Adgal.. (अडगळ)
बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.