Phashi Bakhal
मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिलं, फासावर लटकावलं, हे मनाला खातच होतं. कुठंही दोरी दिसली, की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. माझं वागणं शहाणपणाचं नव्हतं, हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली, की ती रात्र डोक्यात फिरायची. आणि घरात सगळीकडे दो-या; चिकाच्या पडद्याला दोरी, ताक घुसळायला दोरी, अंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं, तर चांगला जाडजूड दोरखंड. त्या दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना, ती रात्र डोळ्यांसमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचा. अधांतरी... फाशी गेलेल्या माणसासारखी. गूढकथेला मानवी मनाचे कंगोरे देणा-या आणि त्यामुळेच मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणा-या, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचा आगळावेगळा संग्रह.