Marathi Rangbhumichya Tees Ratri - Khand 1( मराठी
’नाटक’ हा मराठी माणसाचा मानबिंदू मराठी रंगभूमीला दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि भारतीय स्तरावर तिचे महत्त्व खूप मोठे आहे. या रंगभूमीने कालानुरूप, परिस्थितीनुरूप अनेक स्थित्यंतरे पाहिली, नवे प्रवाह स्वीकारले, त्यामुळेच आजही नाटक आणि मराठी रंगभूमी स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. वेळोवेळी झालेली राजकीय स्थित्यंतरे आणि सामाजिक सुधारणा यांपासून मराठी नाटक अलिप्त राहू शकले नाही. भोवतालच्या बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचे बरेवाईट परिणाम त्यावर होत होते. मकरंद साठे यांनी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री या ग्रंथात मराठी रंगभूमीच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा लेखाजोगा घेतला आहे. बेंगळुरू येथील 'इंडिया फौंडेशन फॉर द आर्टस' या संस्थेने दिलेल्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून मकरंद साठे यांनी या ग्रंथाचे लेखन केले. अतिशय गांभीर्याने गेली दोन वर्षे केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाच्या आधारे या ग्रंथांची सिद्धता झाली आहे. मराठी रंगभूमीचा सामाजिक- राजकीय इतिहास असे जरी या ग्रंथांचे गंभीर स्वरूप असले तरी त्याची वाचनीयता मात्र कुठेही कमी झालेली नाही. मकरंद साठे हे मुळात ललितलेखक. स्वत: नाटककार असल्याने या ग्रंथाच्या लेखनासाठीही त्यांनी या नाट्यतंत्राचा अवलंब केला आहे. मराठी रंगभूमीवरील आजच्या पिढीतील एक लेखक आणि जुन्या नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा विदूषक सलग तीस रात्री पुण्याच्या वेताळ टेकडीवर भेटतात, त्यांच्यातील प्रदीर्घ अशा संवादातून मराठी रंगभूमीचा सामाजिक आणि राजकीय इतिहास उलगडत जातो अशी या ग्रंथांची रचना आहे. १७५० पृष्ठे असलेल्या या ग्रंथांचे एकूण तीन खंड आहेत. पहिल्या खंडामध्ये १८४३ ते १९५५ सालचा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, दुसर्या खंडामध्ये १९५५ ते १९७५ हा स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि तिसर्या खंडात १९७५ ते २०१० अगदी अलीकडचा काळ समाविष्ट केला आहे. सुधीर पटवर्धन यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रकाराने खास या तीन खंडांच्या मुखपृष्ठांसाठी तैलचित्र करावे हे या ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारेच आहे. विदूषक आणि नवनाटककार यांच्या भेटीची प्रत्येक रात्र ही पटवर्धनांच्या रेखाचित्राने सजली आहे. मधल्या काळातल्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडून आज पुन्हा एकदा मराठी रंगभूमी नव्या ताकदीने उभी राहू पाहत आहे. अशा वेळी आज नाट्यसृष्टीत काही नवे करू पाहणार्या रंगकर्मींना इतिहास कळावा आणि त्यातून बोध घेऊनच त्यांनी पुढचा इतिहास लिहावा या प्रेरणेतून या ग्रंथांचे लेखन साठे यांनी केले आहे. मराठी साहित्याचा, रंगभूमीचा अभ्यास करणार्यांना या ग्रंथांचा उपयोग तर होईलच पण त्या बरोबरीने; इतिहास, समाजशास्त्र, पोलिटिकल सायन्स या विषयाच्या विद्यार्थ्यांनाही हा ग्रंथ मार्गदर्शक ठरू शकेल. मकरंद साठे यांच्या ललित्यपूर्ण भाषेमुळे आणि ग्रंथांच्या संवादात्मक रचनेमुळे सर्वसामान्य रसिक वाचकांनाही हा ग्रंथ आवडेल.