Aathvanincha Payrav (आठवणींचा पायरव)
कुठल्याही क्षेत्रातील थोर व्यक्तीशी प्रत्यक्ष परिचय झाला, त्याचा सहवास लाभला की त्याच्या थोरवीची त्वचा खरवडली जाते, त्याखाली दडलेले गुण-दोष ठळकपणे दिसू लागतात. त्यामुळेच ज्यांच्या कर्तृत्वाने, विद्वत्तेने, प्रतिभेने आपण स्तिमित होतो, त्यांच्या फार जवळ जाऊ नये, असे म्हणतात. मात्र या वास्तवाची जाणीव ठेवून आणि ते स्वीकारून जर अशा प्रज्ञावंतांशी जवळीक केली तर सहज मानवी वृत्तीचे विविध पैलू लख्खपणे दिसतात. व्यक्तिगत रागा-लोभाच्या भावनापल्याड जाऊन त्यांच्या वागण्या-बोलण्याचा ताळेबंद मांडता येतो. त्यातून त्या माणसाचे मोठेपण कमी होत नाही अथवा त्याला न्यूनताही येत नाही. अंजली कीर्तने यांनी त्यांना गुरुस्थानी असलेल्या काही श्रेष्ठ व्यक्ती आणि पुढे परिचय होऊन ज्यांच्याशी घट्ट संबंध तयार झाले अशा काही प्रसिद्ध व्यक्तींविषयी या पुस्तकात याच भूमिकेतून लिहिलेले आहे. त्यामुळे या लेखांना 'स्वभावचित्रे' म्हणावे लागेल. या व्यक्तिंविषयी वाचकांना असलेल्या आदराला कुठेही धक्का बसणार नाही आणि तरीही त्यांच्या स्वभावातील सहज मानवी उणिवा दिसतील असे हे अत्यंत आत्मीयतेने केलेले लिखाण आहे. या पुस्तकातील लेखात 'डोह'विषयी 'वालं'नी 'या गद्याला डोळे आहेत, कान आहेत, संवेदना टिपणारी त्वचा आहे, स्मृती आहे..' असे म्हटल्याचे लेखिका सांगते. 'डोह' हे तर निव्वळ ललित लेखन आहे, डोळे, कान, स्मृती आणि मन यांचा उपयोग खरे तर आपल्याला प्रिय असलेल्यांविषयी लिहिताना अधिक जाणतेपणी करता येतो, तसा तो या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये केलेला असल्याचे दिसते. माहीत असलेल्या व्यक्ती 'अधिक माहीत' होण्यासाठी आणि कळलेल्या व्यक्ती 'आकळण्यासाठी' यातील लेख आपल्याला सहजपणे सोबत घेऊन जातात. - श्रीकांत बोजेवार