-
Sakhi
सखी' पासून 'झकासराव' पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टी आहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची 'सखी' वाचकाचीही 'सखी' होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केला आहेच ! वपुंचे एक वाक्य आहे - "सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !"
-
Vapu Mahotsav
सगळी थोर, रसिक वाचक मंडळी आपापल्या आवडत्या लेखकाला एक ठराविक प्रश्न का विचारतात?- तो प्रश्न म्हणजे, "तुम्हाला अशी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली होती का हो?"- खरं तर अशा व्यक्ती आपल्या आसपास असतात. काही घरी चालून येतात. वाचकांना जाणीवही नसेल की, अशा कितीतरी व्यक्ती त्यांच्या शेजारूनही जात असतील की ज्यांनी काही ना काही साधना केली असेल. कुणी कवी, कुणी गणितज्ज्ञ, कुणी काही, काही, कुणी काही. असाच एखादा (किंवा एखादी) कुणा लेखकाला भेटतो (भेटते) मग वाटतं, समाजापर्यंत ह्या व्यक्तीला न्यायलाच हवं.’ असे खुद्द 'वपुं’नी 'महोत्सवारंभी’च म्हटले आहे आणि त्यांच्या ह्या लेखनाचे सूत्र आहे म्हणूनच येथे वाचकांनाही त्यांच्या आजूबाजूच्याच व्यक्ती भेटतात पण त्या येथे वपुंच्या लेखणीतून भेटण्याची खुमारी काही वेगळीच आहे.
-
Dost
दोस्त' यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.
-
Hunkar ( हुंकार )
तारुण्य-आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसर्याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सार्या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणार्या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या, तर कधी सरळ सत्याला भिडणार्या अशा या कथा आहेत.
-
Hi Vat Ektichi
वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे - हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे - वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे.
-
Ghar Haravleli Manasa
मुंबईसारख्या शहरात राहून आपल रोजचं आयुष्य जगणार्या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबणा या कथातून मांडलेली आहे. चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे. आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेल बालपण, तारूण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारूण्याचा शरीराचे, मनाचे, भावनांचे, संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ. पण तारूण्यातच अनेक प्रकारच्या कुंचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं. अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सूर, हे अस्वस्थ करणारे जखम करणारे. पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात 10-10 माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा असेलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट. आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. तीस माणसासाठी एकच संडास आणि रोजच्या नित्यकर्मासाठी करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे. अनंत प्रश्न उभे करणारं आहे. माणसं घरात राहतात. कधी कधी एकमेकांत कधीत न कोसळणार्या भक्कम भिंती उभारून अशा अनेक प्रश्नांच्या या कथा. प्रत्येकला आपल्या वाटणार्या ...
-
Aapan Sare Arjun
आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांना ब्रेन ट्युमरने मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण सुपर संभ्रमात विषादावस्थेत सापडलो आहोत असे वाटले. त्या मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेट्स भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या कॅसेटस ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपण स्वत:च अर्जुन आहोत, आणि स्वत:च नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेट्सनी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला. माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु 'आपण सारे अर्जुन’ या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या 19 लेखांचा (किंवा प्रवचनांचा) हा संग्रह. वपुंच्या कथाशैलीवर मराठी माणूस फिदा आहे. वपुंच्या गोष्टीवेल्हाळ प्रकृतीला असा स्वैर मुक्त चिंतनाचा फॉर्म साजेसा आहे.
-
Vapurvai
श्रेष्ठ कथाकथनकार’ म्हणून वपुंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ठ्ये सिध्द करते. मनाची पकड घेणारी कथा लिहणारे लेखक, कथेतील पात्रे जीवंत करणारे, श्रोत्यांना गुंतवून ठेवणारे कथनकार आणि या सर्वांमागे सूप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक! प्रत्येक कथेतून वपु वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखता देणारी; लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकणारी अशी वपुंची कथा असते. ज्यांच्या कथेतून अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष असतो. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्यत्वाची झलक वपुंनी नेमकी पकडलेली असते. आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिश्किल शैलीतील -- आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीयही करतो. वपुंच्या खास कथांची ही वपुर्वाई वाचकांना अपुर्वाईची ठरेल.
-
One For The Road
पुरुषालाही स्वत:च्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीच्या सहवासाचे सौख्य रोमांचित करणारे वाटते असे आपण धरून चालतो. 'वन फॉर द रोड’चा नायक आगगाडीत भेटलेल्या मोहिनीच्या सहवासात रममाण होण्याऐवजी स्वप्नात बघतो ते काहीतरी भलतेच. त्याच्या सत्प्रवृत्त, पापभीरू मनाला त्या अनैतिक सुखाचा आनंद मात्र तीळमात्रही लुटता येत नाही आपले मनच असले भलतेच सुख अंगी लावून घेत नाही- हे सारे एखादा गांभीर्याने वा विशिष्ट तत्त्वाचा आव आणून सांगेन. वपु अर्थातच तसे करत नाहीत तरीही सांगायचे ते सांगतातच. ह्याचप्रमाणे वपु प्रादशिकेतही शिरलेले नाहीत. त्यांच्या ह्या कथांचे वातावरण शहरी मध्यमवर्गीय आहे न् त्यांच्या ह्या कथांचे विषयही तसेच आहेत शहरी मध्यमवर्गीय !
-
Tu Bramath Aahasi Vaya
वपुंच्या कथांनी वाचकांच्या संवेदनांना हलकेच जागे केले, हलवले आणि प्रगल्भतेच्या प्रवासाला प्रवृत्त केले. पूर्णपणे अनलंकृत आणि सहजगर्भ शैलीतल्या वपुंच्या कथांनी मध्यमवर्गीय आयुष्यातील सुखदु:खे, मानापमानाचे अवघड प्रसंग, भावभावना आणि विकारविचारांची आंदोलने व्यक्त करणारी दुखरी नस पकडली शुद्ध जीवनातून विचारांतून, आपल्या आकलनाच्या खोलवरच्या चिंतनातून व्यक्त होणारे अनुभव आपल्या स्वप्रतिभेनं कथांमधून झळाळू लागले. सहस्त्रदल कमल सूर्य किरणांनी अलगद उमलावे तसे विविध प्रसंग कलाकृतींतून उमलावे लागतात. या कादंबरीत हे कमळ संपूर्ण उमलले आहे. ऐहिक जीवनाचारातून मनप्रवृत्तीला उंच नेणारी अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी प्रकाशवाट उजळणारी नायिका हे या कादंबरीचे बलस्थान आणि आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणार्या आजच्या मानवाचं प्रतिक म्हणजे ओंकारनाथ- या यशामागून येणारं निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणारा परंतु त्याचीही जाणीव नसणारा अशा मानवाला खर्या चैतन्याकडं, संपूर्ण आनंदाकडं बोटं धरून नेणारी ही कादंबरी वाचकालाही उत्कट प्रेमाचे आणि त्यागाचे असीम अविनाशी आनंदाचे दान देते. ज्ञानेश्वर, कबीर, येशू, बुद्ध या सर्वांचा वैचारिक अंगीकार केलेली उत्तुंग नायिका- सायरा आस्वादापलिकडचा आनंद देऊन जाते हे निश्चित.
-
Duniya Tula Visrel
वावां'ची शायरी दाद द्यावी अशी तर होतीच, तशीच समरसून दाद द्यावी असे हे 'वपुं'नी केलेले त्या शायरीचे तितकेच शैलीदार, तितकेच ओघवते, मनधुंद करणारे रसग्रहण. "उर्दू ढंगाची शायरी मराठीत करताच येणार नाही" ह्या ठाम विधानाला तोच ढंग घेऊन पण त्या ढंगाच्या नियमावलीत न अडकता भाऊसाहेब (वा.वा.) पाटणकरांनी ढोल उत्तर दिले होते आणि त्यांच्या ह्या ठोस उत्तराला सार्या मराठी रसिकांनी उचलूनही धरले होते. ह्या शायरीला विदर्भाच्या चौकशी पडल्या नव्हत्या - मुळातच समजले समजले वाटावेसे हे काव्य वपुंनी तोच ढंग अचूक पकडून खुलविले असल्याने त्याची खुमारी वाढली आहे- सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेल्या ह्या रसग्रहणाच्या रसग्रहणासह !
-
Cheers
वपु म्हणजे एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस. भेटलेल्या प्रत्येक माणसातला खास वेगळेपण वपु एक वपुंनी लिहिलेली व्यक्तिचित्रं सामान्य माणसाचीच पण तरीही स्वप्नील दुनीयेतील वाटतात. कारण त्याकडे पाहण्याची वपुंची दृष्टीच मुळी विशाल आणि फक्त सुंदर ते टिपणारी असते. नाना नेरुरकर हे आज आख्ख्या मुंबईतच काय महाराष्ट्रालाही माहीत असलेले व्यक्तिमत्त्व पण वपुंच्या नजरेतून घडलेलं नेरूरकरांचं दर्शन लाजजवाब ! सुधीर मोघ्यांच्या कवितांनी, गाण्यांनी भारून जाणारे अनेक रसिक असतील पण कवितेतून त्याच्यातला 'माणसाचा’ शोध घेणारे व त्यांच्या भेटीसाठी तळमळणारे फक्त वपुच ! 'चिअर्स’ मधून आपल्याला अशीच माणसं भेटतात वपुंशी त्यांचं असलेलं सुंदर, निर्मळ नातं आपल्याला सुखवून जातं. असं नातं, अशी माणसं आपल्यालाही भेटावी अशी इच्छा वाचताना निर्माण होते. माणसाचे विविध रंग, छटा, यांचं इंद्रधनुष्यी दर्शन घडणारे पुस्तक.
-
Vapurza
व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा वेळा पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही.
-
Khilli
"प्रस्तुत पुस्तकातल्या सर्व व्यक्ती व प्रसंग काल्पनिक आहेत. प्रत्यक्षातल्या व्यक्तीशी अगर प्रसंगांशी साम्य आढळल्यास तो योगायोग मानावा." अशी एक पळवाटवजा सूचना पुष्कळ नाटक-कादंबर्यांत असते. ह्या पुस्तकातल्या लेखात आलेले प्रसंग काल्पनिक असले तरी व्यक्ती काल्पनिक वगैरे नाहीत. वास्तवातल्याच आहेत. आता त्यांच्यापैकी बर्याच जणांना लाभलेलं मोठेपण अवास्तव आहे ही गोष्ट निराळी. तेव्हा त्या लेखात आलेल्या व्यक्तींचे प्रत्यक्षातल्या माणसांशी वाचकांना साम्य आढळले तर तो अकल्पित योगायोग वगैरे मानू नये. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्त्वाचे अंग मानले जाते. पण ह्या नेतेमंडळींची वक्तव्ये आणि कृती ह्यातली अफाट विसंगती पाहिल्यावर कितीही अतिशयोक्ती केली तरी थिटीच पडेल अशी भीती वाटते. ह्या व्यक्तीच आता कल्पनेतून वास्तव्यात उतरलेल्या चालत्या-बोलत्या व्यंगचित्रांसारख्या दिसायला लागल्या आहेत. ह्या पात्रांमुळे सार्या सार्वजनिक जीवनाचंच एक विराट प्रहसन झालं आहे. ह्या नित्य नव्या ढंगात चाललेल्या प्रहसनाच प्रहसन कसे लिहायचे ? बरे, सतत खुर्चीबाजीत दंग असलेल्या ह्या भिडूंचे आणि त्यांच्या आचार, विचार आणि उच्चाराच्या लीळांचे रंग हे तेरड्या-सरड्यालाही लाजवणारे. त्यामुळे त्यांच्या क्षणोक्षणी बदलत्या कर्तृत्वाची चित्रेही रांगोळीसारखी फुंकरीसरशी उडून जाणारी. त्यातून पब्लिकची आठवणही फारशी टिकाऊ नसते. त्यामुळे तात्कालिक राजकीय संदर्भ असलेले हे लेखन वर्तमानपत्री लिखाणासारखे. यातले बरेचसे लेख महाराष्ट्र टाइम्समधून प्रसिध्द झाले आहेत. असल्या अल्पजीवी व्यंग-लेखांच्या पानांची जुडी बांधावी की बांधू नये हेही ठरवता येईना. वास्तविक यापूर्वीच तराजूवत तोलून रद्दीवाल्यांनी त्यांचं मूल्यमापन केलं आहे. आता पुस्तकरूपाने ते लेख आल्यावर रद्दीवाल्यांना पुन्हा एकदा पर्वणी आली असं न वाटो हीच इच्छा. मधुकाका कुलकर्णी ह्यांनी या लेखांना ग्रंथरूप द्यायची जोखीम पत्करल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
-
Purvrang
९६३ साली ‘पूर्वरंग’ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. आणि आता श्रीविद्या प्रकाशनतर्फे तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. तिसर्या आवृत्तीच्या निमित्ताने माझे हे पुस्तक वाचताना वाटले की पुन्हा एकदा ह्या देशांतून हिंडून यावे. ज्या स्थळांची मनावर त्या काळी उमटलेली चित्रे आजही ताजी आहेत ती स्थळे पुन्हा एकदा पाहून यावे. पण असेही वाटले की न जाणो मनावर उमटलेली त्या काळातली चित्रे आणि बदललेल्या परिस्थितीत आज ती ठिकाणे ज्या स्वरूपात उभी आहेत ती चित्रे जर एकमेकांशी जुळली नाहीत तर उगीचच खंत वाटेल. ती ठिकाणे बदलली तसा गेल्या पंधरा-सोळा वर्षांच्या काळात मीही बदललो असणार. आज ही ठिकाणे पाहणार्यांना माझ्या पुस्तकातून येणारा प्रत्यय प्रत्यक्षात येणारही नाही कदाचित ! पण त्याला इलाज नसतो. म्हणून त्या काळी पाहिलेले ते ते देश, ती ती स्थळे आणि तिथे भेटलेली माणसे ह्या पुस्तकात तशीच राहू देणे चांगले असे मला वाटते. असो. ह्या नव्या आवृत्तीचे प्रकाशक श्री. मधुकाका कुलकर्णी यांचा मी आभारी आहे.
-
Apurvai
आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्यापासून इतकी वर्षे लोटूनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणार्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा ! तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो! मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोर्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला! मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती?) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ! ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्या ओढी ! शेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.