Jidnyasapurti
विज्ञानविषयी उत्कृष्ट व रंजक लेखक करणार्यात निरंजन घाटे हे नाव आज आघाडीवर आहे. विज्ञान विषयावर श्री घाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. 'जिज्ञासापूर्ती’ हा विषयही सदैव कुतूहल निर्माण करणारा आहे हे ओळखूनच त्यांनी या पुस्तकांची निर्मिती केली असावी. कारण सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यावरील प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम या प्रकारामुळे तर हा विषय परवलीचा ठरला आहे. या पुस्तकात एकूण 69 छोटे छोटे लेख समाविष्ट असून अनेक, लेखांना चित्रांचीही जोड दिलेली आहे. पृथ्वीचे वातावरण खरेच तापते आहे का ? रात्रपाळी करण्यामुळे त्रास होतो का ? क्लिओपात्रा खरंच अस्तित्वात होती का ? जाड माणसे अधाशी असतात का ? मंगळावर सजीव आहेत की नाहीत? उडत्या तबकड्यांचे गूढ, पैशाचा जन्म कधी झाला ? स्त्री आणि विज्ञान यांचे का पटत नाही ? चंद्रावर पाणी आहे का ? अशी अनेक प्रश्नांचे कुतूहल आपल्या 69 लेखांतून शमविण्याचा श्री. घाटे यांनी प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील सर्व लेख वाचून, नीट समजावून घेतले तरी वाचकांच्या सामान्यज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना अनेक भौगोलिक प्रश्नोत्तराचे भांडार म्हणून वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करील. यात शंका नाही.