Rag Samjun Ghetana (राग समजून घेताना)
राग येणं ही नैसर्गिक भावना आहे. पण तो अनावर झाल्यावर आपण हिंसक कधी बनतो हे आपल्या लक्षातही येत नाही. रागामुळे आपल्या कामाच्या ठिकाणचं वातावरण बिघडू शकतं, आपल्या इतरांशी असलेल्या नात्यावर परिणाम होतो आणि एकूणातच आपल्या आयुष्याची लय बिघडून जाते. अनावर झालेला राग आपल्या मनाचा ताबा घेतो आणि अतिशय तीव्र भावनांची आपण शिकार होतो. आपल्या मनातली खळबळ कोणत्या दिशेला जाईल याचा काहीही अंदाज बांधता येत नाही. मनातला राग स्पष्टपणे व्यक्त करणं हा सगळ्यांत योग्य मार्ग आहे. हे करण्यासाठी आपल्याला नक्की काय हवंय आणि जे हवं आहे ते इतरांना न दुखावता कसं मिळवता येईल हे आपण जाणून घ्यायला हवं. एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट इतरांना स्पष्टपणे आणि ठामपणे सांगणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःचा आब राखून इतरांशी आदराने वागणं होय. रागाचं नियमन कसं करायचं हे शिकवता येतं. रागाला कारणीभूत ठरणाऱ्या भावनिक आणि शारीरिक आवेगांची तीव्रता कमी कशी करायची हेच तर शिकवलं जातं.. आपल्याला संताप आणणाऱ्या गोष्टींना किंवा माणसांना किंवा परिस्थितीला आपण टाळू शकत नाही. आपण त्यांच्यात काही बदलही घडवू शकत नाही. पण त्यांच्याशी आपल्या वागण्यावर परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकणं आपल्या हातात आहे.