Rashtriya Ekatmateche Shilpkar-Barrister Sardar Va
पंकज रूपचंद पाटील आणि संदीप भानुदास तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा ग्रंथ आधुनिक भारताच्या एकात्मतेसाठी व समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा वैचारिक ग्रंथ आहे. वल्लभभाईंच्या चरित्रासह भारताच्या इतिहासाचे अंतरंगी वास्तव या ग्रंथात सप्रमाण चित्रित झाले आहे. सरदार पटेल यांच्या विनोदी स्वभावाचे अनेक किस्से व घटनाप्रसंग लेखकाने सांगितले आहेत. पोलादी पुरुषाचे हे वेगळे रूप नवीन असल्याने वाचकांना प्रचंड भावते. विशेष म्हणजे, म. गांधी व पटेल यांच्यातील खुमासदार संवाद आणि त्यातून जन्माला आलेला विनोद मुळातून वाचणे महत्त्वाचे ठरते. वल्लभभाई आणि म. गांधी यांचे सहअस्तित्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या गाभ्यातील सूत्र आहे. म. गांधींची उपोषणे, आंदोलने यांचा थेट अनुबंध सरदारांच्या जीवनाशी येतो. म्हणून गांधींचा जीवनपट पटेलांच्या नोंदीशिवाय पूर्ण होत नाही; तसेच गांधी-नेहरू-पटेलांविना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेता येणार नाही. पंतप्रधानांचे पद पंडित नेहरूंनी भूषविल्याने गांधीनंतर त्यांचेच नाव गाजले आणि पटेलांच्या वाट्याला उपेक्षा आली; पण या ग्रंथाने सरदार पटेल यांना न्याय दिला आहे.