-
Ravanayan (रावणायन)
श्रीलंकेत रामापेक्षा रावणाचे भक्त जास्त आहेत. रामाचे दिव्यत्व मान्य करताना सर्वच बाबतीत बलाढ्य असलेल्या, सोन्याची लंका निर्माण करणाऱ्या रावणाकडे आपले दुर्लक्ष झाले का ? वस्तूच्या तीन बाजू पाहायची सवय झाल्याने उरलेल्या कितीतरी बाजू अज्ञात राहतात हे मान्यच करावे लागेल. या अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांनी अनेक लेखक-कवींना प्रतिभावंत केलेले आहे. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही स्तरांवर प्रयोगशील लेखन अनेकांनी केले आहे. याच प्रयोगशील लेखनाच्या परंपरेत यामिनीताईंचे लेखन 'रावण' या अतिप्रचंड व्यक्तिमत्त्वाला सहानुभाव व्यक्त करणारे आहे. पारंपरिक रचनाबंध नाकारून, त्यातील कृत्रिमता तोडून यामिनीताईंनी नवा रूपबंध आकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सहजसुलभ भाषेतून घडवलेले विदारक अनुभूतींचे दर्शन, कालिक संदर्भ जागविणारे भाषारूप, भाषिक कृतींची विविधता अशा अनेक वैशिष्ट्यांसह हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास वाटतो.
-
Beda (बेडा)
परिघाबाहेर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे चित्रण अशोक पवार यांनी या आधीच्या कादंबऱ्यांमधून केले आहे. 'बेडा' ही कादंबरी बहुरूपी या भटक्या समाजाच्या जगण्यातील व्यथांना शब्दरूप देणारी आहे. भटके लोक पाल देऊन राहतात त्या जागेला 'बेडा' म्हणतात. जात पंचायतीच्या रूपाने असलेली जातीअंतर्गत शोषणाची व्यवस्था, कायम वाट्याला आलेले विस्थापन, प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून पदरी येणारी अवहेलना या बाबी 'बेडा' मधून पानोपानी दिसतात. ठेचाळत का होईना पण चालू असलेल्या प्रबोधनाच्या चळवळी आणि त्यातून होत असलेली जागृती अशा आशादायी वळणावर ही कादंबरी संपते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही भटक्या समाजाचे प्रश्न अजूनही संपले नाहीत याचा प्रत्यय ही कादंबरी वाचून येतो. -- आसाराम लोमटे
-
Katha Sanhita (कथा संहिता)
मराठी कथा साहित्यामध्ये आजच्या घडीला कथा अभ्यासकाची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. सुनील साळुंके यांच्या पुस्तकातील कथालेख वाचल्यानंतर एक आश्वासकता त्यात आढळते. त्यांनी निवडलेल्या कथेकडे कथा अभ्यासक कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहतो हे पाहणे अधिक उद्बोधक आहे. एखादी कथा आपल्या अभ्यासासाठी निवडताना तिच्याकडे आस्वाद म्हणून पहायचे की, चिकित्सा म्हणून पहायचे, की या दोन्हीच्या सरमिसळीतून त्या कथेकडे बघायचे ? त्यापेक्षाही श्री. साळुंके हे कथांतर्गत आशय आणि त्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवतात. त्यांनी निवडलेली कथा, त्यातील भाषा सौष्ठव, विस्तार, वळणे, लावलेला अन्वयार्थ अचूकपणे आपल्यासमोर ठेवतात. कथेचा आस्वाद घेताना कथांतर्गत असलेल्या सौंदर्य स्थळांचा तिच्या आशयासह उकल आस्वादक या नात्याने करतात. या पुस्तकात त्यांनी निवडलेल्या कथा या मराठीतल्या "मास्टरपीसच" आहेत. यावरून श्री. सुनील साळुंके यांच्या अभिरूचीची, परिपक्वतेची कल्पना येते. कथेचा परिचय करून देताना त्यांनी आपली भूमिका आस्वादक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वाचक देखील पूर्णपणे सहभागी होईल याचे भान त्यांनी जपलेलं आहे. मधल्या काळात कथा वाङमयाची पीछेहाट होण्यापाठीमागे अनेक वाङमयीन व्यवहार कारणीभूत ठरले आहेत. तरीही श्री. साळुंके यांच्या कथाभ्यास- संहितामुळे कथा विरोधी प्रवाहाला निश्चितच आळा बसून, नवे कथालेखक आणि अभ्यासक कथा वाङ्मयाकडे गांभीर्याने पाहतील. कथा निर्मितीला पूर्वीसारखाच सूर प्राप्त होईल. इतकी आश्वासकता त्यांच्या कथाभ्यास-संहितेमध्ये असल्याचे दिसून येते.
-
Pandhara Gulmohar (पांढरा गुलमोहोर)
रूढ समजांच्या थोडं पल्याड जाऊन, बदलत्या संदर्भात नातेसंबंध समजून घेता आले तर घालमेलीत कोंडलेली मनं मोकळी होतील, माणूसपणाला अधिक अर्थ येईल, असं विचारभान देणाऱ्या वसुंधरा घाणेकर यांच्या 'पांढरा गुलमोहर' या संग्रहातील कथा प्रगल्भ वाचनानुभव देणाऱ्या आहेत. 'पांढरा गुलमोहर' मधील नऊ दीर्घकथा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा परीघ विस्तारत नेतात आणि लेखिकेचं समाजभान आपल्या प्रत्ययाला आणून देतात. या कथांमधील व्यक्तिचित्रण, भाषिक वाक्-वळणे, नाट्यात्मता आणि तरल संवेदनशीलता यामुळे 'पांढरा गुलमोहर' हा कथासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारा झाला आहे. समकाळातला वास्तव गुंता, आधुनिक व पारंपरिक संस्कृतीची घुसळण व ताणेबाणे निःसंकोचपणे मांडत असताना कथाकार वसुंधरा घाणेकर यांच्या कथांची बांधणी, आशय आणि अभिव्यक्तिचे अद्वैत साकारते. - - डॉ. महेश केळुसकर
-
Siddha (सिद्ध)
एक बुवा गावात येतो आणि चमत्कार घडू लागतात. बुवाचं माहात्म्य लक्षात येताच धर्ममार्तंड मैदानात येतात. बुवा आमच्याच धर्माचा आहे, म्हणू लागतात. गर्दीची हाव असलेले पुढारीही श्रेय घेण्यासाठी आघाडीवर येतात. समाज आपल्या भोळेपणाच्या झुल्यावर इकडून तिकडं झुलत राहतो. व्यापारीही उतरतात बुवाचा बाजार मांडायला. आणि गावात द्वेष, प्रेम, जाती, धर्म, वर्चस्व, धंदा, समन्वय यांची घुसळण सुरू होते. भावभावना, श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यापार, जगण्याचे प्रश्न, भोंदूपणा, वास्तवता याबाबतीत पृथ्वी हे एक गाव आहे. आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक गावाची हीच कथा आहे.
-
Udgaar (उद् गार)
उदगार या कवित संग्रहातील कविता कविच्या काळातील उदगार आहेत. कवी ज्या समाजात राहतो त्या समाजाचे त्याच्यावर संस्कार पण होतातच पण त्याबरोबर समाजातील विषमता, अन्याय, जातीभेद स्त्री आणि दलितावरील अत्याचार, अंधश्रद्धा व ढोंग यांच्या त्याच्या संवेदनशील मनावर परिणाम होतो. तो समाजातील ही विषमता सहन करीत नाही. पण त्याला हि करताहि येत नाही अशा अगतिक अवस्थेत त्याला जे शब्द सुचतात ते उदगाराच्या रूपाने बाहेर पडतात. तो आपला संताप,चीड, कणव, दु:ख जळजळीत शब्दातून व्यक्त करतो. उदगार कविता संग्रहातील कविता म्हणजे कवीता जगताना आलेल्या अनुभवांचे शब्दरूप होय. उदगारमधील कविता वाचकांच्या हृदयाला भिडणारी आहे. युवकांच्यासाठी तीमध्ये आशेचा किरणही आहे-