Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.