची पिढी निराळी आहे. ती यंत्रप्रधान औद्योगिक संस्कृतीत वाढत आहे. पूर्वीच्या लोकांनी देवधर्माच्या भीतीनं अनेक कृत्रिम नीतिमूल्यं पाळली. तरुण पिढीला आता त्यांची गरज वाटत नाही. शेवटी माणसाचं काय होतं चिमूटभर राखच ना. मग जिवात जीव आहे तोपय|त दोन्ही हातांनी जेवढं सुख ओरबाडून घेता येईल तेवढं घ्यायचं याखेरीज तिच्यापुढं कुठलंही ध्येय नाही. तुमचं म्हणणं तात्त्विक दृष्टीनं अगदी बरोबर आहे. पण आजच्या व्यवहारी जगात तत्त्वांना विचारतो कोण?