Swapnasrushti (स्वप्नसृष्टी)
‘स्वप्नसृष्टी’ हा वि. स. खांडेकरांच्या सन १९२५ ते १९७६ या पाच दशकांतील निवडक अशा सुमारे ४० भाषणांचा संग्रह असून, त्यात प्रसंग, विषय, औचित्य, शैली यांचं वैविध्य आहे. खांडेकरांची भाषणे प्रकट चिंतन असायची नि आत्मीय हितगुजही! ज्या कुणाला स्वातंत्र्यपूर्व भारताचं वास्तव अन् स्वातंत्र्योत्तर काळात समाजमनात आलेलं स्थित्यंतर आणि परिवर्तन समजून घ्यायचं आहे, त्यांना हा भाषणसंग्रह आरसा ठरेल. माणसाचं सारं जीवन म्हणजे स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर हाती येणारं वास्तव! भौतिक समृद्धीला जर भावनेची किनार अन् समाजहितदर्शी वृत्तीचा स्पर्श नि पूर्वअट असेल, तरच मनुष्यजीवन माणुसकीचं जिणं होतं; अन्यथा ते एक मे-फ्लाय संस्कृती बनतं, लक्तर विकृतीकडे वाटचाल करत राहतं, हे समजावणारी ही भाषणं माणुसकीचा भर चौकात लिलाव करणाऱ्या नि तमाशा मांडणाऱ्या वर्तमान काळानं अंतर्मुख होऊन वाचायला हवीत!