Dharmavedha (धर्मवेध)
ल. सि. जाधव यांचे सर्व धर्मांविषयी चिंतन म्हणजे ‘धर्मवेध’ ही कादंबरी. इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक चैतन्य आनंद हे कथानायक. त्यांच्या माध्यमातून हे चिंतन होताना दिसतं. वस्तुत: धर्म हा प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम हे मूलत: सर्वव्यापी असल्याने सर्व धर्मांतील प्रेमभाव लेखकास अभिप्रेत आहे. धर्माकडे, वैश्विक सत्याचे अधिष्ठान म्हणून ते पाहतात. वैचारिक मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे. तथापि, सकल मानवाचे कल्याण, बंधुत्व, सामंजस्य धर्मास अपेक्षित असूनही धर्माच्या नावे छळ, कलह, लढाई कशासाठी, अशा आशयाचे आणि त्या अनुषंगाने येणारे धर्मविषयक विचार कादंबरीतून व्यक्त होत राहतात. कथानायकाचं पत्नीच्या मृत्यूनंतरचं विरक्त जीवन, त्याचं धार्मिक पर्यटन, वेगवेगळ्या मठांमध्ये केलेलं वास्तव्य, संन्यास दीक्षा घेणं, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आश्रमाची स्थापना करणं आणि आश्रमप्रमुख म्हणून काम करताना तेथील कामातील चढ-उतार अनुभवणं अशा कथानकातून, घटना-प्रसंगांतून कलात्मकतेने ही धर्मचर्चा घडवून आणली आहे.