-
Lokskha Dnyaneshwar ( लोकसखा ज्ञानेश्वर )
स्वजातीतून कायमचे बहिष्कृत केलेल्या मातापित्यांच्या पोटी जन्माला येऊनही आत्मविश्वासाच्या जोरावर स्वकर्तृत्वाने जीवनाचे सोने करणारा, शेकडो वर्षे सोवळ्या वर्णवर्चस्ववाद्यांनी कर्मकांडात्मक ज्ञानाच्या आणि धर्माधिकाराच्या आधारे शोषण करत उपेक्षित ठेवलेल्या जनसामान्यांच्या समाजाला विधायक नेतृत्व देणारा डोळस नेता, बहुजन समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा द्रष्टा, ब्राह्मणापासून भटक्यापर्यंतच्या सर्व समाजाचे कल्याण साधणारे तत्त्वज्ञान निर्माण करणारा ऋषितुल्य तत्त्वज्ञ, निरनिराळ्या जातिजमातींतून संत-संघटक निर्माण करू पाहणारा आणि त्या सर्वांना एकत्र आणून त्यांना आध्यात्मिक शक्तीचे बल बहाल करणारा महात्मा, वर्ण, जाती, कुल इत्यादी भेदभावांच्या, उच्चनीचतेच्या भिंती खिळखिळ्या करू पाहणारा आणि नवसमाज घडवू पाहणारा क्रियावान सुधारक, जनसामान्यांच्या प्राकृत बोलीला साहित्यसिंहासनावर स्वकर्तृत्वाने बसवू पाहणारा श्रेष्ठ साहित्यिक ... म्हणजे 'लोकसखा ज्ञानेश्वर’ !
-
Shekra ( शेकरा )
रणजित देसाईंची अखेरची लघुकादंबरी जंगलातील जीवन हा लघुकादंबरीचा विषय असून शेकरा हा यातील मध्यवर्ती प्राणी आहे. किंबहुना शेकर्याच्या नजरेतून वनजीवन रेखाटणे हे लेखकाचे उद्दिष्ट आहे. शेकरा हा खारीसारखा दिसणारा त्यापेक्षा मोठा असणारा शाकाहारी प्राणी. वनजीवनातील विविध प्राण्यांचे जीवननाट्य न्याहाळत तो जगत असतो. जंगलातील विविध प्राणी, त्यांच्यातील परस्परसंबंध, संघर्ष, सवई, छंद, गुण, दोष इत्यादींच्या सहाय्याने जंगली विश्व साकार होते. या जीवन प्रवासाचा वेध घेत घेत लेखक हळुवारपणे भोवतालच्या रौद्र वास्तवाचा, क्रौर्याचा आणि भीषण नाट्याचा अनुभव घेत राहते. कादंबरीत कोठेही माणसाचा किंवा मानवी जीवनाचा उल्लेख नसूनही मानवी जीवनातील एका भीषण सत्याचे कलात्मक दर्शन वाचकाला घडते.
-
Kachvel ( काचवेल )
सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ह्यांच्या संकलित आत्मचरित्रात्मक लेखनाच्या झोंबी, नांगरणी, घरभिंतीनंतरचा हा अखेरचा टप्पा. ह्या लेखनाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ तोपर्यंतच्या तत्पूर्वीच्या त्यांच्या जीवनातील वीस-एक वर्षांचा कालखंड ह्या लेखनात आला आहे. म्हणजे जीवनसंघर्षाचा हा उत्तरार्ध आहे. त्यात काहीशी जीवनस्थिरताही आहे. आणि भविष्यवेधही. यादव प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आले आहेत आणि वाचकांनी भरभरून दाद दिली असे त्यांचे लेखनही झाले आहे, यादव नुसते लिहीत बसले नाहीत तर साहित्यविश्वही ढवळून काढले आहे. त्याचे मनोज्ञ दर्शन ह्या लेखनात घडते आहे. जे आपण बघितले, अनुभवले ते नेमके काय ह्याचा आनंद देणारे हे आनंद यादव ह्यांचे लेखन आहे. सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काकणांच्या काचकुड्यांनी 'काचवेल’ काढण्याची एक लोकप्रथा आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आनंद यादव हयांनीही आपल्या स्वकहाणीबद्दल हे असेच 'मनोहर’ काम केले आहे.
-
Aika Santanno ( ऐका संतांनो )
साधू' या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं 'साधुत्व', त्यागा-भोगाच्या कल्पना, शरीररूपी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली चादर आणि त्यावर कबीरांचं साध्या-सोप्या प्रतीकांद्वारे दिलेलं भाष्य या सर्वातून ओशोंनी मांडलेली मानवी जीवनाची कल्पना... ही कबीरांची कवनं आणि त्यावरचं ओशोंचं भाष्य ! यातून स्वच्छपणे जाणवतो तो दोघांनी मानवी जीवनाचा चहूअंगांनी केलेला सार्थ विचार !
-
Mugdha Kahani Premachi ( मुग्ध कहाणी प्रेमाची )
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्त्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेत अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे 'स्व'चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जो कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारुण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वत:तल्या शांतीमध्ये डुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारे काही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे - अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे - तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
-
Nashta Meyer Nashta Gadya (नष्ट मेयेर नष्ट गद्य )
तसलिमा एका सुसंस्कृत समाजाचं स्वप्न बघते आहे. ज्या समाजात कोणाचीही पिळवणूक होणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असा समाज तिला अपेक्षित आहे. स्वत: नास्तिक असूनही, सुसंस्कृतपणा आणि संस्कृती जपणार्या काही जुन्या रूढी-परंपरांची तिला ओढ आहे. कोणावरही अन्याय झाल्यास तसलिमा अस्वस्थ होते, चिडते. म्हणूनच लीला नागसारख्या स्त्रीला तिचा देश नुसता विसरतच नाही, तर तिचं नावनिशाणही मिटवून टाकतो, तेव्हा ती तिच्या देशावर खरमरीत टीका करण्यासही मागंपुढं पाहत नाही. मीरा मुख्योपाध्याय या जागतिक दर्जाच्या शिल्पकार. पण पश्चिम बंगाल सरकार त्यांना योग्य तो मान देत नाही, म्हणून ती या सरकारवरही नाराज आहे. स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. 'माणूस’ म्हणून त्यांना जगू दिलं जात नाही. अशा परिस्थितीत ज्या स्त्रिया समाजाचा विरोध सहन करून, आपल्या ध्येयाच्या मार्गावरील अडथळे पार करून, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्याबद्दल तसलिमाला अतीव आदर वाटतो, ती भारावून जाते. लीला नाग, मीरा मुखोपाध्याय, हासिबा बुलमेर्काव्ह यांच्यावर लिहिलेले लेख याची साक्ष देतात. या पुस्तकातील शांतिनिकेतनमधील 'दोलेर दिना’चं वर्णन करणारा लेख इतर लेखांपेक्षा वेगळा वाटतो. या लेखातून तसलिमाची काव्यात्म वृत्ती, निखळ, निकोप आनंदाला आसुसलेलं मन आणि गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूरांविषयीचा आदर व्यक्त होतो. इथं स्तंभलेखिका तसलिमाऐवजी कवयित्री तसलिमा आपल्याला अचानक भेटते.
-
Omerta (ओमेर्ता)
गॉडफादर' या विश्वविख्यात कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांची नवी कादंबरी. जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव 'ऍस्टर व्हायोला'. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया फॅमिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतर्क्य घटना घडली...निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला ! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुद्ध आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि ऍस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युद्धात विनाकरण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे ? आणि आपण काय करायचं ?
-
Nashta Need (नष्ट नीड)
चारू, आदित्य आणि शशांक हे आपापल्या जागी एका विशिष्ट परिस्थितीत सापडले आहेत. त्या परिस्थितीत त्यांचा मानसिक कोंडमारा होतो आहे. या कोंडमा-यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना त्यांच्या जवळच्याच व्यक्तींच्या सहवासात सापडतो. हा मार्ग आपल्याला नक्की कुठे नेणार आहे, याच भान येण्याआधीच त्यांनी या मार्गावर चालायला सुरूवात केलेली असते. त्यांच्या या, त्यांच्या स्वाभाव धर्मानुसार पुढे जाणा-या वाटचालीचे टप्पे टागोर या कथानकानमधून
-
Mandra (मंद्र)
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, "कलेच्या क्षेत्रात यांनं आपल्याला स्वर्ग भेटवला ! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास ?" "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो !" कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !
-
Speed Post (स्पीडपोस्ट)
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम...शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला ! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे... हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी ! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे - कुटुंबाची चौकट, परस्परांमधल्या नात्यांचे बंध, कौटुंबिक संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्यांचा आग्रह... कठोर शिस्त आणि सारंच झुगारून देणारी बंडखोरी...तासन् तास चालणारे टेलिफोन कॉल्स आणि लठ्ठ बिलांवरून घरात होणार्या हाणामार्या... मध्यरात्रीपर्यंत चालणार्या पार्ट्या आणि इंटरनेटवरचं चॅटींग... वयात येतानाच्या काळज्या, कोवळ्या वयातलं प्रेम, झपाटून टाकणारं शारीरिक आकर्षण आणि मैत्रीची नाजुक गुंतागुंत... जोडीदाराची निवड आणि शारीरिक संबंधांचा तिढा ! देश...देव...धर्म... सामाजिक जबाबदार्या आणि नागरिकत्वाचं भान!- अपरंपार प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ घेणारी, कधी पाठीत धपाटे घालणारी, चिडवणारी, टिंगल करणारी तर कधी धारेवर धरणारी, मनसोक्त हसवणारी आणि हसता हसता अचानक डोळ्यात पाणी उभं करणारी ही सुंदर पत्रं... 'जगण्या'साठी आसुसलेल्या प्रत्येक मनाला स्पर्शून जातील
-
Miraj
मिराज म्हणजे मृगजळ. मैलोगणती पसरलेल्या रुक्ष वालुकामय प्रदेशात अतीप्रखर उन्हाचे वेळी, दूरवर दिसणारा पाण्याचा आभास. ज्याला खरं अस्तित्व नसतंय; पण असल्यासारखं वाटतं. लेखक बंडूला चंद्ररत्न यांनी, वाळवंटी प्रदेशात घडणा-या या कादंबरीला फार समर्पक शीर्षक दिलेलं आहे. खेड्यातल्या शांत, संथ वातावरणातून उपजीविकेसाठी नव्याने विकसित झालेल्या शहरातल्या धबडग्यात येऊन राहणा-या दोन अश्राप जिवांची ही कथा. ते आणि त्यांची स्वप्नं यांची चित्तरकथा अंगावर शहारा आणते. सुख आणि स्वास्थ्य ही त्यांना शेवटपर्यंत मृगजळासारखी चकवत राहतात. पेट्रोडॉलर, उघड्यावर भरणारा सुवर्णबाजार यांच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आपण ज्या देशांविषयी ऐकतो, त्या तेल समृद्ध आखातील देशातलं हे दाहक आणि करूण वास्तव. अत्यंत साधेपणाने सरळ, समोर आलेल्या त्या चकचकीत नाण्याची ही दुसरी बाजू. अक्षरश: जगातल्या सगळ्या देशातली माणसं जिथे पैसे कमवायला येतात, तिथल्या स्थानिक माणसांची काय गत होते याचं प्रभावी चित्रण यात वाचायला मिळतं. अशीच मोठी शहरं आपल्याही देशात आहेत. आसपासच्या खेड्यातून येणा-या स्थानिक कुटुंबांची अशीच परवड होत असेल का ? या विचाराने मला ही कादंबरी वाचत असताना झपाटलं आणि म्हणून मी ती अनुवाद करायला घेतली. वाचकांना काय वाटतं ते त्यांनी वाचून ठरवायचं आहे. श्री. सुनील मेहता व त्यांचे सहकारी कर्मचारी, श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते.
-
Postmaster Aani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथ
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात 'माणूस' आणि 'निसर्ग' यांना असाधारण स्थान आहे, त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणार्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातून फुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.
-
Krosha Vinkam (क्रोशा विणकाम)
बाहेर कुठेही विणलेले टेबलमॅटस्, पडदे, रूमाल पाहिले, की त्यांचे मनमोहक डिझाईन आपले लक्ष वेधून घेतात. आणि हे डिझाईन कसे केले असेल असा प्रश्न मनात येतो. एका सुईवर दोर्याने केलेले क्रोशाकाम पाहताक्षणी सर्वांनाच आवडते. या पुस्तकात अशीच अनेक डिझाईन्स पहायला मिळतील. सुई हातात कशी धरायची, टाक्यांची माहिती इथपासून विविध लेस, फुले, टेबलमॅटस्, टोप्या, कॉलर्स इ. साठी सुंदर डिझाईन कसे विणावे याची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने स्वत: कलाकुसर करा आणि आपले घर सजवा.