-
Dharmavedha (धर्मवेध)
ल. सि. जाधव यांचे सर्व धर्मांविषयी चिंतन म्हणजे ‘धर्मवेध’ ही कादंबरी. इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक चैतन्य आनंद हे कथानायक. त्यांच्या माध्यमातून हे चिंतन होताना दिसतं. वस्तुत: धर्म हा प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम हे मूलत: सर्वव्यापी असल्याने सर्व धर्मांतील प्रेमभाव लेखकास अभिप्रेत आहे. धर्माकडे, वैश्विक सत्याचे अधिष्ठान म्हणून ते पाहतात. वैचारिक मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे. तथापि, सकल मानवाचे कल्याण, बंधुत्व, सामंजस्य धर्मास अपेक्षित असूनही धर्माच्या नावे छळ, कलह, लढाई कशासाठी, अशा आशयाचे आणि त्या अनुषंगाने येणारे धर्मविषयक विचार कादंबरीतून व्यक्त होत राहतात. कथानायकाचं पत्नीच्या मृत्यूनंतरचं विरक्त जीवन, त्याचं धार्मिक पर्यटन, वेगवेगळ्या मठांमध्ये केलेलं वास्तव्य, संन्यास दीक्षा घेणं, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आश्रमाची स्थापना करणं आणि आश्रमप्रमुख म्हणून काम करताना तेथील कामातील चढ-उतार अनुभवणं अशा कथानकातून, घटना-प्रसंगांतून कलात्मकतेने ही धर्मचर्चा घडवून आणली आहे.
-
Adgal.. (अडगळ)
बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.
-
Mavaltichi Unhe (मावळतीची उन्हे)
जयश्री थत्ते-भट ह्या पाश्चात्य देशात – कॅनडात स्थायिक झाल्या आहेत. तेथील समाजात भावनांपेक्षा विचारांना महत्त्व अधिक. साहजिकच लेखिकेच्या लेखणीची बैठक वैचारिक आहे. परिणामी कथांमध्ये भावविवशता कमी आहे. त्याचबरोबर पाश्चात्य व पौवार्त्य समाजातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत दिग्दर्शित करण्याची, त्यावर मार्मिक प्रहार करण्याची आणि हंसक्षीरन्यायाने त्यातील भलेपणा टिपण्याची अचूक हातोटी लेखिकेने हस्तगत केली आहे. सारांश, भारतीय व पाश्चात्य समाजाच्या सीमारेषा उकलून सांगणार्या या सर्व कथा नावीन्यपूर्ण असल्याने त्या स्वागतार्ह आहेत.