-
Vaya Gelele Por (वाया गेलेले पोर)
डॉ. विजय शिरीशकर या वसईतील स्त्री-रोगतज्ज्ञाच्या जीवनावर बेतलेल्या पुस्तकाचे. 'डिंपल पब्लिकेशन'चे प्रकाशक अशोक मुळे यांनी डॉक्टरांच्या जीवनाचे शब्दचित्र रेखाटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. कोरोना साथीच्या काळात व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून कथन-लेखन-वाचनाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासास शब्दसाज चढवत असताना डॉक्टरांचे आश्चर्यकारक वळणांचे आयुष्य उलगडत राहिले. एक निष्णात आणि अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून ज्यांची वसईमध्ये ख्याती आहे ते डॉक्टर शिरीशकर म्हणजेच 'वाया गेलेले पोर' आहे यावर विश्वास बसणे कठीण. मुळात हे 'पोर' म्हणजे 'बाळा', वाया गेला होता म्हणजे नक्की कसा होता हे येथे सांगणे उचित ठरणार नाही.
-
Swarswamini Asha(स्वरस्वामिनी आशा)
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आलीआहे, पण जिभेने ती जरा तिखट आहे. आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे. थोडक्यात काय तर मंगेशकरांच्यासोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे. स्वकष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणिकलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे. -- शांता शेळके
-
Tanviche Abhal (तन्वीचं आभाळ)
‘तन्वीचे आभाळ' हे डॉ. मेधा मेहेंदळे या प्रतिभावान स्त्रीचे चरित्र लिहिलंय तितक्याच प्रतिभावान महिलेने ! डॉ. शुभा चिटणीस यांनी ! शुभाताई सर्व ठाण्याला जवळून परिचित आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांवर वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून व वेगवेगळ्या ग्रंथांतून असंख्य व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिलेले आहेत. चरित्रेही लिहिलेली आहेत. त्यांचे लेखन महाराष्ट्रात सर्वत्र गाजले आहे... तेच डॉ. मेधा मेहेंदळेंच्या चरित्रलेखनातून पानोपानी जाणवत आहे...डॉ. मेधा यांनी निसर्गोपचार- प्रसारक म्हणून चिमूटभर सत्त्वातून जे आभाळ उभे केले आहे त्याला तोड नाही. छोट्या मेधा देसाई ते आजच्या जगप्रसिद्ध 'तन्वी' निर्मात्या डॉ. मेधा मेहेंदळे यांचा प्रदीर्घ जीवनप्रवास विलक्षण आत्मीय आणि वाचनीय झालेला आहे. शून्यातून आयुर्वेदासारख्या आभाळाला कवेत घेणे सोपे नाही. ते अवघड कार्य डॉ. मेधा मेहेंदळे यांनी केलेले आहे. त्यांचे कर्तृत्व डॉ. शुभा चिटणीसांनी विलक्षण बोलके केले आहे. मी या चरित्र ग्रंथास शुभेच्छा देतो. वाचकांचे अभिनंदन करतो. 'तन्वी हर्बल्स' चिरायू होवो ! - अशोक समेळ, ज्येष्ठ नाटककार
-
Nivdak Chin.Tra.Khanolkar : Nakshtra Dena (चिं. त्
मराठी साहित्यविश्वात एक अनाम पक्षी थोडाच वेळ फांदीवर बसला आणि उडूनही गेला. पण त्या पक्ष्याने अंत:करणातील सूर आळवले. त्या सुरांमुळे सर्व भावविश्व ढवळून निज्ञाले, इतकी त्या सुरातील आर्तता विलक्षण होती. त्या सुरांनी सर्व साहित्यविश्व गंधित झाले. ते सूर आजही विसरले गेलेले नाहीत. त्या सुरांची मोहिनी आजही सर्वांच्या मनात कायम आहे. आणि त्याने दिलेले 'नक्षत्रांचे देणे' आजही कायमस्वरूपी मनी वसलेले आहे. हा अनामपक्षी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोकणाने महाराष्ट्राला दिलेले एक तेजस्वी रत्न ! चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभु ! त्यांची साहित्यातली काही 'निवडक नक्षत्रे', त्यांच्या काही साहित्यकृतींद्वारे आपल्यासमोर ठेवत आहोत. मनात कृतज्ञतेची भावना दाटून येत आहे "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणेमाझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने..." --- डॉ. माधवी वैद्य
-
Advait (अव्दैत)
भावार्त आवर्तात मौन असलेल्या श्री. अशोक चिटणीसांच्या कल्लोळाचा प्रत्यय 'अद्वैत' ह्या त्यांच्या नव्या काव्यसंग्रहातून येतो. एक खोलवरची प्रतीक्षा हा साऱ्या कवितांचा स्थायी भाव आहे. 'अद्वैत' ह्या काव्यसंग्रहातून उत्कटतेची निसर्गरूपे जशी आहेत, तशीच 'कुणाचे पाप कुणाच्या माथी' सारखी ओवी रूपबंधातून व्यक्त जागवलेली सामाजिक जाणिवेची, समाजमनात दाटून उरलेल्या अदृश्य धाकांची सल आहे. 'अवघा क्षणभर'सारखी मुग्ध प्रीतीचे मंत्रभान सुचवणारी ही कविता आहे. 'तरंग उचकी'सारखा निसर्ग संवेदन टिपणारी हायकू स्पर्शीची तरलिकाही कवी श्री. अशोक चिटणीस यांचे तरल संवेदन सुचवीत येते. निराशेचा नव्हे तर विरक्तीचा करडा सूर छेडणारी 'आवरावे पसारे' सारखी कविता कवी अशोक चिटणीस यांच्यातील व्यवहाराच्या ओझ्याने आता होत असलेली दमणूक व्यक्त करते. अव्यक्ताला व्यक्त करू पाहणारा हा शब्दप्रवास म्हणजे 'अद्वैत' हा काव्यसंग्रह ! माझ्या हार्दिक शुभेच्छा!
-
Leedar (लीडर)
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करताना एकीकडे कायद्याच्या क्षेत्रात मिळवलेल्या अनेक पदव्या. शिवाय पीएच.डी. सारखी उच्चतम पदवी गाठीशी! असं असतानाही त्या पलीकडे जात युनियन लीडर म्हणून स्वभावानुसार कामगारांच्या प्रश्नांशी सातत्याने भिडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अशोक भाईडकर यांचे हे जिवंत अनुभव काळजाला भिडतात. कारण ते अत्यंत खरे आहेत! मिळवलेल्या अधिकारपदाला रामराम ठोकून युनियन लीडर म्हणून आयुष्य जगलेला हा कामगारबंधू कोणत्याही आकर्षणांपासून अलिप्त राहत, त्यांना बळी न पडता 'लीडर' म्हणून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहिला. 'मोडेन पण वाकणार नाही' ही उक्ती अंगी बाणवत लढत राहिला. आजमितीला मात्र कठोरपणे केलेल्या परीक्षणातून ते या निष्कर्षाप्रत येतात- आज भारत सरकारची लेबर पॉलिसी पूर्णपणे बदलली आहे. सर्वच कामं कॉन्ट्रॅक्टरतर्फे केली जात आहेत. आमच्या कंपनीत मागच्या वीस- पंचवीस वर्षांत वर्कर्सची नवीन भरती झाली नाही. जिथे दहा-पंधरा हजारांत वाटेल तेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर, फॅज्युअल लेबर मिळतात त्यामुळे वर्कर्सना लाखो रुपयांचा पगार देण्याची कंपनीला गरज वाटत नाही. जर परमनंट वर्कर्सच नाहीत तर युनियन कशी राहणार ? गव्हर्मेंटच्या या पॉलिसीमुळे आज तरुणवर्ग देशोधडीला लागला. हायर ॲन्ड फायर सीस्टिममुळे तरुणाला कुठल्याच कंपनीत भविष्य राहिलं नाही. कंपनीत कायम कामगार नाही म्हणून युनियन नाही आणि युनियन नाही म्हणून लीडर नाही ! ---- डॉ. अलका आगरकर-रानडे
-
Vatela Sobat Havi (वाटेला सोबत हवी)
आयुष्याच्या या वाटेवर हवा कुणी सोबती, हवा कुणी सोबती कधी अचानक उठते वादळ घरट्यालाही येते भोवळ मनोरथाच्या आवेगाला अवघड वळणे किती...? हवा कुणी सोबती... - स्व. पंडित यशवंत देव
-
Anandache Pan (आनंदाचे पान)
सुखी आयुष्याचा सुखकर मंत्र सुख द्यावे, घ्यावे, असे जगावे आयुष्याचे पान, हिरवे हिरवे, सुंदर बरवे आयुष्याचे रान. चुका जाहल्या ? माफही केल्या आयुष्याचा उद्या असावा, कोरा मस्त महान. दुसरे मोठे, आपण छोटे कायम व्हावे लहान. तरच आनंदी, तरच सुखी हाची 'मंत्र' महान
-
Valuche Kille (वाळूचे किल्ले)
मुंबईसारख्या महानगरात वाढलेली, शिकलेली आणि नोकरी करणारी व्यक्ती जीवनाकडे एका वेगळ्या आत्मविश्वासाने बघत असते. अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सतत असा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. मात्र जीवनात कधी तरी असे काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात, तेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो. जे आयुष्य आपल्या मुठीत आहे, ते आयुष्य वाळूप्रमाणे हातातून निसटत असतांना बघावे लागते. तेव्हा स्वतःच्या मर्यादांची, हतबलतेची जाणीव टोचते. अशा प्रसंगी लक्षात येते की आपल्याला वाटत होतं ते आपलं आयुष्य म्हणजे एक अजिंक्य, अभेद्य किल्ला; पण प्रत्यक्षात तो असतो एक साधा वाळूचा किल्ला! एक लाट येते आणि किल्ला वाहून जातो. जरा धारदार नजरेने बघितले तर आपल्या आजूबाजूला असे अनेक वाळूचे किल्ले दिसतील.
-
Pais Pratibhecha (पैस प्रतिभेचा)
प्रतिभाताईंच्या कल्पनाविश्वाला भविष्याचा वेध घेण्याची आस तर आहेच; तथापि सतत प्रगतिपथावर असणाऱ्या विज्ञानयुगातल्या माणसाचं पुढे काय होणार याची उत्सुकता आणि काळजीही आहे. त्यांच्या विचारविश्वात विचारवंत, सुधारक, शास्त्रज्ञ, पराक्रमी स्त्रिया, विद्वान स्त्रिया, पिचलेली, नियतीला शरण जाणारी माणसं, धर्म, संस्कृती, कला, निसर्ग हे सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत असतं. म्हणूनच ताईंशी गप्पा मारणं हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो.
-
Abhagi Kanya (अभागी कन्या)
अभागी कन्या एकूणच सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह मराठी कथात्मक साहित्यात महत्त्वाचा ठरणार आहे. याचे वेगळेपण म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये बदललेले समाजदर्शन यातून घडते. समकालीन मानवी जीवनात निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांची मांडणी यात येते. बेरोजगारी, भ्रष्टाचार, कर्जबाजारीपण, एड्स, अंधश्रद्धा इ. कळीच्या सामाजिक समस्यांचा शोध येथे खिलारे यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सुभाष खिलारे यांचा 'अभागी कन्या' हा कथासंग्रह नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरेल. त्यातील विचारप्रबोधनाच्या चळवळीला साह्यभूत ठरणार असून जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणा मानून लेखन करणाऱ्या नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
-
Katha Shivray (कथा शिवराय)
स्वराज्य निर्मिती अन् स्वधर्म रक्षण, कल्याणकारी योजना, शेती व व्यापार वृध्दी, सक्षम आरमार निर्मिती.. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे शिवगाथा! कुशाग्र बुध्दी, चतुर युक्ती, कठोर शिस्त, अविश्रांत परिश्रम, सूत्रबद्ध नियोजन आणि शुद्ध चारित्र्य म्हणजे शिवगाथा ! इंग्रजीचा अट्टाहास नव्हे तर स्वभाषेचा अभिमान, पुतळे उभारणे नव्हे तर गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवगाथा! चंगळवाद अन् बेशिस्त नव्हे तर कठोर शिस्त आणि पोकळ घोषणा नव्हे तर ध्येयाची उत्तुंग झेप म्हणजे शिवगाथा ! ही यशोगाथा साध्या सरळ आणि रंजक शैलीत कथन करण्याचा हेतू हा की ती छोट्या मोठ्यांना.. सर्वसामान्यांना समजावी, उमजावी! ही यशोगाथा सर्वांना कळावी, आकळावी, समजावी, उमजावी, तनमनात झिरपावी.. श्वासात भिनावी आणि कृतीत उतरावी ही प्रार्थना !
-
Tablet (टॅब्लेट)
मुंबईमध्ये एका बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीत केमिस्ट म्हणून महेश नोकरीला लागतो. ही नोकरी त्याला केवळ त्याच्या हुशारीवर मिळालेली असते. दैव मात्र ती हिसकावून घेणार असते पण त्याचे नशीब बलवत्तर असल्यामुळे ती नोकरी त्याला मिळते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात 'टाय' लावून जाणाऱ्या व्यक्तीकडे नशीबवान नोकरदार म्हणून पाहिले जायचे पण तिथे कामाची जबाबदारीही तितकीच असे. औषधे बनवणाऱ्या या कंपनीत विश्लेषक केमिस्ट म्हणून महेश लागतो. पण त्याच्या हुशारीवर तो उत्पादन खात्यात जातो कारण इथे कर्तृत्व दाखवण्याची जास्त संधी असते. इथे कामगारांशी संबंध येतो. त्यांच्या युनियनशी बोलावे लागते हे सर्व अत्यंत जबाबदारीने करणे जरूर असते. त्याचबरोबर कंपनीने दिलेले उत्पादनाचे 'टारगेट' कामगारांच्या सहकार्याने पुरे करणे जरुरीचे असते. औषधाच्या उत्पादनात अनेक अडचणी येतात. उत्पादनाची मशीन्स व्यवस्थित राखणे, त्यावर काम करणाऱ्या कामगाराकडून उत्पादन प्रोग्रामप्रमाणे काढून घेणे, एकीकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे तर दुसरीकडे कामगारांमध्ये एकोपा राखणे, या सगळ्यात एक-एक तासाने उत्पादनाचा दर्जा तपासण्याकरिता येणाऱ्या गुणवत्ता विभागाच्या 'केमिस्टच्या' तक्रारी दूर करणे एक का अनेक अडचणी. हे सर्व महेश कसे पार पाडतो आणि शेवटी Managementची मर्जी संपादन करीत एक एक प्रमोशन घेत VICE PRESIDENT (PRODUCTION) या उच्च पदापर्यंत कसा पोचतो आणि शेवटी कंपनीच्या नियमाप्रमाणे साठाव्या वर्षी निवृत्त होतो. पण तो खरोखरीच निवृत्त होतो का? या प्रश्नाचे उत्तर कादंबरी शेवटपर्यंत वाचल्यावरच कळेल....