-
Maharani Bayajabai Shinde (महाराणी बायजाबाई शिंदे)
बायजाबाई शिंदे यांचा हा जीवनपट आहे. घाटगे घराणं हे त्यांचं माहेर. स्वातंत्र्याचा व शौर्याचा वारसा त्यांना आपले पिता सर्जेराव घाटगे यांच्याकडूनच मिळाला. त्या सौंदर्यवती होत्या. त्यांचा विवाह महादजी शिंदे यांचे उत्तराधिकारी दौलतराव शिंदे यांच्याशी झाला. विवाहानंतर राज्यकारभारात, युद्धात बायजाबाईंचा सहभाग असायचा. पतीच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास त्यांनी सुरुवात केली; त्यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी व्यवसाय, व्यापार वाढवून आपली राज्यातील तिजोरी, कोषागार समृद्ध केले. सैन्याची चोख व्यवस्था करून आपल्या राज्यातील पेंढारी व ठग लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला, मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याचा प्रयत्न केला. जनकोजी या त्यांच्या दत्तक पुत्रामुळे त्यांना बराच त्रास भोगावा लागला. त्यांचे नातू जयाजीराव शिंदे यांनी मात्र बायजाबाई साहेबांना त्यांच्या वृद्धापकाळात खूप जपले. भारताच्या पहिल्या महिला बँकर म्हणून लौकिक मिळवणार्या बायजाबाई यांचा प्रेरक जीवनप्रवास.
-
Indias Railwayman (इंडियाज रेल्वेमॅन)
भारताचे रेल्वेमॅन डॉ.श्रीधरन यांचं हे चरित्र आहे. त्यांचं बालपणीचं जीवन, त्यांची बहीण-भावंडं, त्यांचा शैक्षणिक प्रवास, त्यांचं विवाहोत्तर कुटुंब, रेल्वेतील नोकरी, पाम्बनच्या पुलाचं काम, जहाजबांधणीच्या कामाच्या वेळचा अनुभव, निवृत्तीनंतर कोकण रेल्वेच्या कामाची आलेली जबाबदारी, कोकण रेल्वेचं काम करताना अध्यक्ष असूनही मिळणारं नियमबाह्य वेतन, त्यासाठी त्यांना द्यावा लागलेला लढा आणि त्यांचा झालेला विजय, कोलकाता मेट्रोचं काम, भारतात मेट्रो सुरू करण्याचं श्रेय, चेन्नई आणि मुंबईत केलेली कामं, दिल्ली मेट्रोचं आव्हानात्मक काम, त्या कामादरम्यान झालेला अपघात, राजीनाम्याची केलेली घोषणा आणि नंतर मागे घेतला राजीनामा, त्या कामाच्या दरम्यान आलेला हृदयविकाराचा झटका, मेट्रो रेल कायदा, ब्रॉड गेज-स्टॅन्डर्ड गेज वाद, त्यांच्यावर झालेली टीका आणि त्याला श्रीधरन यांनी दिलेली उत्तरं इ. बाबींवर आणि त्यांच्या शिस्तप्रियता, कार्यतत्परता, ऋजुता इ. गुणांवर या चरित्रातून प्रकाश पडतो. यशस्वी व्यक्तिमत्त्वाचं प्रेरणादायक चरित्र.
-
The Hidden Hindu Part 1 (द हिडन हिंदू भाग १ )
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
-
Nisargaputra (निसर्गपुत्र)
‘निसर्गपुत्र’ ही अॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.
-
Dangerous Minds (डेंजरस माइंड्स)**
‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.
-
Chotyansathi Hava ,Pani, Prakashache Prayog (छोट्य
‘छोट्यांसाठी - हवा, पाणी ,प्रकाशाचे प्रयोग हे पुस्तक लिहिताना छोट्या मित्रांना हवा, पाणी, प्रकाश यांचे गुणधर्म व त्यामुळे होणारी गंमत सोप्या प्रयोगांतून कशी दाखविता येते, याचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर त्यांचे ज्ञान खेळतखेळत दिले आहे. या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. प्रत्येक प्रयोगाला आकृती काढलेली आहे. त्यामुळे ते प्रयोग सहज समजू शकतात. प्रयोगासाठी लागणार्या सर्व वस्तू सहज उपलब्ध होणार्या असल्यामुळे प्रयोग करताना कोणतीच अडचण येणार नाही. प्रयोग करताना त्या विषयाचे तात्त्विक ज्ञान होईल, जोडणी कशी करायची याची माहिती होईल व शेवटी प्रयोग पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास निर्माण होईल.
-
Deserter(डेझर्टर)
आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’
-
The Stories We Tell (द स्टोरीज वी टेल)
‘द स्टोरीज वी टेल : पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधताना’ या पुस्तकात प्रख्यात पुराणकथा अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील व जगभरातील पुराणकथांच्या खजिन्यातून ७२ रत्ने निवडली आहेत. `टी टाईम टेल्स’ या त्यांच्या वेबकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचकाला काळाच्या प्रदीर्घ टप्प्याची अनोखी सफर घडवते.
-
Khulbhar Dudhachi Kahani (खुलभर दुधाची कहाणी)
अमरापूरकर हे नाव ऐकलं की लगेच चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नजरेसमोर अवतरतो. अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांचा. एकीकडे हा दिग्गज अभिनेता आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीवर ठसा उमटवत होता, तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर त्यांची सहचारिणी सगळ्या ताळमेळाचं नेमकं गणित मांडत होती. म्हटलं तर ती खुलभर दुधाची कहाणी आणि म्हटलं तर एका दीर्घ प्रवासाचा नितळ पट. ज्यात सुनंदा अमरापूरकर आपल्या जीवनपटाची छोटी छोटी क्षणचित्रे असोशीने जगतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके...शैक्षणिक प्रवास...नाटकातूनच सदाशिव अमरापूरकरांशी जुळलेले सूर आणि नंतर त्यांच्याशी झालेला विवाह...विवाहोत्तर जीवन...असा हा पट. पतीच्या प्रसिद्धीच्या वलयापासून स्वतःला दूर ठेवून त्यांनी एका कलावंताला आवश्यक असणारा अवकाश जोपासला. त्याच वेळी साऱ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. स्वतः नाटकात काम करण्याची क्षमता असूनही नवऱ्याचं कलावंतपण जोपासण्यासाठी इच्छेला मुरड घातली. सदाशिव अमरापूरकरांच्या करिअरसाठी मुंबईला केलेलं स्थलांतर असो वा दोन शहरातला, नातेसंबंधातला आपुलकीचा धागा कायम जोपासणं असो, सुनंता अमरापूरकरांनी सगळं अढळ श्रद्धेनं केलं. सोबत अनुवादाच्या क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. त्यामुळंच त्यांचं हे आत्मकथन निष्ठेनं संसाराची सूत्रे चालवणाऱ्या खमक्या स्त्रीचं चरित्र वाटतं. माणसांनी, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांनी गजबजलेलं बहुआयामी आणि हृदयस्पर्शी आत्मकथन...
-
Gazal (गझल)
"मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले ? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘ग़जल’ हा ग्रंथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (GOLDEN TREASURY) आहे! "
-
Kanchanmrug (कांचनमृग)*
"‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं.‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत द-याखो-यांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा -हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?"
-
Anand Janmala (आनंद जन्माला)
मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
-
Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.
-
Padchaya (पडछाया)
‘सौभाग्य’ या कथेतून डॉ.सोहनी गिनीपिग प्रयोग करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ मधून ‘मेकॅनिकल ट्यूटर’– कॉम्प्युटरच्या साह्याने मेंदूत ज्ञान भरण्याचा शोध लावतात. ज्ञानग्रहण करणार्या पेशी उत्तेजित करून मेंदूपेशीत टेपरेकॉर्डरप्रमाणे ज्ञान रेकॉर्ड होते.या भोवती हे कथानक फिरते. ‘ऐलमा पैलमा’ या कथेतून दत्तक घेतलेल्या ईशाच्या मानेला गाठ असल्याचे समजते... ही फसवणूकच असते, नीताला याचा त्रास होतो. प्रभाकर यंत्रमानव नंदिनीला घरी आणतो. ती सर्वांना शेकहॅण्ड करते. यावेळी सर्वांना ईशाची खूप आठवण येते.मग पुन्हा ईशाला दत्तक म्हणून सांभाळण्याचा निर्णय होतो. ‘एका यंत्र मानवाची डायरी’ या कथेत स्वार्थी रमेश संपत्तीसाठी मोठ्या भावाचा खून करतो,हे रोबो पाहतो व स्वत;शीच म्हणतो,‘यंत्रमानवाला नाती नाहीत ते किती बरं आहे.मानवाची निरपेक्ष सेवा करणे,हेच यंत्रमानवाचे व्रत आहे.’ ‘तो मी नव्हेच!’ या कथेतील अभिनेता- हनुमंत बाप्या कोरेगावकर ‘बहारकुमार’ नावाने फिल्मी दुनियेत प्रवेश करतो. एके दिवशी त्याची प्रामाणिक, हुशार व शास्त्रज्ञ मित्र संजयशी भेट होते. हनुमंत आजारी असतो. पण तो संजयला माझ्याऐवजी माझा क्लोन इंडस्ट्रीत पाठव,असं सांगतो. संजयला या खोट्या प्रकाराची कल्पनाच नसते. हा क्लोन ‘बहारकुमार’ म्हणून वावरतो. सर्वांनाच फसवून माणुसकीला काळिमा फासून,‘तो मी नव्हेच!’ म्हणून तो जगतो. ‘पडछाया’, ‘मृत्यू,’ ‘सत्य आणि मिथ्य’ या व इतर वैज्ञानिक कथा वाचकांना आधुनिक विज्ञानाची ज्ञानसमृद्धतेची वाट दाखविणार्या.
-
The Secret Friend (द सीक्रेट फ्रेन्ड)
बोस्टन बंदरात एक मृतदेह सापडतो. डार्बी मॅकार्मिक करत असलेल्या दोन खुनांच्या तपासाशी याचा संबंध असतो. या गुन्ह्यात एक चक्रावणारी गोष्ट असते, ती म्हणजे मृतदेहांसोबत आढळलेली व्हर्जिन मेरीची छोटी मूर्ती. आणखी एका मुलीच्या अपहरणानं हे रहस्य आणखी भयावह होतं. सगळे धागे आधीच्या खुनांशी जुळतात. आणि डार्बीचा शोध आणखी गुंतागुंतीचा होतो. ख्रिस मुनी यांचं हे सायकोथिलर पुस्तक पानागणिक शहारे आणतं. आणि डार्बीसोबत वाचणाराही पुस्तकाच्या अखेरपर्यंत खुन्याच्या शोधात गुंतून राहतो.
-
Junglee Kulguruchi Jangi Katha (जंगली कुलगुरूची जं
कोप्पळ जिल्ह्यातल्या अळवंडी या कुग्रामातील यंकप्पा रामोशी यांचा तेजस्वी हा मुलगा. गदगच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने, तिथे चोरून वर्षभर रहाणारा, आठवी पास होईपर्यंत म्हशी राखत फिरणारा, शेण गोळा करत, शेंगा चोरत फिरणारा, हा मुलगा इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यालयाचा कुलगुरू होतो, उत्तम बांधणी करत विद्यापीठ प्रगतीपथावर नेतो आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्ती व सन्मान मिळवून देतो. त्या मुलाची आत्मकथा म्हणजेच हे पुस्तक. डॉ. कट्टीमनी यांचं जीवन म्हणजे शून्यातून सिंहासन निर्माण करणाऱ्याच्या कथेचं रूपक आहे. जातीयवादाची बजबजपुरी आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा कात्रीत अडकलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यापीठाला डॉ.कट्टीमनींच्या रुपाने एक भाग्यविधाता लाभला. पदभार स्वीकारताच त्यांनी विद्यापीठातील रुळलेल्या उदासीन वाटा नाकारत कायापालट सुरू केला. आणि अवघ्या काही काळात आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा हा विलक्षण प्रवास देशातील शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा प्रवास या पुस्तकाच्या पानापानातून वाचकांसमोर उलगडत जातो.
-
Bhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta (भारता
"पाश्चिमात्य लोकांनी १७९६ साली लसींचा शोध लावला, त्याच्याही आधीच्या काही शतकांपासून भारतीय लोक ‘लस` टोचण्यात तरबेज होते. ‘भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट’ हे पुस्तक एडवर्ड जेन्नर यांच्या काळापासून ते कोविड-१९ साथीपर्यंतच्या लसींच्या प्रवासाचा आलेख उलगडून दाखवते; ज्यात लसींच्या बाबतीतल्या भारतीय दृष्टिकोनापासून ते जागतिक दृष्टिकोनापर्यंत, लसींचे अनेक पैलू समाविष्ट आहेत. लस नेतृत्व, लसींच्या बाबतीतला राष्ट्रवाद, लस घेण्याबाबतची अनिश्चितता, उत्सुकता आणि नि:पक्षपात, तसेच अगदी अलीकडची ‘राजनैतिक चलन` ठरलेली ‘लस-मैत्री`, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तर या पुस्तकात केलेला आहेच, पण त्याचबरोबर, जगातली सर्वांत मोठी व्यापक अशी लसीकरण मोहीम राबवताना भारताने जे अगदी बारकाईने विचार करून काळजीपूर्वक आणि काटेकोर असे लक्षवेधक नियोजन केले होते, त्यांची संपूर्ण माहिती हे पुस्तक वाचकांना करून देते."
-
The Golden Age (द गोल्डन एज)
या कादंबरीचे नायक-नायिका आहेत फ्रॅंक आणि एल्सा. ‘द गोल्डन एज’ या पोलिओग्रस्त मुलांवर उपचार करणार्या ऑस्ट्रेलियातील संस्थेत या दोघांची भेट होते आणि ते परस्परांच्या प्रेमात पडतात. मेयेर आणि इडा हे फ्रॅंकचे आई-वडील. जॅक आणि मार्गारेट हे एल्साचे आई-वडील, यांच्यासह या संस्थेतील परिचारिका लिद्जा, ऑलिव्ह, तसेच या संस्थेत राहणारी मुलं इ. यांचंही जीवन त्यांच्या व्यक्तिरेखांसह या कादंबरीतून उलगडतं. पोलिओग्रस्त मुलांना उपचारांबरोबर सकारात्मकता देणारी ही संस्था आहे. एका परिचारिकेला एकदा फ्रॅंक आणि एल्सा एका अंथरुणात नको त्या अवस्थेत सापडतात. मग त्या दोघांना संस्थेतून काढून टाकल्यामुळे ते आपापल्या घरी परत येतात; पण एकमेकांसाठी झुरत राहतात. इडा मार्गारेटशी संपर्क साधून फ्रॅंक आणि मेअरसह एल्साच्या घरी जाते. एल्सा आणि फ्रॅंकची भेट होते. अतिशय साध्या कथानकातून उच्च भावनिक स्तरावरचा आनंद देणारी कादंबरी.
-
An Incomplete Life By Vijaypat Singhaniya (अन इनकॉ
विजयपत सिंघानिया म्हणजे भारतीय उद्योगसमूहातलं अग्रगण्य नाव. पण त्यांची ओळख फक्त रेमंड उद्योग समूहापुरती मर्यादित नाही. हा उद्योगपती ओळखला जातो त्याच्या अगम्य जिद्दीसाठी. मग ते हॉट एअर बलुनमधून ६९ हजार फुटांवरून उड्डाण घेणं असो वा छोट्या विमानातून केलेला विमान प्रवासाचा विक्रम असो. विजयपत आपल्या जीवनप्रवासातून नवा आदर्श घालून देतात. तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर एका हतबल पित्याची कहाणीही ते सांगतात. आपल्या जीवनानुभवांवर कोणताही पडदा न टाकता अभिनिवेषहीन पद्धतीने मांडलेलं त्यांचं हे आत्मकथन म्हणूनच वाचकांवर मोहिनी टाकणारं ठरतं.
-
Adharmakand (अधर्मकांड)
या कादंबरीचे कथानक आहे सोळाव्या शतकातले. जेव्हा गोव्यातील काही भागावर पोर्तुगीजांची सत्ता होती. राय गावातील जमीनदार पिएदाद (मूळचा वासू पै) पोर्तुगिजांच्या पूर्णपणे गुप्त असलेल्या तुरुंगात (मोठं घर) एका ओढूनताणून लावलेल्या आरोपाची सजा भोगतोय. इंक्विझिटरसमोर न केलेल्या गुन्ह्याची कबुली तो देत नाहीये. पाशवी वागणूक मिळते त्याला तिथे. त्याची पत्नी पिएदाद (गोमती) धर्मांतराच्या धक्क्याने आणि मुलांच्या वियोगाने भ्रमिष्ट होते आणि त्यातच तिचा अंत होतो. एकतर धर्मांतर करा, नाहीतर गाव सोडून जा, या पोर्तुगीजांच्या कुटिल नीतीला बळी पडलेलं पिएदादचं कुटुंब हे एक प्रातिनिधिक उदाहरण. धर्मांतरामुळे लोकांच्या मनाची होणारी घुसमट, हिंदूंना लग्नसोहळे साजरे करण्यास बंदी, मोठ्या घरातील वैÂद्यांचं जीवन, त्यातील काहींना जाहीरपणे जिवंत जाळण्याची शिक्षा (कायतानलाही शेवटी तीच शिक्षा मिळते), अशा जुलमी वातावरणाचं आणि त्यात होरपळणार्या माणसांचं ज्वलंत चित्रण करणारी, अंतर्बाह्य हलवून टाकणारी कादंबरी.
-
Coronanatarche Udyogvishwa (कोरोनानंतरचे उद्योगविश
डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेले `कोरोना नंतरचे उद्योग विश्व ` हे पुस्तक येत्या काळात आवश्यक असलेल्या उद्योजकीय मानसिकतेचा, कष्टाचा, जिद्दीचा आणि संधींचा संदर्भग्रंथ आहे. त्याच बरोबर उद्योजक बनण्याची प्रेरणा नवोदितांना यामधून नक्कीच मिळेल. गोष्टीरूप उद्योग कथा नेहमीच जास्त परिणामकारक होतात हेच नेमके ह्या पुस्तकाने साधले आहे. उद्योग यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याचा धांडोळा हे लिखाण अप्रत्यक्षपणे घेते. भांडवल, ग्राहकसेवा, वस्तू किंवा सेवेचा दर्जा, जाहिरात तंत्र, वितरणाचे आयोजन अशा उद्योगावश्यक गोष्टी अनेक संदर्भातून समोर येतात. कोरोनानंतरचे जग नोकरी मागणाऱ्याऐवजी नोकरी देणाऱ्यांचे असेल यावर भर देणारे हे लेखन आहे.
-
Anuwadatun Anusarjanakade (अनुवादातून अनुसर्जनाकडे
लीना सोहोनी यांनी त्यांचा अनुवाद क्षेत्रातील प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. तो सांगताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवादाच्या क्षेत्रातील पदार्पण आणि जीवनाला मिळालेली कलाटणी, अनुवादासाठी पुस्तकं कशी निवडावीत, इ. बाबींकडे त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या भागातून लक्ष वेधलं आहे. दुसर्या भागात त्यांनी सुनील मेहता, अनिल मेहता, सुधा मूर्ती, किरण बेदी, जेफ्री आर्चर या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिलं आहे. तिसर्या भागात अनुवाद कलेची पार्श्वभूमी, अनुवाद आणि भाषांतर, अनुवादाची तंत्रे, अनुवादाचे स्वरूप, अनुवादाचे वर्गीकरण, साहित्यिक अनुवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्या इ. मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाच्या चौथ्या भागात ‘भाषा आणि व्याकरण’ आणि ‘अनुवादात हरवलेल्या गोष्टी’ हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. या पुस्तकात आवश्यक तिथे सुयोग्य उदाहरणांचा वापर त्यांनी केला आहे. स्वत:चे अनुभव व्यक्त करतानाच अनुवादासंबंधीचं सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य वाचकांना हे पुस्तक आवडेलच; पण अनुवादाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्या आणि या क्षेत्रात नवोदित असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.