Rahasya ( रहस्य )
ही कादंबरी होळकर घराण्याच्या इतिहास-सिद्ध सूत्राची साक्ष देते आणि वर्तमान आधुनिकतेचे संदर्भही पुरविते. त्यामुळे इतिहास व वर्तमान यांना एकाच वेळी या कथेने एकात्म रूपात पेलण्याचा पराक्रम केलाय. जंगलतोड, पर्यावरण हानी, बकाल खेडी, भ्रष्ट पुढाऱ्यांची पिलावळ, दिशाहीन समाजरचना, वनरक्षक-वनकर्मचारी, गावगुंड आमदार, व्याघ्र-प्रकल्प अशा संदर्भांची उपलब्धता कथेचा प्रवाह आधुनिकतेशी व वर्तमानाशी जुळवून ठेवतो. प्रा. गोरक्षनाथ, तलाठी साळुंखे, आर्यभारती, वनकर्मचारी लांजेवार अशा अनेक व्यक्तिरेखांनी वर्तमानाचे भान पेरले आहे. व्यक्तिनमुन्यांची विविधता हा या कादंबरीचा ‘विशेष’ गुण म्हणता येतो. संशोधक, नेता, तलाठी, राजघराण्यातील नायक या व्यक्तित्वांच्या साक्षी इथे आहेतच; पण तंत्रविद्येत प्रवीण असणाऱ्या साधकांचा गोतावळासुद्धा इथे प्रभावी ठरलाय. कथानकातील गूढ वातावरणनिर्मिती हेच या कादंबरीचे मुख्य सामर्थ्य आहे. सत्प्रवृत्ती व अपप्रवृत्तींसह अनेक प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा साकार करून गूढ वलयांकित कथानकाची चाकोरीबाहेरची भन्नाट ‘रहस्यमय’ कादंबरी गणेश महादेव यांनी मराठी सारस्वतांच्या दरबारात रुजू केलीय. इतिहास, पुराण, तत्त्वज्ञान, नाथ संप्रदायाचे अंतरंग व परंपरा, तंत्रविद्येचा गाभा व विधी, त्यामधील विशिष्ट प्रकार व संस्कार, भाषिक रूपे या सर्वांचा लेखकाचा सूक्ष्म अभ्यास गौरवास्पद आहे. कथाप्रवाहातील व्यक्ती व घटना-प्रसंगाचा अनुबंध सुंदर गुंफला गेलाय. अध्यात्म व आधुनिकता, भोगवाद आणि त्याग-तपश्चर्या, शुद्धता व अशुद्धता या सर्वच द््वंद््वांचे लेखकाचे आकलन सम्यक आहे. गूढ रहस्यात गुंतून जाणाऱ्या रसिक-वाचकांसाठी हा कादंबरी लेखनाचा प्रयोग निश्चितच गौरवास्पद म्हणावा लागेल. डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)