Samradni
''ऐश्वर्या, लोक ज्याला महत्त्वाकांक्षा म्हणतात, त्या अर्थानं मी महत्त्वाकांक्षी नाही आणि मला स्वत:ला असं महत्त्वाकांक्षी व्हायला आवडतही नाही. दुस-या कुणाचं मी काय सांगू? पण जे दिसेल ते मिळवायला बघायचं, हाताला लागलं म्हणून खिशात घालायला बघायचं, हे मला बरोबर वाटत नाही. माझं कोणतं काम आहे, हे मला नक्की कळलेलं आहे. नुसतं मोठं होणं अशासारखी तर मला मुळीच महत्त्वाकांक्षा नाही. उलट सतत असं मोठं होण्यासाठी धडपड करणा-या लोकांच्या वागण्याचा मला अर्थच कळत नाही. हे लोक कशासाठी सारखे धावत सुटतात, ते समजत नाही, त्यामुळे हाती असलेल्या कामाला पूर्ण न्याय द्यायच्या अगोदरच ते दुसरं काहीतरी मिळवायला बघतात. कुठंच शांती नाही. ऐश्वर्या, अगं कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. फक्त ते नीट समजून घेऊन केलं पाहिजे. मग ते छोटं कामही सगळ्यांत प्रभावी वाटतं आणि ते करणा-यालाही काहीतरी केल्याचं समाधान वाटतं आणि शेवटी, आयुष्याला मर्यादा असतेच ना? नुसतंच पळत सुटण्यात सार्थक कशाचं वाटणार? मला तर कधी कधी एखादा प्राथमिक शाळेचा शिक्षकही, शिक्षणमंत्र्यांपेक्षा थोर वाटतो. एखादा सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा कर्तबगार वाटतो, कारण त्याला आपल्या कामाचा अर्थ कळलेला असतो.''