Draupadi Kal Aaj Udya (द्रौपदी काल आज उद्या)
राजा शंतनु आणि स्वर्गीय गंगा यांच्या मीलनातून जन्मलेला राजपुत्र देवव्रत याने जेव्हा 'भीष्म प्रतिज्ञा' केली, तेव्हा महाभारताच्या अंतरिक संघर्षाला सुरुवात झाली. सभापर्वातील द्रौपदी वस्त्रहरण हा महासंघर्षाचा परमोच्च बिंदू होता नि तिथून द्रौपदीच्या सांगण्यावरून तिचा मनबंधू श्रीकृष्ण याची युद्धशिष्टाई मुद्दामहून न करण्यातून महासत्तेच्या विलयाला सुरुवात झाली. द्रौपदीचे आयुष्यातील महानाट्य हे धगधगत्या पलित्यासारखे कालातीत होते. जन्मोदरी ती अग्निशिखा होती, बालपणी ती याज्ञसेना होती, विवाहप्रसंगी द्रुपदकन्या द्रौपदी होती, स्वयंवरानंतर पाच पांडवांची जगनघना पतिव्रता पांचाली होती आणि पुन्हा वस्त्रहरणाच्या वेळी तळपत्या तलवारीसारखी मनोयज्ञयागातून निर्माण झालेली अग्निशिखा होती...! अशी तिची विविधांगी गर्भित रूपे अशोक समेळ यांनी निखालसपणे आपल्या शब्दकुंचल्याने ज्वलंत चितारलेली आहेत...! द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात दिसलेली कालची, आजची आणि उद्याची स्त्री आणि तिची मनोमूर्त किती संवेदनशील आहे, याचे प्रत्यंतर ही कादंबरी वाचताना रसिकांना येते. द्रौपदीची मानसिकता ही अमृतसरोवरात द्विजिभेने दंश करणारी कुंडलिनी होती, तर आजच्या स्त्रीचे भोगणे आणि सोसणे, वेदना आणि संवेदना, जखम आणि जोखीम, शब्दातीत निःशब्दता, प्रश्नातीत विप्रश्नता, मौन आणि कोलाहल, साक्षात्कार आणि निर्वचना... या सर्व परस्परविरोधी; पण तरीही संवादी युगुलांचा सम्यक संसार म्हणजे स्त्रीचे मन आहे. याचा महा शब्दपट नाट्यमयरीत्या अशोक समेळ यांनी मनःपूत विलक्षण संयमाने विणला आहे...! द्रौपदीच्या मनातील सलाचा उगम प्रलयात होतो आणि पंचमहाभूतांच्या ओंकारात विलय होऊन पुन्हा अरूवारीच्या विलसत्या किरणांप्रमाणे तिचे मूलाधार व्यक्तिमत्त्व कादंबरीभर झळकत राहते, ही या कादंबरीची मर्मबंधातली ठेव आहे...!! -- प्रा. अशोक बागवे