Pasang (पासंग)
"पासंगालाही पुरत नाही" या अर्थाची म्हण मराठीत आहे. 'क्षुल्लक' या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल रहावीत, म्हणून जे छोटेसे वजन लावले जाते, ते म्हणजे 'पासंग'. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून ऐकत आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थ असा की, समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक 'पासंगात' जातीधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरात ज्या घटना किंवा व्यक्ती 'फूटनोट' म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.