Avghachi Sansar (अवघाचि संसार)

By (author) Dr. Shubha Thatte Publisher Dimple Publication

डॉ. शुभा थत्ते 'क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट' आणि आमच्या आयपीएच संस्थेच्या संस्थापक विश्वस्त. मी जरी त्यांना थत्ते मॅडम म्हणत असलो तरी त्या माझ्या शिक्षक, प्रेरक, सहकारी आणि आई सुद्धा आहेत. म्हणून थत्ते मॅडम या औपचारिक वाटणाऱ्या संबोधनामागे माझ्याच नाही तर आमच्या सर्व आयपीएच कुटुंबाच्या खूप गाढ आणि जवळिकीच्या भावना आहेत. ध्येयाबद्दलची स्पष्टता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. त्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासाला मिशन म्हणून पाहिले व रुग्ण सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून 'क्लिनिकल' ही मानसशास्त्राची शाखा निवडली. मानसशास्त्राचा हा ध्यास पुढे विवेकनिष्ठ मानसशास्त्राच्या परिघामध्ये उतरला. त्यामुळे मॅडम वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांना तोंड देता देता मानसशास्त्र जगू लागल्या. स्वतःच्या अनुभवातून तावून-सुलाखून निघालेले ज्ञान त्या शिकवू लागल्या. त्यांचे मन सुदृढ, संपन्न, समृद्ध बनत गेले आणि बरोबरीने 'सुदृढ मन सर्वांसाठी' हे ध्येय वाक्य जगणारी आमची संस्था वास्तवात आली. गेल्या ३६ वर्षांमध्ये मॅडमनी मानसशास्त्राची जोड दिली कला आणि साहित्याला. त्याचबरोबर ज्येष्ठत्वावरचे संशोधन, मानसिक चाचण्यांवरचे संशोधनही संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केले. थत्ते मॅडम 'पॉझिटिव्ह सायकॉलॉजी' जगत असतात. त्यांच्या आठवणींचा पट आपल्यापुढे मांडणारे हे पुस्तक याच यात्रेतील पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यांचे हे पुस्तक 'कडू गोड आठवणींचा कोलाज' आहे असे त्या म्हणतात. मॅडमच्या वृत्ती प्रमाणे त्यांनी कडूपणा बोथट करून टाकला आहे आणि गोडी वाढवलेली आहे. नियमित चालणाऱ्या विवेकनिष्ठ मानसशास्त्राच्या वर्गामधून त्या स्वतःचे विरजलेले ज्ञान अकृत्रिमपणे इतरांना देत असतात. ध्यासपंथी चालणारी पावले यापेक्षा वेगळी काय असतात ? -- डॉ. आनंद नाडकर्णी

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category